लांगे, क्रिस्त्यान लूई : (१७ सप्टेंबर १८६९-११ डिसेंबर १९३८). नॉर्वेचा मानवतावादी इतिहासकार आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकारी. 

त्याचा जन्म स्टाव्हांगर (नॉर्वे) येथे झाला. त्याने क्रिस्त्यान-ऑस्लो-विद्यापीठातून (नॉर्वे) पदवी घेतली (१८९३). पुढे त्याने आंतरराष्ट्रीयवादाचा इतिहास या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली (१९१९). त्याने नॉर्वे हा स्वीडनपासून अलग करण्यासाठी स्थापन झालेल्या प्रागतिक युवा चळवळीत विद्यार्थिदशेत सक्रिय भाग घेतला. सुरुवातीस नॉर्वेजियन इन्स्टिट्यूटच्या इतिहास विभागात त्याने काही वर्षे अध्यापनाचे काम केले (१८९८-१९०९). ऑस्लो येथील नोबेल समितीचे पहिले सचिवपद त्याला देण्यात आले (१९००-०९). नोबेल संस्थेत लांगेने अत्यंत परिश्रमाने समृद्ध ग्रंथालय उभे केले (१९०९). पुढे त्याची द हेग येथे १९०७ मधील शांतता परिषदेत सदस्य म्हणून निवड झाली आणि दोन वर्षांनंतर त्याची नियुक्ती ब्रूसेल्स येथील आंतरसंसदीय संघाच्या महासचिवपदावर झाली (१९०९-३३). पहिल्या महायुद्धात आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करून जर्मनीने बेल्जियमवर आधिपत्य मिळविले (१९१४) तेव्हा लांगेला या संघटनेविषयी चिंता निर्माण झाली. त्याने या युद्धातील घडामोडींपासून ती अलिप्त ठेवावी, म्हणून लॉर्ड व्हिंडेल या अध्यक्षाशी पत्रव्यवहार केला. त्याची परिणती जिनीव्हा हे आंतरराष्ट्रीय शांततेचे स्थायी केंद्र बनविण्यात झाली. द हेग येथील परिषदेत अनाक्रमण व शस्त्रास्त्रांची निर्मिती यांवर प्रदीर्घ चर्चा झाली आणि लांगेची त्या परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पहिल्या महायुद्धातून जागतिक शांततेसाठी स्थापन झालेल्या राष्ट्रसंघावरही एक क्रियाशील सभासद म्हणून त्याने काम केले. त्याच काळात त्याने हिस्टरी ऑफ इंटरनॅशनॅलिझम या पुस्तकाचा पहिला खंड प्रसिद्ध केला (१९१९). त्यात  त्याने जागतिक शांततेचे महत्त्व प्रतिपादन केले असून आंतरराष्ट्रीयत्ववादासंबंधीची उद्बोधक माहिती दिली आहे. तसेच शांततावाद या शब्दाऐवजी आंरराष्ट्रीयत्व हा शब्द योजला आहे. स्वीडनच्या साम्राज्यातून नॉर्वेची मुक्तता (१९०५ ) करण्यातील त्याचे कार्य, तसेच ⇨फ्रित्यॉफ नान्सेन याच्याबरोबर केलेले शांतताकार्य महत्त्वाचे आहे. त्याचा उचित गौरव ⇨कार्ल याल्मार ब्रांटिंग याबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला (१९२१). या पारितोषिकाच्या वेळी केलेल्या भाषणात तो म्हणाला, ‘‘पॅसिफिझम-शांततावाद-हा शब्द मला फारसा रूचत नाही कारण भाषिक दृष्ट्या तो संमिश्र असून त्यातून शांततेच्या चळवळीची नकारात्मक बाजू स्पष्ट होते परंतु आमचा प्रयत्न  युद्धविरोधी चळवळ असा असून ही बाजू मांडण्यासाठी  ‘ अयुद्धवाद ’ हाच शब्द अधिक चपखल व योग्य आहे. शांततावाद हा शब्द संकुचित प्रवृत्तीचा दर्शक आहे. शांततावादी हा आंतरराष्ट्रीयत्ववादी असेलच असे नाही. आंतरराष्ट्रीयत्व ही सैद्धांतिक विचारसरणी आहे. तिला सामाजिक व राजकीय अशा दोन्ही बाजू आहेत. तीत राष्ट्रा-राष्ट्रांनी परस्पर सहकार्यानी आपल्या समस्या सोडवून जागतिक समाज संघटित कसा करता येईल, हे प्रधान तत्त्व आहे. अर्थात या माझ्या मताशी सर्व विचारवंत सहमत होतील, असे मी मानत नाही.’’

त्याने शांतताविषयक विपुल लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी पार्लमेंटरी गव्हर्न्मेंट अँड द इंटर-पार्लमेंटरी युनियन (१९११), द इंटर-पार्लमेंटरी युनियन (१९३२) इ. ग्रंथ लोकप्रिय झाले.

त्याने अखेरपर्यंत निःशःस्त्रीकरण आणि जागतिक शांतता यांसाठी  प्रयत्न  केले. या प्रयत्नांसाठी नोबेल पारितोषिकानंतर त्याला १९३२ मध्ये ‘ ग्रेटिअस मेडल ऑफ द नेदर्लंड्स ’हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळाले. तो ऑस्लो (नॉर्वे) येथे मरण पावला.

संदर्भ : शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.

शेख, रुक्साना