हल, कॉर्डेल : (२ ऑक्टोबर १८७१–२३ जुलै १९५५). अमेरिकन मुत्सद्दी, विधिज्ञ आणि आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातील शांततेचा एक महान पुरस्कर्ता. त्याचा जन्म ओव्हर्टन कौंटीमधील लॉग केबिन येथे एका सधन कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे त्याने कंबर्लंड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली (१८९१) आणि तो तत्काळ टेनेसी येथे वकिली करू लागला. १८९३ मध्ये त्याची टेनेसी राज्याच्या संसदेवर निवड झाली. पुढे तो सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला. स्पॅनिश-अमेरिकन युद्धात स्वयंसेवकांच्या एका पथकाचा तो कॅप्टन होता. पुढे काही वर्षे त्याने न्यायाधीश म्हणूनही काम केले (१९०३–०७). त्याची अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या संसदेवर निवड झाली (१९०७ –३१ १९२२ हे वर्ष वगळता ). १९३१ मध्ये तो सिनेटर म्हणून निवडून आला.

कॉर्डेल, हल

वुड्रो विल्सनच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हलने १९१३–१६ मधील वित्तीय सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे प्राप्तिकर व वारसाकर संमत होऊन अमेरिकेच्या आर्थिक धोरणात आमूलाग्र बदल घडले. अमेरिकेने जकातीवरील कर कमी करून परकीय मालावरील निर्बंध शिथिल करावेत, म्हणजे परराष्ट्रांबरोबर व्यापारी देवाण-घेवाण वाढून परस्परांत सौहार्दाचे वातावरण व सामंजस्य निर्माण होईल आणि त्यामुळे साहजिकच जागतिक शांततेला मदत होईल, असे त्याचे मत होते.

फ्रँक्लिन रूझवेल्ट हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्याने हलची परराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक केली. रूझवेल्टला सुरुवातीच्या कारकिर्दीत बिकट अंतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याने खात्याची पूर्ण धुरा हलवर सोपविली. बहुतेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर हल व रूझवेल्ट यांचे एकमत होते. हलला या काळात सर्वप्रथम रूझवेल्टचे ‘चांगले शेजारी’ (गुडनेबर पॉलिसी) हे धोरण अमलात आणावयाचे होते. १९३३ मध्ये त्याने सकल अमेरिकन राष्ट्रांची एक परिषद बोलाविली. पॅराग्वाय आणि बोलिव्हिया यांचा सीमावाद विकोपास जाऊन त्यांच्यात युद्ध चालू होते. तसेच त्या वेळी पेरू व कोलंबिया यांचेही संबंध दुरावलेले होते तरीसुद्धा हलच्या प्रयत्नाने माँटेव्हिडिओ (यूरग्वाय) येथे ही परिषद घेतली गेली (डिसेंबर १९३३). या परिषदेचे महत्त्व पटविण्यासाठी त्याने अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले आणि रूट एलिहूप्रमाणे सर्व लॅटिन अमे-रिकेतील देशांच्या राजधान्यांना सदिच्छा भेटी दिल्या. या भेटींतून त्याने शांततेचा प्रसार-प्रचार केला. या परिषदेत काही मूलभूत तत्त्वांवर बहुतेक देशांत एकमत निर्माण झाले. ही तत्त्वे म्हणजे कोणत्याही देशाच्या अंतर्गत वा परराष्ट्रीय धोरणात दुसऱ्या देशांनी हस्तक्षेप करू नये, तसेच युद्धाचा आश्रय न घेता आपापसांतील संघर्ष शांततामय मार्गांनी सोडवावे. या परिषदेनंतर क्यूबाच्या बाबतीत अमेरिकेने याच धोरणाचा पाठपुरावा केला व हैतीमधून आपले सैन्य परत बोलाविले. नंतर अमेरिकेने फिलिपीन्सला स्वातंत्र्य दिले व आपला हक्क सोडला. दुसरी परिषद १९३८ मध्ये बुब्वेनस एअरीझ येथे घेतली. शिवाय एक खास परराष्ट्रमंत्र्यांची बैठक हवाना (क्यूबा) येथे युद्धकाळात घेतली.

हे सर्व धोरण अमलात आणताना रूझवेल्टला हलचे सहकार्य मोठ्या प्रमाणावर मिळालेच परंतु जकातविषयक धोरण ठरविताना हलचे काही सूक्ष्म गुण प्रकर्षाने दिसले. त्या वेळी जगात, विशेषतः यूरोप खंडात, आर्थिक राष्ट्रवादाचे लोण सर्वत्र प्रसृत झाले. त्याला शह देणे हे हलचे मूळ उद्दिष्ट होते. म्हणून त्याने १९३४ पासून कॅनडा, लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे आणि यूरोपीय देशांबरोबर अनेक व्यापारी करार केले होते. १९३८ मध्ये इंग्लंडबरोबर एक महत्त्वाचा करार केला. या सर्व करारांमागे खुला व्यापार हे महत्त्वाचे तत्त्व होते आणि १८६० च्या कॅबडेन तहाचे त्यात अनुकरण झाले होते. या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील मतभेद कमी झाले, असे हलचे मत होते परंतु या मार्गांनी बडी यूरोपीय राष्ट्रे संतुष्ट होतीलच, अशी त्याला खात्री नव्हती. म्हणून अशा राष्ट्रांशी व्यापारविषयक धोरण ठरविताना त्याने आर्थिक दंडात्मक परिमाणे (मर्यादा) लादली (१९३९). उदा., ज्या वेळी हिटलरने चेकोस्लोव्हाकिया पादाक्रांत केला (१९३९), त्या वेळी अमेरिकन शासनाने जर्मन मालावर जादा जकात कर लादला. शिवाय अमेरिकन शासनाने जपानच्या चीनमधील कारवायांना इतर राष्ट्रांच्या मध्यस्थीने अनेक वेळा पायबंद घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या सर्व युद्धविरोधी धोरणामागे हलचे शांततावादी धोरण आणि प्रेरणा होती. याच वेळी हल आणि रूझवेल्ट यांनी अमेरिकन जनतेला पृथक्वादी धोरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायुद्धाच्या घोषणेनंतर अमेरिकेला म्हणजे पर्यायाने रूझवेल्टला अधिक प्रसिद्धी मिळाली. आपापसांतील संघर्ष युद्धाने न सोडविता शांततामय मार्गांनी सोडविले पाहिजेत, म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी अमेरिकेने तटस्थतेचा पुरस्कार करून युद्धापासून अलग रहावे, हे धोरण अंगीकारले. अमेरिकेतील पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्यानंतर (डिसेंबर १९४१) अमेरिकेला युद्धापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अमेरिकेचा युद्धाशी प्रत्यक्ष संबंध आला. हल प्रथमपासूनच राष्ट्रसंघ या जागतिक संघटनेला अनुकूल होता. अमेरिकेचा त्या संघटनेत सहभाग नसल्यामुळे जागतिक कटकटी उद्भवतात, असे त्याचे मत होते. म्हणून दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यातील घडामोडींमुळे हलला फार दुःख झाले. युद्धपिपासू राष्ट्रांना आळा घालणारी एखादी बलवान आंतरराष्ट्रीय संघटना असावी, या विचाराने त्याने १९३९ पासून संयुक्त राष्ट्र संघटना या संस्थेच्या पायाभरणीस प्रारंभ केला आणि त्या दृष्टीने भरीव पावले उचलली. या संस्थेच्या रचनेसंबंधी त्याने अनेक तज्ज्ञांकडून सूचना मागविल्या. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर या कल्पनेला अधिक गती मिळाली आणि जानेवारी १९४२ मध्ये या संस्थेचे जाहीर रीत्या स्वागतही झाले. अमेरिकेच्या अंतर्गत धोरणाचा विचार करता, हलने रिपब्लिकन पक्षाकडून संस्थेच्या रचनेसाठी पाठिंबा मिळविला आणि ही संघटना अपक्षीय तत्त्वावर उभी रहावी म्हणून खूप श्रम घेतले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेचा मसुदा याच सुमारास तयार झाला होता (१९४३). अमेरिकेच्या संसदेत त्याला प्रचंड बहुमताने मान्यता मिळाली. पुढे हल-स्टालिन भेटीतून त्याला विधायक स्वरूप प्राप्त झाले. विल्सनला जे करता आले नाही, ते हलच्या सहकार्याने रूझवेल्टने तडीस नेले. हलने रूझवेल्ट आणि चर्चिल यांना प्रादेशिक करारांपासून परावृत्त केले. अशा प्रकारे हलने संयुक्त राष्ट्र संघटनेचे वैश्विक व्यक्तिमत्त्व सुरक्षित ठेवले व रशिया आणि पाश्चात्त्य यूरोपीय राष्ट्रे यांतील वैमनस्य कमी करण्याचा खूप प्रयत्न केला.

रूझवेल्टच्या मते, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेत हलचा मुख्य वाटा आहे. म्हणूनच तो हलचा उल्लेख संयुक्त राष्ट्र संघटनेचा पिता असा करीत असे तथापि प्रकृति-अस्वास्थ्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढील घडामोडींत हल सहभागी होऊ शकला नाही. याच कारणास्तव त्याने परराष्ट्र मंत्रिपदाचा राजीनामा दिला (१९४५). त्याच्या या भरीव शांतता कार्याचा गौरव त्याला नोबेल शांतता पारितोषिक देऊन करण्यात आला (१९४५).

त्याचे बथेझ्डा (वॉशिंग्टन) येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Julius, W. Pratt, Cordell Hull, 1933–44, 2 Vols. New York, 1969.

            २. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८७.

शेख, रुक्साना