ब्रांटिंग, कार्ल याल्मार: (२३ नोव्हेंबर १८६०-२४ फेब्रुवारी १९२५). स्वीडनचा पंतप्रधान (१९२० १९२१ – २३ व १९२४ – २५) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म स्टॉकहोम येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. स्टॉकहोम आणि अप्साला विद्यापीठांत विज्ञान शाखेतील पदवी घेऊन त्याने वृत्तपत्रीय व्यवसायात पदार्पण केले (१८८३) आणि लवकरच तो टायडन या दैनिकाचा संपादक झाला. त्यानंतर १८८६ मध्ये तो सोशल डेमोक्रॅटन या दैनिकाचा संपादक झाला. या नियतकालिकाचा तो १९१७ पर्यंत संपादक होता. त्यामुळे राजकीय घडामोडींकडे त्याचे लक्ष वेधले गेले आणि तो राजकारणाकडे आकृष्ट झाला. त्याने सोशल डेमॉक्रटिक पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला (१८८९) व तो संसदेच्या कनिष्ठ गृहावर प्रथम निवडून आला (१८९६). १९०२ पर्यंत तो या पक्षाचा संसदेत एकमेव सभासद होता. नॉर्वे स्वीडनमधील संघर्षात त्याने नॉर्वेची बाजू मांडली आणि नॉर्वेला स्वतंत्र अस्तित्व असावे, या मताचा पुरस्कार केला (१८९५). त्याबद्दल त्याला तीन वर्षांची कारागृहवासाची सजा झाली. अखेर त्याने हा वैध प्रश्न समझोत्याने व शांततामय मार्गांनी सोडविला आणि नॉर्वेचे स्वीडनपासून विभाजन केले (१९०५). तो आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला (१९०७). यानंतर त्याने आपल्या पक्षातर्फे प्रौढ मताधिकार, समानसंधी व प्रत्यक्ष मताधिकार या त्रिसूत्रीची कामगारवर्गात मोहीम उघडली. त्याबरोबरच प्रागतिक उदारपक्षांचे सहकार्यही त्याने मिळविले. परिणामतः १९१७ मध्ये उदारमतवादी समाजवादी पक्षांचे संमिश्र शासन स्वीडनमध्ये सत्तारूढ झाले. त्यात त्याला अर्थमंत्रिपद देण्यात आले. घटनेमध्ये त्याने काही दुरुस्त्या करून स्वीडनमध्ये सामाजिक लोकशाही असावी या मताचा पाठपुरावा केला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने तटस्थतेचा पुरस्कार केला आणि स्वीडनला कोणत्याही गटात सामील होऊ दिले नाही. लोकशाही व शांतता यांचा त्याने सातत्याने प्रचार व प्रसार केला. युद्धानंतर पॅरिस येथील शांतता परिषदेत तो स्वीडनतर्फे सहभागी झाला (१९१९). राष्ट्रसंघात त्याने स्वीडनचे प्रतिनिधित्व केले आणि बर्न येथील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले (१९१९). ॲलंड बेटासंबंधीचा फिनलंड व स्वीडन यांमधील संघर्ष मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या लंडन येथील परिषदेसही तो हजर होता (१९२०) आणि हा प्रश्न त्याने अत्यंत समझोत्याने व शांततापूर्ण मार्गाने सोडविला. महायुद्धानंतर स्वीडनमध्ये त्याने पहिल्या समाजवादी लोकशाही पक्षांचे शासन स्थापन केले (१९२०) परंतु त्याच वर्षी सप्टेंबर मधील निवडणुकीत त्याचा पराभव झाला. पुढे १९२१ च्या सप्टेंबर मध्ये तो पुन्हा पंतप्रधान झाला. मध्यंतरीचा मे १९२३ ते सप्टेंबर १९२४ हा काळ वगळता तो अखेरपर्यंत पंतप्रधान होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्याने राजीनामा दिला (२५ जानेवारी १९२५) आणि काही दिवसांतच तो स्टॉकहोम येथे मरण पावला.

अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी ब्रांटिंगचा दृष्टिकोन विशाल व उदात्त होता. या दृष्टिकोनाला एखाद्या विशिष्ट तत्वप्रणालीचे रूप द्यावे, असे त्याला कधीही वाटले नाही तो सुरुवातीपासूनच निःशस्त्रीकरण, शांततामय सहजीवन व सामाजिक लोकशाही यांचा सातत्याने पुरस्कार करीत होता. त्यासाठी त्याने प्रसंगोपात्त तुरुंगवास भोगला पण तडजोड स्वीकारली नाही. या त्याच्या कार्याचा उचित गौरव त्याला १९२१ चे जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक ⇨ क्रिस्त्यान लूइस लांगे याच्याबरोबर देऊन करण्यात आला.

शेख, रुक्साना