सत्याग्रह : अन्यायाविरूद्ध शांतवृत्ती आणि दृढनिश्चय यांव्दारे प्रतिकार करण्याचा एक अभिनव अहिंसक मार्ग. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह होय. ही संकल्पना पूर्णतः महात्मा गांधींची देणगी असून तिचा उद्घोष व उपयोग त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केला. प्राचीन भारतीय वाङ्‌मयात, विशेषतः पौराणिक कथा-आख्यायिकांतून सत्याग्रहाची काही उदाहरणे आढळतात तसेच त्यात सत्यवत, सत्यनिष्ठा, सत्यवन्त, सत्यसंघ वगैरेंचा उल्लेख येतो परंतु सत्याग्रह या शब्दाचा अर्थ त्याहून व्यापक आहे. प्राचीन काळी आत्मक्लेशाचा मार्ग अनुसरून प्रल्हाद व राजा हरिश्चंद्र यांनी अन्यायाविरूद्ध सविनय प्रतिकार केलेला दिसतो. ऐतिहासिक काळात गौतम बुद्ध व महावीर यांनी अहिंसेची शिकवण दिली आणि सत्याग्रहाची दिशा दर्शविली. येशू क्रिस्ताच्या जीवनात सत्याग्रहाचे तत्त्व अधिक प्रगल्भ व सुस्पष्ट झालेले दिसते. त्याने व सॉकेटिसने सत्यासाठी आत्मबलिदान केले. साधुसंतांनीही अन्यायाचा प्रतिकार शांतपणे व प्रेमभावनेने केला. प्रेषित व संत यांनी आपल्या जीवनात सत्याग्रह ही व्यक्तिगत धार्मिक प्रवृत्ती मानून तिचा अंगीकार केला. ‘ अहिंसा परमो धर्मः’ आणि ‘ सत्यान्नास्ति परो धर्मः ’ या उक्तींतून त्यांच्या जीवनाचे मूलभूत सूत्र आढळते तथापि राजकीय, सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रांतील अन्याय किंवा समस्या सोडविण्यासाठी सत्याग्रहाचा पद्धतशीर रीत्या पाठपुरावा केल्याची प्राचीन उदाहरणे क्वचित दिसतात.

महात्मा गांधींनी अनुसरलेली सत्याग्रह ही एक वृत्ती आहे. तिचा उगम राग, लोभ, अनुराग, माया, प्रीती आदी कौटुंबिक भावनांत दिसतो. आपलेपणा, आदर, प्रेम, औदार्य हे कौटुंबिक जीवनाचे आधारस्तंभ असून प्रेम अथवा माया यांचे साफल्य कृतींतून व्यक्त होते. ज्यांच्याविषयी आदराची व प्रेमाची भावना असते त्यांची सेवा करणे, त्यांच्यासाठी त्याग करून आत्मसमर्पण करणे, यातच प्रेमाची सफलता आहे. आदर्श कौटुंबिक जीवनात अनुस्यूत असलेली तत्त्वे मनुष्याच्या सर्व व्यवहारांत कृतीत आणणे, ही खरी सत्याग्रहाची जीवन प्रवृत्ती होय. म. गांधीजींनी कौटुंबिक जीवनातूनच सत्याग्रहाचा धडा घेतला आणि जीवनातील सर्व समस्यांसाठी सत्याग्रहाचा उपयोग केला. त्यांना ही संकल्पना कशी सुचली, याविषयी त्यांनी माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रात लिहिले आहे. म. गांधीजींच्या मनात बालपणीच अपकाराविरूद्ध उपकार करणे, हे शामलभटांच्या गुजराती कवितेतील वचन ठसले होते. ते म्हणतात, ‘ मी माझ्या पत्नीकडून अहिंसेचा (सत्याग्रहाचा) मार्ग शिकलो. अहिंसेच्या बाबतीत ती माझी गुरू बनली आणि तिने स्वतःच्या बाबतीत अनाहुतपणे उपयोगात आणलेल्या सत्याग्रहाच्या नियमांचा विस्तारच काय तो मी दक्षिण आफ्रिकेत केला ’. पुढे बायबलभगवद्‌गीता यांच्या वाचनाने त्यांच्या विचाराला दृढपणा आला. टॉलस्टॉयच्या ‘ तुमच्या अन्तःकरणात ईश्वरी साम्राज्य वसत आहे ’ या विधानाने त्यास निश्र्चित दिशा मिळाली.

म. गांधी द. आफ्रिकेतील चळवळीला ‘ निःशस्त्र प्रतिकार ’ (पॅसिव्ह रेझिस्टन्स) म्हणत. भारतात आल्यानंतर त्यांनी या शब्दाला समर्पक नाव सुचविण्याविषयी इंडियन ओपिनियन या नियतकालिकातून जाहीर आवाहन केले, तेव्हा अनेक नावे सुचविण्यात आली पण ती त्यांना पसंत नव्हती. त्याच वेळी मगनलाल गांधींनी ‘ सदाग्रह ’ हे नाव सूचित केले. महात्माजींनी त्यात किरकोळ फेरफार करून निःशस्त्र प्रतिकाराला चपखल असे ‘ सत्याग्रह ’ हे नाव निश्चित केले. सत्यामध्ये शांतीचा अंतर्भाव होतो. कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरला म्हणजे बल प्राप्त होते. सत्याग्रह म्हणजे शांतिमार्गाने बलप्राप्तीचा उपाय, साधन किंवा मार्ग होय. महात्मा गांधींनी राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत अहिंसेचा आणि सत्याचा सिद्धांत हिरिरीने व निष्ठेने आणला. त्यांनी अहिंसक सत्याग्रहाला सामाजिक शक्तीचे रूप देऊन स्वातंत्र्य व स्वतःचे हक्क यांसाठी लढ्याचे एक प्रभावी हत्यार निर्माण केले. त्यांनी सत्याग्रहाला तात्त्विक भूमिकेचे अधिष्ठान दिले असून त्याचे संपूर्ण शास्त्र बनविले आहे. केवळ निःशस्त्र प्रतिकार म्हणजे सत्याग्रह नव्हे. सत्याग्रह हे एक जीवन दर्शन आहे. ती एक मूलगामी व सर्वंकष निष्ठा आहे. मनुष्याची सत्प्रवृत्ती व समंजसपणा यांवरील विश्र्वास हा सत्याग्रहाचा मूलाधार आहे. शुद्ध साध्याकरिता शुद्ध साधनेच उपयुक्त ठरतात शुद्ध साध्याकरिता अशुद्ध साधने उपयोगात आणल्यास साध्यही अशुद्ध बनते आणि साध्य दूर जाते. म्हणून सत्याग्रह हेच शुद्ध साधन होय. सत्याग्रह म्हणजे सत्याकरिता अहिंसेच्या मार्गाने असत्याचा प्रतिकार करणे होय.ज्या व्यक्तींच्या ठिकाणी नैतिक दृष्टया अयोग्य व गर्ह्य परिस्थितीचा प्रतिकार करण्याची शक्ती असते, तेच सत्याग्रहाचे खरे अधिकारी होत. त्यांची शरीरक्लेश सहन करण्याची शक्ती हा आत्मशक्तीचा एक भाग आहे. कित्येक वेळा शरीरक्लेश सहन करून प्रतिकार करणारा प्रतिपक्षावर जबरदस्तीही करू शकतो. त्याचा आग्रह अविवेकी असू शकतो. त्याची सत्याची कल्पना चुकीचीही असू शकते. त्यात असत्यही भरलेले असण्याची शक्यता असते. म्हणून खऱ्या सत्याग्रहीला नैतिक दृष्टया योग्य काय व अयोग्य काय, हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पतकरावी लागते आणि आपल्या प्रतिकाराच्या उद्देशात असत्य दिसल्यास माघार घेण्याची तयारीही असावी लागते. माघार घेण्यासाठी सुद्धा धैर्य लागते. निःशस्त्र प्रतिकारसुद्धा हिंसात्मक म्हणजे जबरदस्ती करणारा असतो. त्यात अत्या-चारही असतो. सत्य हे तत्त्वतः शत्रूलाही मान्य असावे लागते कारण विवेकबुद्धीची देणगी मानवाला प्राप्त झालेली आहे. शिवाय सत्याग्रहाला मर्यादा नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील गांधीजींच्या सामुदायिक सविनय कायदेभंगाच्या सत्याग्रहाच्या सामर्थ्यातून हे दिसून येते.

म. गांधीजींच्या सत्याग्रही जीवनदृष्टीला ‘ अध्यात्मनिष्ठ व्यक्तिवाद ’ असे अत्यंत समर्पक नाव काही विव्दानांनी दिले आहे कारण या विचारप्रणालीत व्यक्तीची अंतःप्रेरणा, तिचे नैतिक सामर्थ्य, निर्माणक्षमता आणि व्यक्तीचे हृदयपरिवर्तन यांना विशेष प्राधान्य असते. गांधीजींची ही संकल्पना वैश्र्विक स्तरावर लोकप्रिय झाली असून सर्वमान्य झाली आहे. तिचे अनुकरण मार्टिन ल्यूथर किंग, केनेथ कौंडा वगैरे भारतेतर देशांतील नेत्यांनी केले आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे साररूप त्यात आढळते.

पहा : गांधी, महात्मा.

संदर्भ : 1. Adi, H. A. Probe into the Gandhian Concept of Ahimsa, Calcutta, 1962.

2. Anand, Mulk Raj, Humanism of M. K. Gandhi, Varanasi, 1971.

3. Borman, William, Gandhi’s Non-Violence, New York, 1986.

4. Erikson, Erink K., Gandhi’s Truth : on the Origins of Militant Non-Violence, Nortan, 1970.

देशपांडे, सु. र.