जोशी, श्रीधर महादेव : (१२ नोव्हेंबर १९०४ –  ). एक निष्ठावंत समाजवादी नेते व कामगार पुढारी. ‘एसेम’ या नावाने ते परिचित आहेत. त्यांचा जन्म जुन्नर (पुणे) येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण जुन्नर येथे पुरे होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. पुढे पुण्यास फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले (१९२९) आणि १९३४ साली एल्एल्.बी. झाले. विद्यार्थिदशेतच म. गांधींच्या चळवळीकडे ते आकर्षित झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना करून मुंबईला यूथ लीगची परिषद भरविली (१९२७) हरिजनांना पुण्यातील पर्वतीवरील मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला (१९२९). तत्पूर्वी त्यांनी सायमन आयोगाविरुद्ध मोर्चा काढला होता. ते मिठाचा सत्याग्रहात सहभागी झाले, म्हणून त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली. या काळात त्यांनी मार्क्सचे विचार व समाजवाद यांचा अभ्यास केला आणि ते समाजवादी बनले. मानवेंद्रनाथ रॉय यांना मुक्त करावे, म्हणून त्यांनी वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेस सोशॅलिस्ट पक्ष स्थापन केला. त्यांनी काँग्रेस मंत्रिमंडळ असताना शेतकऱ्यांचा मोर्चा काढला (१९३७) आणि छोडो भारत आंदोलनाच्या वेळी (१९४२) ते भूमिगत झाले, पण १९४३ मध्ये त्यांना अटक झाली. १९४६ मध्ये ते मुक्त झाले. राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांपैकी ते एक होत. त्याचे ते दलप्रमुख (१९४०–४१) आणि (१९४७–५१) होते. १९४८ मध्ये ते महाराष्ट्राच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. साने गुरूजी सेवापथकात त्यांनी भाग घेतला (१९५०) व साधना  हे साप्ताहिक चालावे, म्हणून विश्वस्त समिती स्थापन करून हे साप्ताहिक पुढे चालू ठेवले. पुढे ते मुंबई विधानसभेवर निवडून गेले (१९५३). भाववाढ, भूदान वगैरे चळवळींत त्यांनी भाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात कामगारांची संघटना व त्यांचे प्रश्न यांत त्यांनी प्रामुख्याने लक्ष घातले. तत्पूर्वी ते गोवा विमोचन समिती व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांत आघाडीवर होते. संयुक्त महाराष्ट्र समितीचे १९५६–६१ या काळात ते सरचिटणीस होते. त्यांनी केंद्रीय सरकारी नोकरांच्या संपाचे नेतृत्व केले (१९६०). १९५७ मध्ये ते मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि १९६३ मध्ये प्रजा सामाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. पुढे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनचे चिटणीस, ऑल इंडिया स्टेट बँक एंप्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र परिवहन कामगार सभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. कामगार व सेवापथक यांकरिता प्रसंगी त्यांनी उपोषणही केले आहे. मुंबईच्या भाषिक दंगलीत व पुण्याच्या धार्मिक दंगलीत त्यांनी शांतिकार्य केले. लोकसभेवर १९६७ मध्ये ते निवडून गेले.

श्रीधर महादेव जोशी

सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी आपली मते डेली न्यूज  लोकमित्र  या वृत्तपत्रांद्वारे मांडली. त्याचे ते अनुक्रमे १९५३ व १९५८–६२ मध्ये संपादक होते. याशिवाय पुणे महानगरपालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य होते

(१९६२–६६). त्यांचा उर्मी  हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच आस्पेक्ट्स ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी (१९६९) हा समाजवादी विचारांवर त्यांनी ग्रंथ लिहिला. याशिवाय विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल स्फुटलेखन केले आहे.  

एक साधे, प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून एसेम प्रसिद्ध असून विविध प्रकारच्या अन्यायांविरुद्ध परखडपणे लढा देण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले. तारा पेंडसे या मुलीशी १९३९ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना दोन मुलगे आहेत. त्यांची षष्ट्याब्दी १९६४ मध्ये साजरी झाली त्या वेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना एक लाख रुपयाची थैली दिली. तिचा उपयोग कार्यकर्त्यांसाठी व्हावा, म्हणून त्यांनी सोशॅलिस्ट प्रतिष्ठान स्थापिले. त्यांच्यावर दोन गौरवग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांची व्याख्याने, पत्रे व इतर स्फुटलेख एस्. एम्. जोशी : व्यक्ति, वाणी, लेखणी  या नावाने प्रसिद्ध झाले आहेत (१९६४).

केळकर, इंदुमति