ॲन्झूस करार : ॲन्झूस करार म्हणजे १ सप्टेंबर १९५१ ला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या पॅसिफिक महासागराशी संबंधित तीन देशांनी आपल्या रक्षणासाठी केलेला लष्करी करार. ह्या देशांच्या इंग्रजी नावांच्या आद्याक्षरांवरून हे नाव (ANZUS) प्रचलित झाले. ह्यासच ‘पॅसिफिकमधील त्रिपक्षीय संरक्षण तह’ असेही म्हणण्यात येते.

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानशी झालेल्या तहावर ह्या तीन राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या त्याच सुमारास हा लष्करी करार केलेला आहे. जपानच्या पुनरुत्थानामुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या राष्ट्रांना भीती वाटू लागली. त्याचप्रमाणे १९४७ नंतर भारतासारखे आशिया खंडातील मोठे देशही स्वतंत्र झाले. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट प्रस्थापित झाली. पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्याचा लोप होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती व त्यामुळे ब्रिटन ह्या राष्ट्रांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, हेही दिसत होतेच. अशा राजकीय परिस्थितीच्या जाणिवेने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या दोन गोऱ्या राष्ट्रांनी आपले अस्तित्व व ह्या प्रदेशांतील महत्त्व अबाधित राहावे, ह्यासाठी हा लष्करी करार केला.

ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिले उदाहरण आहे. ब्रिटनला प्रतिनिधित्व दिल्यास पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्यातील देश स्वायत्त झाल्यावर त्यांस प्रतिनिधित्व द्यावे लागले असते. त्याचप्रमाणे ह्याच प्रदेशात हितसंबंध असलेल्या फ्रान्ससारख्या देशांना वगळणेही कठीण झाले असते. ब्रिटनला ह्या करारातून वगळण्यात आले, एवढेच नव्हे, तर ह्या करारात आणखी कोणासही समाविष्ट करू नये, असेही ह्या तीन राष्ट्रांनी ठरविले होते. पॅसिफिक महासागरात वसलेल्या ह्या देशांना आशियाई देशापासून संरक्षण मिळावे, हा ह्या करारामागील हेतू स्पष्ट दिसतो. सीटोच्या लष्करी करारामुळे आग्नेय आशियातील कम्युनिस्ट-प्रसारात प्रतिबंध घातला गेला व त्या करारात हे तीनही देश सहभागी आहेत. तरी पण ॲन्झूस करार अजून कार्यवाहीत आहे, ह्यावरूनही वरील अनुमान योग्य वाटते.

नरवणे, द. ना.