सेनापती बापट

बापट, सेनापति : (१२ नोव्हेंबर १८८॰-२८नोव्हेंबर १९६७). सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक. पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला.त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या शब्दावलीने ते ओळखले जाऊ लागले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे गरीब कुटुंबात जन्म झाला. आईचे नाव गंगाबाई. माध्यमिक आणि बी.ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीच्या द्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली.

बी.ए. परीक्षेत १९॰३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाचे शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत असल्यामुळे शिष्यवृत्ती बदं होऊन शिक्षण अपुरे राहिले. श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारक नेत्याशी परिचय होऊन त्यांच्या मदतीने पॅरिस येथे राहून तेथील रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बाँबची तंत्रविद्या हस्तगत केली. त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतात व बंगालमधील क्रांतिकारक गटांपर्यंत पोहोचविली. क्रांतिकारकांच्या कटाच्या एका खटल्यात माफीच्या साक्षीदाराने बापटांचे नाव उघडकीस आणल्यामुळे बापट हे १९॰८ ते १९१२ पर्यंत चार वर्षे अज्ञातवासात राहिले. नंतर १९२१ पर्यंत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवेचे व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालविले. या आंदोलनात कारागृहवासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असताना राजद्रोहात्मक भाषणे केल्याबद्दल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. संस्थांनी प्रजांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानाच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबद्दल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आंदोलन करीत असताना कारागृहात आंदोलनाला पूरक अशा तऱ्हेचे साहित्य लिहिले व ते प्रकाशित केले. त्यांनी अपुरे राहिलेले छोटेसे आत्मचरित्र लिहिले आहे. बरेचसे लेखन मराठीत व थोडे इंग्रजीत व संस्कृतमध्ये केले लेखनाला पद्याकार दिला. क्रांतिवादी राजकारणाचे समर्थन करणारे, भगवतगीतेच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले, राष्ट्रमुक्ती व अन्याय प्रतिकार या दोन मुद्यांना अनुसरून युक्तिवाद केलेले हे साहित्य आहे. चैतन्यगाथा हे पुस्तक वाचले म्हणजे त्यांचे मूलभूत विचार लक्षात येतात. मराठीमध्ये योगी अरविंदांच्या इंग्लिशमधील आध्यात्मिक तत्त्वज्ञानावरील ग्रंथांचा उत्कृष्ट अनुवाद बापटांनी केला आहे. अरविंदांचा दिव्यजीवन हा मोठा ग्रंथ बापटांनी प्रसन्न शैलीने मराठीत उतरविला आहे. त्यांचे साहित्य समग्र ग्रंथ (१९७७ ) म्हणून साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रसिद्ध झाले आहे.

संदर्भ : नवरे, श्रीपाद शंकर, सेनापती, मुंबई, १९७६.

जोशी, लक्ष्मणशास्त्री.