साम्राज्यवाद : ही एक राजनीती (धोरण) किंवा कृती वा तंत्र असून त्यानुसार एक देश वा लोकसमूह दुसऱ्या देशावर वा भूप्रदेशावर आधिपत्य प्रस्थापित करतो. एखाद्या समर्थ देशाने किंवा समूहाने लष्करी वा आर्थिक सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशाच्या भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेस सर्वसाधारणतः ही संज्ञा देण्यात येते. आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमांपलीकडे अन्य भूप्रदेशावर आधिपत्य वा नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यशाही, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ती कोणत्याही प्रदेशाच्या-देशाच्या शासनसत्तेने मग ती सत्ता लोकशाही, हुकूमशाही, राजेशाही वा अभिजनवर्गवादी स्वरुपाची असली, तरी तिचा उद्देश साम्राज्यविस्तार व वसाहत स्थापून त्या भूप्रदेशाचे आर्थिक शोषण करण्याचा तसेच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे हा असतो. त्यास वसाहतवाद असे म्हणतात. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरुप सर्वंकष होऊन त्याची परिणती नवसाम्राज्यवादात झाली.
साम्रा ज्यवाद वा साम्राज्यशाही या शब्दाची व्युत्पत्ती इंग्र जी शब्दकोशांत पुढीलप्रमाणे दिली आहे. मूळ लॅटिन इम्पेरेटर (Imperator) व त्यापासून बनलेला लॅटिन इम्पेरियम यांचा इंग्र जी प्रतिशब्द म्हणजे इम्पीरिअलिझम (साम्राज्यवाद) हा होय. वरील लॅटिन शब्दांचा अनुक्रमे शब्दार्थ सेनाधिपती व अधिक्षेत्र (राज्य) असा आहे. प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या काळात लढाईत विजयश्री खेचून आणणाऱ्या सेनापतीस इम्पेरेटर हा सन्मानदर्शक किताब देण्यात येई. पुढे तोच किताब सीझर, ऑगस्टस आदींच्या रूपांत सर्वसत्ताधीश या अर्थाचा झाला. त्यामुळे अभिजात लॅटिनोत्तर काळात या रोमानिक संज्ञेचा वापर सार्वभौम राजा, या अर्थी करण्यात येऊ लागला आणि त्याच्या आधिपत्याखालील क्षेत्रास साम्राज्य म्हटले जाऊ लागले. साम्राज्यविस्तारासाठी जे धोरण वा कृती सार्वभौम शासनसंस्था आचरणात आणी, त्यास स्थूलमानाने साम्राज्यवाद ही संज्ञा रू ढ झाली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : साम्राज्यवादाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळी इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकापासून इ. स. सहाव्या-सातव्या शतकांपर्यंतच्या काळात ईजिप्त, बॅबिलोनिया, ॲसिरिया, भारत, इराण, ग्रीस, रोम (इटली) आदी प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैभवशाली संस्कृत्या नांदत होत्या. त्यांपैकी ईजिप्शियन, ॲसिरियन व बॅबिलोनियन राजांनी साम्राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर खाल्डियन संस्कृतीच्या काळात नेबोपोलॅसर (इ. स. पू. ६१५–६०५) या राजाने असूर व निनेव्ह ही नगरे जिंकून ॲसिरियन सत्ता नष्ट केली आणि नव-बॅबिलोनियन साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर गादीवर आलेल्या दुसऱ्या नेबुकॅड्नेझर (कार. इ. स. पू. ६०५–५६२) या खाल्डियन सम्राटाने सिरिया व पॅलेस्टाइनची किनारपट्टी पादाक्रांत करून मेंफिस नगर घेतले. त्याच्या खाल्डियन सम्राज्याच्या वर्चस्वाखाली त्याच्या मृत्यूसमयी सबंध बॅबिलोनिया, दक्षिण ॲसिरिया, सिरिया व पॅलेस्टाइन या प्रदेशांचा अंतर्भाव होता. प्राचीन इराणमधील ⇨सायरस द ग्रेट (कार. इ. स. पू. ५५०–५२९) हा इतिहासकाळातील थोर सम्राट होय. त्याचे इराणी साम्राज्य विस्तृत प्रदेशावर होते. गीसचा काही भाग, भूमध्य समुद्रातील काही बेटे आणि काबूल व सिंधू यांच्या पलीकडेही त्याने मोहिमा केल्या होत्या. सायरसनंतर मॅसिडोनियाचा जगप्रसिद्घ सम्राट ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६–३२३) याने ग्रीसपासून भारतातील पंजाबपर्यंत विस्तीर्ण मुलूख जिंकून घेतला. त्याला या अवाढव्य सम्राज्याची प्रशासनव्यवस्था मार्गी लावण्यास अवधी मिळाला नाही तथापि सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे साम्राज्य हा प्राचीन गीसच्या वैभवशाली इतिहासाचाच एक भाग मानला जातो.
ग्रीकांप्रमाणे रोमनांनीही साम्राज्यशाहीचे प्रयोग केले. प्रजासत्ताक रोमचे आधिपत्य इटलीवर प्रथम स्थापन झाले आणि पुढे त्याचे सम्राज्यात रूपांतर होऊन यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडांतील अनेक देशांवर वर्चस्व प्रस्थापित झाले. वासाहतिक सम्राज्याची स्थापना आणि वृद्घी प्रजासत्ताकाच्या नेतृत्वाखालीच झाली. इ. स. पू. ६० ते ४९ दरम्यान पॉम्पी, ज्यूलिअस सीझर आणि क्रॅसस यांनी पहिले त्रिकूट (ट्रायमव्हरेट) बनवून संयुक्त रीत्या राज्यकारभार केला. पुढे सीझर कौन्सल झाला (इ. स. पू. ५९), त्याने अनेक नेत्रदीपक विजय मिळवून यूरोपात साम्राज्य सुस्थिर केले. ऑगस्टसपासून एकतंत्र अशी सम्राटांची सत्ता सुरू झाली. ऑगस्टसने रोमन राज्यकारभाराला जे बादशाही स्वरूप आणले होते, त्यानुसार पुढील सु. दोनशे वर्षे रोमन सम्राज्याला सुखशांतीची व समृद्घीची गेली. पुढे रोम ही राजधानी असलेले पश्चिम रोमन साम्राज्य हे रानटी टोळ्यांच्या कचाट्यात सापडले (इ. स. ४१०) आणि अखेर ते इ. स. ४७६ मध्ये पूर्णतः नष्ट झाले मात्र कॉन्स्टँटिनोपल हे राजधानी असलेले पूर्व रोमन साम्राज्य तुर्कांनी जिंकून घेईपर्यंत (१४५१) टिकून राहिले.
मध्ययुगीन साम्राज्यवाद : पश्चिम रोमन सम्राज्याच्या अस्तानंतर यूरोपात सम्राट हे बिरुद धारण करण्यालायक एकही व्यक्ती काही शतके नव्हती मात्र आठव्या शतकात ⇨शार्लमेन (७४२–८१४) या मध्ययुगीन यूरोपच्या इतिहासातील पराकमी सम्राटाने चर्चशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करुन पवित्र रोमन सम्राट म्हणून मान्यता मिळविली. त्यामुळे यूरोपच्या एकतेकडे वाटचाल सुरु होऊन त्याचे फँकिश साम्राज्य मध्य इटलीपासून उत्तर डेन्मार्क आणि पूर्व जर्मनीपासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरले होते. शार्लमेनच्या काळापर्यंत साम्राज्यवाद हा एकाधिकारशाही शासनसत्तेच्या अखत्यारीत एकवटला होता मात्र त्याच्या मृत्यूनंतर सम्राट नामधारी बनले. बायझंटिन सम्राट आठवा मायकेल (कार. १२५९–८२) याच्या काळात तुर्कस्तानचा सर्व भाग थोड्याच अवधीत ऑटोमन सम्राटाच्या आधिपत्याखाली गेला. ऑटोमन सम्राटांनी यूरोपमध्ये तुर्की अंमल प्रस्थापित करू न मॅसिडोनिया जिंकला. ही सत्ता पुढे चारशे वर्षे अबाधित राहिली तथापि त्यांना तेराव्या शतकात उद्भवलेल्या मंगोल सत्तेशी संघर्ष करावा लागला. चंगीझखान (११६७– १२२७) या मंगोल सम्राटाने काराकोरम येथे राजधानी करून उत्तर चीन, कोरिया, तुर्कस्तान हे देश जिंकून इराण, रशिया पादाकांत केले. जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या चंगीझखानाचे घोड्यावरू न पडून निधन झाले. कूब्लाईखान (कार. १२५९–९४) या मंगोल बलाढ्य राजाने चीन पादाकांत करुन यूआन घराण्याची स्थापना केली मात्र त्यास ऑटोमन साम्राज्य पूर्णतः जिंकता आले नाही. पुढे तुर्क-मंगोलाचा नेता ⇨तैमूरलंग (१३६६–१४०५) याने ऑटोमन सम्राज्याचा बराचसा मुलूख जिंकला. त्याचे साम्राज्य दक्षिणपूर्व आशियापासून पूर्व यूरोपपर्यंत पसरले होते. परंतु त्याची मुले व नातवंडे विशेष कर्तबगार नव्हती. त्यामुळे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हे साम्राज्य संपुष्टात आले.इ. स. सातव्या शतकात इस्लाम धर्माची स्थापना झाली. त्या धर्माच्या अनुयायांना सर्व जगावर आपले प्रभुत्व असावे, असे वाटू लागले. यामागची प्रेरणा धर्मप्रसार व प्रचार ही होती. मुहंमद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे वारस अबू बकर, उमर, उस्मान व अली यांच्याकडे खलीफापद आले. अबू बकरने सर्व सत्ता हाती घेऊन अरबस्तान कबजात आणण्याची खटपट केली आणि इराक घेतले. युफेटिसच्या पश्चिमेकडील सर्व शहरे ताब्यात येताच, त्याने पुढे सिरिया काबीज केले. त्याच्या मृत्यूनंतर (६३४) ⇨उमय्या खिलाफत (६६१–७५०), ⇨अब्बासी खिलाफत (७५०–१२५८) व ⇨फातिमी खिलाफत (९०९–११७१) यांतील खलीफांनी इस्लाम धर्माच्या प्रसाराबरोबर राज्यविस्तार करून राज्यकारभारात अनेक चांगल्या सुधारणा केल्या. इस्लामी कलेचा विकासही झाला. शेवटच्या नामधारी खलीफाला मंगोलानी १२५८ मध्ये मारले. मुसलमानांनी सु. एक हजार वर्षांच्या काळात जगातील जास्तीतजास्त भूप्रदेशावर सत्ता प्रस्थापित केली. प्रारंभी तरी त्यांच्या साम्राज्यवादात धर्मप्रसाराची प्रेरणा होती पण पुढे मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, शिया व सुन्नी पंथांतील संघर्ष, अंतर्गत कलह इ. गोष्टी घुसल्या. मुसलमानी सम्राज्याचे उत्तर काळातील विशेषतः दिल्ली सलतनत, मोगल काळ यांचे इतिहास वाचले असता, पूर्वीएवढा धर्मप्रसार त्यातून आढळत नाही परंतु साम्राज्यतृष्णा दिसते.
सामूहिक साम्राज्यवाद : प्रबोधनकाल, धर्मसुधारणा आंदोलन आणि औद्योगिक क्रांती यांनी यूरोप खंडातील मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले. वैचारिक-कलात्मक बदलांबरोबरच यूरोपच्या राजकारणाला-अर्थकारणाला कलाटणी मिळाली. यूरोपात राष्ट्र-राज्ये उदयाला आली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जर्मनी, इटली यांसारख्या नव्या राष्ट्र-राज्यांची निर्मिती झाली. औद्योगिक क्रांती याच सुमारास झाली. औद्योगिक क्रांतीच्या पूर्व संध्येला आणि काही अंशी क्रांतीबरोबर राष्ट्रीयत्वाची-स्वदेशाभिमानाची प्रेरणा निर्माण झाली आणि त्यातून सामूहिक साम्राज्यवादाचा–राष्ट्रप्रेरित साम्राज्यवादाचा–आविष्कार झाला. राष्ट्रीयत्वाच्या विकासाबरोबर साम्राज्यवादाला नवी दिशा मिळाली आणि वेगळा रंग आला. फ्रान्सची प्रदेशविस्तार आणि वैभव वाढविण्याची महत्त्वाकांक्षा चौदावा लूई आणि नेपोलियन बोनापार्ट यांनी प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे प्रयत्न केले. त्याप्रमाणे ऑस्ट्रिया जिंकून प्रशियाला जोडावा, हे फक्त फ्रीड्रिख द ग्रेटचे स्वप्न होते. तात्पर्य, या देशांतील सर्वच समाज आक्र मक बनू लागले. आपले राष्ट्र सर्वार्थाने प्रबल व्हावे, प्रसंगी इतर राष्ट्रांना अंकित करू न हे कार्य साध्य करता आले, तर ती देशभक्तीच होय. या उत्तेजित भावनेमधून राष्ट्रीय साम्राज्यवादाचा जन्म झाला आणि पुढे तो आक्रमक देशभक्तीचा अंगार दोन महायुद्घांदरम्यानच्या काळात जर्मनी, इटली, जपान अशा काही राष्ट्रांतून फुलविला गेला. या राष्ट्रीय भावनेच्या कल्पनेतून सामूहिक स्वरुपाची आक्रमक वृत्ती धारण केलेला साम्राज्यवाद अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उदयास आला. समर्थ नेतृत्वामुळे आणि अनुकूल परिस्थितीमुळे काही काळ एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची सत्ता विस्तारली, तरी तिला याच तत्त्वावर अन्य समाजांनी प्रखर विरोध केला. एक साम्राज्य जाऊन दुसरे निर्माण होण्याची क्रिया किंवा साम्राज्यस्थापनेचे सर्व स्पर्धात्मक उद्योग अयशस्वी होऊन अनेक छोटी राज्ये अस्तित्वात येणे, ही प्रकिया प्राचीन काळापासून अठराव्या शतकाअखेर अव्याहत चालू होती. हा इतिहास पाहता एकोणिसाव्या शतकात यूरोपियनांनी जगभर साम्रा ज्ये स्थापिली, यात नवल ते काय!
सोळाव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत यूरोपियनांनी काही वसाहती स्थापन केल्या. त्यांतून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबरच त्यांनी नवीन बाजारपेठांचा शोध घेतला. उदा., पोर्तुगालने भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील आणि आग्नेय आशियातील प्रदेश पादाक्रांत केला. स्पेनने लॅटिन अमेरिका व अमेरिकेच्या (असंसं ) दक्षिणेकडील भाग व्यापला. सतराव्या शतकात ब्रिटिश, फ्रेंच, डच यांनी ईशान्य अमेरिका व्यापली. डचांनी ईस्ट इंडीज बेटे ( इंडोनेशिया ) आणि ब्रिटिशांनी मुख्यत्वे भारत व्यापला. भारतातील त्यांच्या साम्राज्यवादाचे स्वरुप, ⇨दादाभाई नवरोजी यांनी पॉव्हर्टी अँड अन्बिटिश रूल इन इंडिया (१९०१ १९११) या पुस्तकात वर्णिले आहे. या ग्रंथातून दादाभाईंनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, करनीती, आर्थिक शोषण सिद्घांत (ड्रेन थिअरी) इ. मौलिक समस्यांचा ऊहापोह केला आहे. अठराव्या शतकात काही वसाहतींनी परकीय सत्तांना झुगारले परंतु ग्रेट ब्रिटन आणि उत्तर यूरोपीय राष्ट्रांनी शासकीय नियंत्रणाव्यतिरिक्त आपली अनौपचारिक बाजारपेठेची सामाज्ये सांभाळली. त्यांत प्रामुख्याने भूतपूर्व स्पॅनिश वसाहती होत्या. याशिवाय ग्रेट ब्रिटनने आफ्रिका-आशिया खंडांतील भूप्रदेशांत व्यापारी संबंध दृढतर केले. एकोणिसावे शतक हे प्रामुख्याने साम्राज्यवादाचा कळस ठरले. या काळात ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इटली, पोर्तुगाल आणि स्पेन यांनी जवळजवळ सर्व आफ्रिका खंड वाटून घेतला. शिवाय त्यांनी आग्नेय आशियातील काही भूप्रदेश आणि दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेटे व्यापली. स्पेनने अमेरिकेच्या स्पॅनिश-अमेरिकन युद्घातील पराभवानंतर शरणागती पतकरली आणि ग्वातेमाला, प्वेर्त रीको आणि फिलिपीन्स बेटे अमेरिकेला दिली. यानंतर एखाद-दुसरा अपवाद वगळता आशिया-आफ्रिका खंडांत स्वतंत्र असा देश उरला नाही. चीन व जपान हे राजकीयदृष्ट्या स्वतंत्र देश असले, तरी त्यांच्याही आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या नाड्या पाश्चिमात्यांच्या हाती गेल्या होत्या. यूरोपियनांच्या वसाहतवादाच्या निर्धारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदेश बळकावण्याच्या वृत्तीमुळे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. त्यातूनच पहिले महायुद्घ भडकले (१९१४). पुढे जर्मनी व इटली यांनी युद्घोत्तर काळात (१९३०–४०) अनुकमे ⇨ॲडॉल्फ हिटलर (१८८९–१९४५) व ⇨बेनीतो मुसोलिनी (१८८३–१९४५) यांच्या नेतृत्वाखाली साम्राज्यविस्ताराचा कार्यक्रम आखला. जर्मनीत हिटलरने जर्मन हे वांशिकदृष्ट्या उर्वरित सर्व मानवजातीपेक्षा श्रेष्ठ असून त्यांना जगावर राज्य करण्याचा हक्क आहे, असा दावा केला, तर मुसोलिनीने इटलीला रोमन सम्राज्याचा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे तिला गत-वैभव प्राप्त करू न देण्यासाठी जगावर अधिसत्ता गाजविण्याचा हक्क आहे, ती लायक आहे, असा युक्तिवाद केला. या दोघांनी आक्रमक साम्राज्यवाद प्रत्यक्ष कृतीत आणला. अर्थात या चढाओढीत जपानही मागे नव्हता. आशिया खंडातील सर्वांत पुढारलेले, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेले राष्ट्र साम्राज्यप्राप्तीसाठी चीनसारख्या शेजारी राष्ट्रावर हल्ले चढवीत होते. त्यांचा दावा असा होता की, उगवत्या सूर्याच्या राष्ट्रावर ( जपानवर )–ईश्वराची विशेष कृपादृष्टी असलेल्या राष्ट्रावर–त्याच जगन्नियंत्याने आशियाई लोकांच्या उद्घाराची जबाबदारी टाकली आहे. अशा मागासलेल्यांचा उद्घार करावयाचा असेल, तर त्यांना अंकित करणे अपरिहार्य आहे. तात्पर्य, या राष्ट्रांच्या आक्रमक साम्राज्यवादाला अशा प्रकारची तात्त्विक अधिष्ठाने देण्यात आली होती. हे सर्व दावे अशास्त्रीय व अतर्क्य होते परंतु त्यांच्या या साम्राज्यवादी ईर्षेमुळे दुसरे महायुद्घ भडकले (१९३९) आणि त्यात त्यांचा दारुण पराभव झाला (१९४५).
औद्योगिक क्रांतीनंतर यूरोपीय साम्राज्यवादाचे स्वरू प हे मूलतः आर्थिक होते. पूर्वीच्या साम्राज्यवादात आर्थिक लाभांचे हेतू नव्हते असे नाही पण ती सामाज्ये मुख्यत्वे वैयक्तिक वा राजकीय महत्त्वाकांक्षांची निर्मिती होती. सातत्याने आर्थिक शोषण करीत राहणारी यंत्रणा असे त्याचे कधीच स्वरूप नव्हते. अलेक्झांडरपासून नेपोलियनपर्यंतच्या आणि रोमन सम्राज्यापासून तुर्की (ऑटोमन) सम्राज्यापर्यंतच्या जुन्या सम्राज्यामागील राजनीती पाहता तीत जित प्रदेशाचे फक्त आर्थिक शोषण असा एककलमी कार्यक्रम वा हेतू क्वचितच आढळतो. मात्र एकोणिसाव्या शतकातील आणि त्यापुढील सामाज्ये ही मूलतः उभी राहिली, ती व्यापारी पायावर आणि आर्थिक शोषणाकरिता. त्यांना कच्चा माल हवा होता आणि पक्क्या मालासाठी हुकमी बाजारपेठ आवश्यक होती. ती त्यांनी आपल्या सम्राज्याद्वारे हस्तगत केली आणि भरमसाठ नफा कमावला. जुन्या आणि नव्या साम्राज्यवादांतील हा मूलभूत फरक होय.
दुसऱ्या महायुद्घानंतर मोठ्या प्रमाणावर वासाहतिक प्रदेशांनी स्वातंत्र्य मिळविले. याला अनेक कारणे असली, तरी मुख्यत्वे त्या देशांतील राष्ट्रीयत्वाची भावना, स्वातंत्र्य चळवळी आणि यूरोपीय राष्ट्रांची युद्घात झालेली मनुष्यहानी व आर्थिक कमजोरपणा ही होत. शिवाय स्वयंनिर्णय अथवा आपल्या जातीच्या-वंशाच्या-धर्माच्या वा राष्ट्राच्या भवितव्याचे नियमन करणे, हा आपला अधिकार आहे, ही जाणीव व भावना वासाहतिक प्रदेशात वेगाने प्रसृत झाली. तिचा प्रकर्षाने आविष्कार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आढळतो. या काळात काही तुरळक प्रदेश वगळता बहुतेक राष्ट्रांनी स्वातंत्र्य मिळविले आहे. साम्राज्यवाद हा बव्हंशी संपला आहे तथापि काही बडी राष्ट्रे वसाहतींचा ताबा गेल्यानंतरही काही आर्थिक आणि लष्करी मदत देत आहेत. ह्यामुळे तेथील राजकारणावर त्यांचे अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे हासुद्घा एक प्रकारचा आर्थिक साम्राज्यवाद होय, असे काही तज्ज्ञ मानतात. या संदर्भात अमेरिका आणि रशिया हे अगेसर देश होत. त्यांनी दुसऱ्या महायुद्घात दोस्त राष्ट्रांकडून आक्रमक इटली, जर्मनी व जपान यांचा साम्राज्यवाद संपवून त्यांचा दारुण पराभव केला पण फ्रान्स, ग्रेट ब्रिटन वगैरे साम्राज्यसत्ता दुर्बल झाल्यानंतर लष्करीदृष्ट्या संपन्न असलेले हे दोन समर्थ देश पुढे सरसावले. त्यांना यूरोपची स्थिती सुधारणे, आशिया आणि आफ्रिका खंडांतील नवस्वतंत्र राष्ट्रांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समर्थ बनविणे, हे उदात्त निमित्त मिळाले आहे. या महत्त्वपूर्ण कार्याच्या निमित्ताने अमेरिका व रशिया यांत स्पर्धा सुरु आहे. मागासलेल्या अविकसित देशांत लोकशाही कशी स्थिरावेल वा नसल्यास कशी स्थापन होईल, याची चिंता अमेरिकेला आहे, तर रशिया आर्थिकदृष्ट्या जेरीस आला, तरीसुद्घा भांबावलेली राष्ट्रे कम्युनिझमकडे वळून आपल्या प्रभावाखाली अंकित कशी होतील, हे पाहू लागला. यातून गटबांधणीचे राजकारण उद्भवले. मुक्तहस्ताने आर्थिक साहाय्य आणि लष्करी मदत अविकसित राष्ट्रांना दिली गेली. नाटो आणि वॉर्सा यांसारखे करार, कोरियातील युद्घप्रसंग, बर्लिन शहराचे विभाजन, हंगेरीतील उठाव, क्यूबातील क्रांती आदी जागतिक घडामोडींमधून अमेरिका व रशिया यांमधील सत्तास्पर्धा स्पष्ट झाली. यांतूनच भांडवलशाही-लोकसत्ताक दुबळ्या देशांनी आपल्या प्रभावाखाली रहावे, असा अमेरिकेचा इरादा तर साम्यवादी राष्ट्रांनी आपल्या कच्छपि असावे, हा रशियाचा प्रयत्न होता. तो एक प्रकारचा साम्राज्यवादच होय. त्यास काही राजकीय पंडित नव-साम्राज्यवाद म्हणतात. यात प्रत्यक्ष राज्यसत्तेऐवजी सत्ताधीश वा त्या देशाची शासनसंस्था या समर्थ देशांच्या तंत्रानुसार अंतर्गत व परराष्ट्र व्यवहार निश्चित करतात.
रशियाचा हा साम्यवादी साम्राज्यवाद गार्बाचॉव्ह राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या १९८७ मधील खुलेपणाच्या धोरणामुळे हळूहळू संपुष्टात आला आणि पूर्व यूरोपातील राष्ट्रांनी रशिया आणि कम्युनिझम या दोहोंना झुगारून दिले मात्र अमेरिकेचा आर्थिक-लष्करी साम्राज्यवाद एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अद्यापि चालू आहे. किंबहुना आपणच एकमेव सर्वश्रेष्ठ महासत्ता आहोत आणि जगाच्या कल्याणाची सर्व जबाबदारी आपलीच आहे, अशा थाटात त्या देशाची वाटचाल चालू आहे. हे अमेरिकेच्या अफगाणिस्तानावरील (१९९८) मोहिमेतून तसेच इराकवरील (२००२) मोहिमेतून आणि पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना दिलेल्या शस्त्रास्त्रांतून व ड्रोन हल्ल्यातून (२०१०-११) स्पष्ट झाले आहे कारण या चढाईला संयुक्त राष्ट्रसंघासह जर्मनी, फ्रान्स, चीन वगैरे मोठ्या देशांचा विरोध असूनही अमेरिकेने ह्या कारवाया केल्या आहेत. यामागील अमेरिकेचा हेतू लष्करी शस्त्रास्त्रांना बाजारपेठ निर्माण करणे, अण्वस्त्रे आणि कूड ऑइलच्या (पेट्रोल) स्रोतांवर वर्चस्व मिळविणे हा असावा, असे तज्ज्ञ मानतात.
साम्राज्यवादाची सैद्घांतिक चर्चा : आधुनिक साम्राज्यवादाची सैद्घांतिक चर्चा ⇨न्यिकलाय लेनिन (१८७०–१९२४) याने इम्पीरिअलिझम, द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटॅलिझम (१९१६) या पुस्तकात केली. त्याच्या मते भांडवलशाहीचा विकास एका नव्या व अंतिम अवस्थेस पोहोचला असून स्पर्धेची जागा मक्तेदारीने घेतली आहे. विद्यमान भांडवलशाहीचे स्वरुप आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारले असून प्रगत भांडवलशाही देशांमधील भांडवलसंचयामुळे अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नफ्याच्या शोधार्थ भांडवल गुंतविले जाते. त्यातूनच साम्राज्यवादाची निर्मिती होते आणि असमान विकास होऊन जागतिक युद्घे भडकतात. लेनिनने लोकप्रिय केलेल्या साम्राज्यवादाच्या उपपत्तीत भांडवलशाहीच्या अंतिम वैकासिक टप्प्यातील साम्राज्यवाद ही अपरिहार्य घटना किंवा फल होय. लेनिनच्या साम्राज्यवाद संकल्पनेवर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जे. ए. हॉब्सन (१८५८–१९४०) आणि जर्मन मुत्सद्दी रुडॉल्फ हिलफर्डिंग (१८७७–१९४१) यांच्या अनुकमे इम्पीरिअलिझम (१९०२) आणि फायनान्स कॅपिटल (१९१०) या ग्रंथांचा प्रभाव आढळतो. यातूनच त्याची ‘भांडवलशाहीची मक्तेदारी’ ही संकल्पना प्रसृत झाली. लेनिनव्यतिरिक्त अन्य लेखकांनी साम्राज्यवादाची सैद्घांतिक चर्चा करताना आंतरराष्ट्रीय संबंधांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, इतिहासकालापासून समर्थ राष्ट्रांची साम्राज्यविस्तार ही सहजप्रवृत्ती असून केवळ भांडवलशाही विकासाची अंतिम अवस्था किंवा टप्पा नाही. ऑस्ट्रियन–अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ ⇨योझेफ आलोईस शुंपेटर म्हणतो की ‘विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सरंजामशाहीच्याप्रभावाखालील यूरोपीय राष्ट्रे आणि जपान यांत साम्राज्यवादी प्रवृत्ती होती’. अनोमेयरया इतिहासकाराने नव-साम्राज्यवादाचे प्रमुख कारण सरंजामशाहीचा ऱ्हास हे दिले आहे कारण सरंजामदारवर्गाने सामाजिक प्रतिष्ठेसाठी लष्कराच्या सामर्थ्यावर साम्राज्यविस्ताराची टूम काढली.
साम्राज्यवादाचे परिणाम : या वादाचे दूरगामी परिणाम झाले. सत्तासंघर्षातून दोन महायुद्घे झाली आणि मनुष्यहानीबरोबर जपान, जर्मनी आणि इटली यांसारख्या राष्ट्रांची मानहानी होऊन ती परावलंबी बनली. साम्यवादाचा प्रसार झाला आणि अमेरिका-रशिया या दोन समर्थ शक्ती उदयाला आल्या. राष्ट्रीयत्वाची भावना उदयास येऊन विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक छोटे-मोठे देश स्वतंत्र झाले. साम्राज्यवादाच्या काळात सत्ता गाजविणाऱ्या देशांनी वासाहतिक देशांत दळणवळण, संदेशवहन व परिवहन यांच्या सेवा-सुविधा निर्माण केल्या. त्यांचा हेतू लष्कराच्या हालचालींना त्या उपयुक्त व्हाव्यात असा असला, तरी सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळाला. याशिवाय जेत्या देशांनी विद्यापीठे स्थापून शिक्षणाच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या. साम्राज्यांतर्गत देशांतील प्राचीन अवशेष, आदिवासी यांच्या संशोधनात रस घेतला. तसेच एतद्देशियांना आरोग्यविषयक काही सुविधा दिल्या. त्यामुळे या वासाहतिक देशांमधून आधुनिक ज्ञानाचा स्रोत काही प्रमाणात निर्माण झाला. आर्थिक पिळवणुकीतून या गोष्टी आल्या असल्या, तरी त्याचा लाभ काही अंशी लोकशाहीच्या भावी वृद्घीस निश्चितच कारणीभूत ठरला.
पहा : अमेरिकेची संयुक्त संस्थाने बायझंटिन साम्राज्य रशिया रोमनसंस्कृति वसाहतवाद वसाहतीचे स्वराज्य.
संदर्भ : 1. Etherington, Norman, Theories of Imperialism : War, Conquest and Capital, London, 1984.
2. Howard, Michael, The Lessons of History, New Haven, 1991.
3. Johnson, Paul, Modern Times : The World from the Twenties to the Nineties, New York, 1991.
4. Nasle, John D. Introduction to Comparative Politics : Political System Performance in Three Worlds, Chicago, 1992.
5. Schumpeter, Joseph, Imperialism and Social Classes, New York, 1951.
6. Snyder, Jack, Myths of Empire : Domestic Politics and International Ambition, New York, 1991.
7. Winks, Robin, W. Ed. The Age of Imperialism, Englewood Cliffs, (N. J.) 1969.
८.जावडेकर, शं. द. आधुनिक राज्यमीमांसा, खंड-२, पुणे, १९६९.
९. राणे, गोपाळ, नवसाम्राज्यवाद, पुणे, १९९८.
देशपांडे, सु. र.
“