सत्यमूर्ति, एस्. : (१९ ऑगस्ट १८८७-२८ मार्च १९४३). भारतीय स्वातंत्र्य – चळवळीतील एक आघाडीचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे प्रभावी प्रवक्ते. त्यांचा जन्म चेन्नई (मद्रास) इलाख्यातील भूतपूर्व पुदुकोट्टई संस्थानातील (तिरूचिरापल्ली जिल्हा) थिरूमायम या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. सुरूवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी पुदुकोट्टई व मद्रास येथील महाविदयालयांतून उच्च शिक्षण घेतले. एम्.ए. ही पदवी संपादन केल्यानंतर काही वर्षे त्यांनी मद्रासच्या ख्रिश्चन महाविदयालयात अध्यापन केले. नंतर त्यांनी लॉ कॉलेजमध्ये (मद्रास) कायद्याचा अभ्यास केला आणि मद्रासलाच वकिलीस प्रारंभ केला. त्यांना या व्यवसायाने प्रतिष्ठा आणि पैसा दोन्हीही प्राप्त झाले तथापि अर्थलाभ होत असतानाच महात्मा गांधींच्या भारतीय राजकारणातील प्रवेशानंतर ते काँग्रेसच्या आंदोलनाकडे आकृष्ट झाले (१९१९). तमिळनाडू काँग्रेसच्या कांचीपुरम्च्या अधिवेशनात (१९१९) त्यांनी ॲनी बेझंट व त्यांचे अनुयायी यांवर कठोर टीका केली. त्यामुळे त्यांची काँग्रेसच्या प्रवक्त्यांत गणना होऊ लागली. त्याच वर्षी ते काँग्रेसच्या शिष्टमंडळातून इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी काँग्रेसची भूमिका प्रभावीपणे मांडली.

त्यांची मद्रास इलाख्याच्या विधानपरिषदेवर स्वराज्य पक्षाच्या व्दारे निवड झाली (१९२३). त्यांनी १९२३-३० दरम्यान जस्टिस पक्षावर आपल्या अस्खलित वक्तृत्वाव्दारे अनेक कायदेशीर आरोप केले आणि त्यांच्या नेत्यांना कोंडीत पकडले. त्यांचे हे वाक्‌चातुर्य लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांना पुन्हा १९२५ मध्ये इंग्लंड – आयर्लंडच्या दौऱ्यावर काँग्रेसची स्वातंत्र्याविषयीची भूमिका मांडण्यासाठी प्रसार -प्रचारार्थ पाठविले. म. गांधींनी १९३० साली असहकाराची हाक देताच सत्यमूर्ती त्या चळवळीत सर्वार्थाने सहभागी झाले. त्यांना अटक होऊन १९३१ व १९३२ अशी दोनदा कारावासाची सजा भोगावी लागली. त्यानंतर त्यांची दिल्लीच्या मध्यवर्ती कायदेमंडळावर निवड झाली (१९३५). भुलाभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रथम काम केले. पुढे त्यांची काँग्रेस पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्नोत्तराच्या तासात ते ब्रिटिश शासनावर प्रश्नांचा भडीमार करीत आणि राज्यकर्त्यांना हैराण करीत. त्यामुळे विधिमंडळात ‘सपलमूर्ती ’ (कुशल) हे टोपणनाव त्यांना पडले. ग्रेट ब्रिटनच्या संसदीय मंडळाने भारतासाठी प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा १९३५ मध्ये संमत केला. या कायद्यानुसार १९३७ मध्ये विविध प्रांतांत (इलाख्यांत) निवडणुका घेण्याचे ठरले. मद्रास इलाख्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि अभिनव प्रचारपद्धती अंमलात आणली. लोकांना आकर्षित करण्यासाठी ग्रामोफोनचा उपयोग केला आणि जवाहरलाल नेहरूंच्या झंझावती सभा आयोजित केल्या. त्यामुळे इतर प्रांतांच्या तुलनेत मद्रास प्रांतात काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या. अर्थात ह्याचे श्रेय सत्यमूर्तींकडे जाते. साहजिकच मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्रिपद त्यांना मिळावयास पाहिजे होते पण ते निराश झाले नाहीत व पक्षासाठी कार्यरत राहिले. दुसरे महायुद्घ सुरू होताच ब्रिटिशांनी हिंदुस्थानला त्यात गोवले (१९३९). तेव्हा म. गांधींनी ब्रिटिशांच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या मंत्रिमंडळांना राजीनामे देण्यास सांगितले आणि सत्याग्रहाचे आवाहन केले. सत्यमूर्तींनी सत्याग्रह केला. त्यांना पुन्हा अटक झाली. तुरूंगातून सुटल्यानंतर ते मद्रासचे महापौर झाले (१९४१). त्यांना मद्रास शहर सुंदर व स्वच्छ अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्यांनी काही योजना आखल्या व अंमलातही आणल्या. तसेच शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांतूनच पुंडी जलप्रकल्पाला चालना मिळाली. पुढे छोडो भारत आंदोलन म. गांधींनी सुरू करताच (१९४२) त्यांनी महापौरपदाचा त्याग केला आणि सत्याग्रहात ते सामील झाले. त्यांना अटक होऊन वेल्लेरच्या कारावासात ठेवले. तिथे त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना मुक्त केले (२ फेबुवारी १९४३). काही दिवस त्यांनी अन्नमलई विदयापीठाच्या परिसरात विश्रांती घेतली पण त्यांची शारीरिक व्यथा वाढल्यानंतर त्यांना मद्रासच्या हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे त्यांचे निधन झाले.

राजकारणाबरोबरच त्यांना संगीत, साहित्य, कला आदींचा व्यासंग होता. शैक्षणिक कार्याविषयीही त्यांना आस्था होती. ते मद्रास विदयापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. अन्नमलई विदयापीठ सुरू करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. दाक्षिणात्य गायिका श्रीमती के. बी. सुंदरम्बल त्यांना बंधू मानीत. नंतरच्या पिढीतील तमिळनाडूतील कामराज, राजगोपालाचारी, कल्की कृष्णमूर्ती वगैरे मातब्बर काँग्रेस नेते त्यांना गुरूसमान मानीत. प्रदीर्घ मुद्देसूद भाषणासाठी काँग्रेसमध्ये त्यांची ख्याती होती.

देवगिरीकर, त्र्यं. र.