नीलम संजीव रेड्डीरेड्डी, नीलम संजीव : (१९ मे १९१३ – ). भारताचे सहावे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील इल्लूर (अनंतपूर जिल्हा) या गावी सधन शेतकरी कुटुंबात झाला. वडील नीलम चिनप्पा रेड्डी हे काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते होते. संजीव रेड्डींचे सुरुवातीचे शिक्षण अड्यारला (मद्रास) थिऑसॉफिकल विद्यालयात झाले. नंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच ते युवक काँग्रेसकडे आकृष्ट झाले आणि १९३१ मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून म. गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. फावल्या वेळेत मिळेत ती नोकरी त्यांनी केली पण कुठेच ते स्थायी सेवेत रुजू झाले नाहीत. पुढे ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले (१९३६–१९४६). तत्पूर्वी त्यांचे नागा रथ्नम्मा या सुशिक्षित मुलीबरोबर लग्न झाले (८ जून १९३५). त्यांना २ मुलगे व ३ मुली झाल्या. त्यांपैकी एक मुलगा लहानपणीच अपघातात निवर्तला. दुसरा मुलगा सुधीर हा अनंतपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करतो.

म. गांधीजींनी सुरू केलेल्या बहुविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि छोडो भारत आंदोलनात त्यांना प्रदीर्घ कारावासाच्या शिक्षा झाल्या. १९४६ मध्ये त्यांची मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते (१९४७). स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले (१९४९–५१). त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत घेण्यात आले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. ऑक्टोबर १९५६ मधील राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. ३ डिसेंबर १९५९ रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९५९–६२). त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेसची तीन अधिवेशने झाली. ९ जून १९६४ रोजी पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून लालबहादूर शास्त्रींनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. १९६७ पर्यंत राज्यसभेचे ते सदस्य राहिले. जानेवारी १९६६ ते मार्च १९६७ दरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६७ साली पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. निःपक्षपाती सभापती म्हणून त्यांची ख्याती होती. राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडून जुनी व नवी काँग्रेस असे दोन तट पडले (१९६९). श्रीमती इंदिरा गांधींनी पुरस्कृत केलेले ⇨वराहगिरी वेंकटगिरी यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली (१९६९– ७४). त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीचा अयशस्वी प्रयत्न केला (१९७१) आणि राजकारणातून निवृत्ती घेऊन आपले लक्ष अनंतपूर येथील शेती व्यवसायात केंद्रित केले.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावाने ते आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले (१९७७). पुन्हा त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली पण अल्पकाळातच त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी राजीनामा दिला. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली (१९७७). राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तरीसुद्धा पक्षपाती भूमिका अंगीकारली नाही. निवृत्तीनंतर (१९८२) ते उर्वरित आयुष्य अनंतपूर येथे व्यतीत करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश करून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सचिवापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक उच्चपदे भूषविली. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री वा अन्य मंत्री या नात्याने त्यांनी भरीव कामगिरी केली.

कार्यतत्परता, संयम आणि सेवाभावी वृत्ती हे त्यांचे गुणविशेष त्यांच्या एकूण कार्यातून दृग्गोचर होतात.

संदर्भ : 1. Kohli, A. B. Presidents of India, Delhi, 1986.

2. Palkhivala, N. A. We, the people: India the Largest Democracy, Bombay, 1984.

चौधरी, जयश्री