साटो, इसाकू : (२७ मार्च १९०१–३ जून१९७५). जपानचा पंतप्रधान (१९६४– ७२) व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म यामागुची प्रांतातील ताबुस या गावी सामुराई परंपरा व राजकारणाचा वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव साटो हिडेसुके असून त्यांचा हा तिसरा मुलगा होय. टोकिओ विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली (१९२४). सुरुवातीस त्याने काही किरकोळ स्वरूपाच्या नोकऱ्या केल्या. नंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दोन वर्षे (१९३४–३६) अभ्यासात व्यतीत केली. तसेच चिनव्याप्त जपानी प्रदेशात रेल्वे बांधणीच्या कार्यास मदत करण्यासाठी १९३८ व १९३९ मध्ये दौरा केला. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस (१९४१) ओसाका डिस्ट्रिक्ट रेल्वे ब्यूरोच्या संचालकपदी त्याची नियुक्ती झाली परंतु त्या पदावरून त्याला बडतर्फ करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर वाहतूक खात्याच्या

इसाकू साटो उपमंत्रिपदावर त्याची निवड झाली (१९४७) आणि सक्रिय राजकारणात तो आपाततः ओढला गेला. लिबरल पक्षातर्फे संसदेच्या (डायट) कनिष्ठ गृहावर तो निवडून आला व बांधकाम मंत्री झाला (१९५२). पुढे त्याने लिबरल पक्षाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला (१९५३). लिबरल पक्ष डेमॉक्रॅटिक पक्षात विलीन झाला आणि त्यातून लिबरल डेमॉक्रॅटिक हा संयुक्त पक्ष उदयास आला आणि अल्पावधीतच साटो त्या पक्षाचा सरचिटणीस झाला. या पक्षातर्फे साटोने अत्यंत परिश्रमाने किशी नोबुसुकी या आपल्या गुरुसमान ज्येष्ठ बंधूस पंतप्रधानपदी निवडून आणले (१९५७–६०). तत्पूर्वी त्याच्यावर जहाजबांधणी संस्थेकडून लाच घेतल्याचा आरोप झाला (१९५४) पण त्यातून तो निर्दोष झाल्यावर किशीच्या मंत्रिमंडळात त्याची अर्थंमंत्रिपदी निवड झाली परंतु सुरक्षा तहाच्या टीकेमुळे किशी मंत्रिमंडळ अल्पमतात येऊन इकेडा हायाटो पंतप्रधान झाला (१९६०). त्याच्याही मंत्रिमंडळात विज्ञान-अणुऊर्जा खात्याचा तसेच टोकिओ ऑलिंपिकचा तो प्रभारी मंत्री होता परंतु पुढे काही दिवसांतच इकेडा हायाटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्त झाला व संसदेने साटो याची पंतप्रधानपदी निवड केली (९ नोव्हेंबर १९६४).

पंतप्रधान झाल्यानंतर त्याने जपानची आर्थिक वृद्धी करण्याचे इकेडाचेच धोरण अवलंबिल्याने जपान जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता बनले. शिवाय त्याने अंतर्गत व परराष्ट्रीय धोरणांत अनेक लक्षणीय सुधारणा केल्या. जपानमधील विद्यापीठीय गोंधळ सामोपचाराने तसेच संसदेत बिल मांडून त्याने निकाली काढला. जपानचा व्यापार आशियाई देशांशी तसेच सोव्हिएट रशियाशी वाढवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जपानची पत वाढविली. द. कोरिया व चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केला. तसेच द. कोरियाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भरीव अर्थसाहाय्य दिले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांशी संबंध सुधारण्यासाठी त्याने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याबरोबर तह करून (१९६९) त्यांच्याकडून पूर्वीच्या (१९५१) सुरक्षा तहाची हमी घेतली. त्यानुसार ओकिनावा व रिक्यूक्यू बेटांसंबंधी चर्चा होऊन अमेरिकेने ओकिनावा बेट जपानला दिले मात्र तेथील शस्त्रास्त्रे व सैन्य हलविले नाही, त्यामुळे साटोची लोकप्रियता घटली. पुढे निक्सनने चीनला भेट दिली (१९७२), तेव्हा चीनबरोबरचे जपानचे संबंध तैवान प्रश्नामुळे बिघडले. शिवाय येनचे पुनर्मूल्यन आणि कापडनिर्यातीविषयीचा वाद यांमुळे साटोची अस्वस्थता वाढली. प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्ताने त्याने राजीनामा दिला. साटोने जपानची बलाढ्य राष्ट्र म्हणून पुनर्बांधणी केली, हे निर्विवाद सत्य होय.

साटोने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांवर मर्यादा घालून देशादेशांतील प्रश्न सामंजस्याने सोडवावेत, यासाठी प्रयत्न केले. त्याने ज्यांच्याकडे अण्वस्त्रे नाहीत, त्यांना ती देऊ नयेत, यांसाठी अण्वस्त्रधारी देशांशी करार केले. साटोने ‘नॉन-प्रॉलिफरेशन’ करारावर १९७० मध्ये स्वाक्षरी केली. या करारामुळे जपानमध्ये अण्वस्त्रांच्या उत्पादनावर, मालकीवर आणि वहिवाटीवर निर्बंध आले. त्यामुळे निःशस्त्रीकरणास चालना मिळून जागतिक शांततेस गती मिळाली. या त्याच्या कार्याबद्दल त्याला आयर्लंड प्रजासत्ताकाचा मुत्सद्दी ⇨शॉन मॅक्‌ब्राइड बरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९७४). त्यानंतर एका वर्षानेच अल्पशा आजाराने तो टोकिओ येथे मरण पावला.

संदर्भ : 1. Bagchi, Asoke K. Encyclopedia of Nobel Laureates 1901–1987, New Delhi, 1988.

2. Okamoto, Fumio, Sato Eisaku, Tokyo, 1974.

३. ठाकूर, अशोक नारायण, आल्फेड नोबेल आणि नोबेल पारितोषिक विजेते, पुणे, २००९. ४. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.

शेख, रुक्साना