रोनाल्ड विल्सन रेगनरेगन, रोनाल्ड विल्सन: (६ फेब्रुवारी १९११ –). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चाळीसावा राष्ट्राध्यक्ष. त्याचा जन्म टँपीको (इलिनॉय) या गावी जॉन एडवर्ड व आई नील विल्सन यांच्यापोटी झाला. वडील गावोगावी फिरून पादत्राणे विकण्याचा धंदा करीत. पुढे हे कुटुंब डिक्सन (इलिनॉय) येथे स्थायिक झाले. रोनाल्डचे शालेय शिक्षण तेथेच झाले. पुढे त्याने युरिका महाविद्यालयातून समाजशास्त्र–अर्थशास्त्रातील पदवी मिळविली (१९३२). त्याच वर्षी डेव्हेनपोर्ट नभोवणी केंद्रावर क्रीडा निवेदक म्हणून नियुक्ती झाली. कॅलिफोर्नियातील खेळांचे थेट प्रक्षेपण करीत असताना त्याला वॉर्नर ब्रदर्स या चित्रपट संस्थेने चित्रपटात काम दिले. लव्ह इज ऑन द एअर (१९३७) हा त्याचा पहिला चित्रपट. 

त्यानंतरच्या सु. पंचवीस वर्षात त्याने पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केले. त्यांपैकी सांता फे ट्रेल, न्यूट रॉकनी ऑलअमेरिकन (१९४०), इंटरनॅशनल स्क्कॅड्रन द हेस्टी हार्ट (१९४१), किंग्ज रो (१९४२), द व्हाईस ऑफ द टर्टल (१९४७), लॉ अँड ऑर्डर (१९५३), टेनेसीज पार्टनर (१९५५), इ. त्याचे चित्रपट गाजले. काऊबाय, जॉर्ज जीप या चित्रपटातील त्याच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. १९४० साली जेन वायमन या अभिनेत्रीशी त्याने विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली व एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला पण १९४८ मध्ये त्याने जेनबरोबर घटस्फोट घेतला. पुढे त्याने नान्सी डेव्हीस या अभिनेत्री बरोबर दुसरे लग्न केले. (१९५१). त्यांना एक मुलगी (पॅट्रिशा) व एक मुलगा (रोनाल्ड प्रेस्कट) आहे. 

दुसऱ्या महायुध्दाच्या काळात रेगन याने अमेरिकेच्या वायुसेनेत प्रवेश केला (१९४२). मात्र दृष्टिदोषामुळे त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने सैनिकांच्या प्रशिक्षणार्थ काही चित्रपट हॉलिवुडमध्ये तयार करण्यास मदत केली. कॅप्टन होऊन तो वायुसेनेच्या सेवेतून बाहेर पडला (१९४५). यानंतर रजतपटावरील कलाकारांच्या संघटनेचा (साग) तो अध्यक्ष झाला (१९४७-५२ व १९५९-६०). शिवाय मोशन पिक्चर इंडस्ट्री कौन्सिलच्या अध्यक्षपदी त्याची नियुक्ती झाली (१९४९). या काळात त्याने निर्मात्यांविरूद्ध संप करून दूर चित्रवाणीत विकलेल्या जुन्या चित्रपटांतील कामाचा मोबदला अभिनेत्यांना मिळवून दिला. दूरचित्रवाणीवरही त्याने दोन नाट्यमाला सादर केल्या. तसेच प्रसिद्धीचेही काम केले. अभिनयाबद्दल त्याला अनेक पुरस्कार व मानसम्मान लाभले.  

विद्यार्थिदशेत रेगन विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष होता. १९४८ साली राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत टुमनच्या प्रचारमोहिमेत त्याने भाग घेतला तथापि पुढे तो रिपब्लिकन पक्षात सामील झाला (१९६२). दूरचित्रवाणीवर त्याने बॅरि गोल्डवॉटरच्या प्रचारासाठी एक व्याख्यान दिले (१९६४). रिपब्लिकन पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्याची गणना होऊ लागली. पुढे त्याची कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदी दोन वेळा (१९६६ व १९७०) निवड झाली. एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्याने नावलौकीक मिळविला. राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्याचे त्याने १९६८ व १९७६ मध्ये अयशस्वी प्रयत्न केले मात्र १९८० साली तो रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्रपती जिमी कार्टर यांचा पराभव करून निवडून आला. त्यावेळी देशातील अर्थव्यवस्था ढासळत चाललेली होती. बेकारी, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील डॉलरचे अवमूल्यन, करांचा वाढता बोजा हे प्रश्न तीव्र झाले होते. म्हणून त्याने करात सूट देण्याचा तसेच सामाजिक सेवा-योजनांवरील खर्चात कपात करून बेकारांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. हे उजवे आर्थिक धोरण ‘रेगनॉमिक्स’ म्हणजे रेगन-अर्थशास्त्र म्हणून ओळखले जाते. 

रेगन विजयी झाला त्यावेळी इराणमध्ये अमेरिकन राजनैतिक अधिकारी कैदेत होते. रशियाने आपले सैन्य अफगाणिस्तानात पाठविले होते आणि कांपूचियात (ख्मेर प्रजासत्तक) रशिया व व्हिएटनाम यांनी पोल पॉट सरकार उलथून टाकले. रशिया जास्त आक्रमक बनला होता आणि अमेरिकेतील जनतेला कमकुवत कार्टर ऐवजी कणखर राष्ट्रपती हवा होता. त्याची भरपाई रेगन याने करून संरक्षणावरील खर्च मात्र त्याने कमी केला नाही. उलट रशियाविरूद्ध आक्रमक पवित्रा घेऊन अफगाण बंडखोरांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला व रशियावर दबाव आणला. त्यासाठी संरक्षणसिद्धता व अद्ययावत शस्त्रास्त्र संपन्नता यांवर रेगन याने भर दिला. तसेच अंकित व मित्र राष्ट्रांना शस्त्रास्त्रांची मदत चालू ठेवली. यामुळे रशिया आणि अमेरिका यांतील तणाव वाढला. रेगनची धोरणे यशस्वी झाल्यामुळे १९८४ च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत जनतेने त्याला पुन्हा निवडून दिले. त्याने आपल्या दुसऱ्या कारकीर्दीत जुनी धोरणेच धडाडीने चालू ठेवली. त्याच्यावरील खुनी हल्ला व कॅन्सरची व्याधीसुध्दा त्याला त्यापासून रोखू शकली नाही.  

रशियात या काळात अनेक बदल होत होते. गार्बाचोव्ह यांच्याकडे सत्तेची सूत्रे आल्यापासून (मार्च १९८५) त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे व सामंजस्यांच्या नव्या धोरणामुळे अमेरिका रशिया यांतील तणाव कमी होण्यास मदत झाली. १९८५-८६ पासून रेगन आणि गार्बाचोव्ह यांत शास्त्रकपात, सहजीवन व निःशस्त्रीकरण या संदर्भात चार महत्वपूर्ण बैठका झाल्या. शेवटची बैठक मॉस्को येथे २९ मे ते २ जून १९८८ या दरम्यान झाली. तिचे फलित म्हणून एक प्रदीर्घ संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात येऊन त्यात शांततेसाठी सहजीवन व मानवी हक्क यांचा पुरस्कार करण्यात आला.व या दोन महासत्ता शस्त्रकपातीच्या तत्त्वासाठी प्रयत्नशील व बांधील आहेत, असे आश्वासन देण्यात आले तथापि स्ट्रॅटीजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी याला तत्वतः मान्यता असली, तरी तपशीलांत मात्र या दोन महासत्तांत अजूनही मतभेद आहेत. 

रेगन निवृत्तीनंतर (१९८९) घटनेतील काही दुरूस्त्यांसाठी देशभर जनमत अजमावण्याकरता दौरा करीत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यात आणि जागतिक राजकारणात एक महासत्ता म्हणून देण्याची एक कणखर आणि प्रभावी प्रतिमा निर्माण करण्यात रेगन यशस्वी झाला. 

संदर्भ : 1. Boyarsky, Bill, Ronald Reagan : His Life and Rise to the Presidency, New York, 1981.

           2. Cannon, Lon, Reagan, New York, 1982.

          3. Smith Hedrick and Others, Reagan : The Man, the President, Oxford, 1981.                                                              

देशपांडे, सु. र.