ऑस्टिन, जॉन : (३मार्च १७९०–? डिसेंबर १८५९). इंग्लंडमधील एक प्रख्यात विधितत्त्वमीमांसक. स‌फक परगण्यातील क्रीटिंगमील ह्या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. १८०६ मध्ये तो सैन्यात भरती झाला. १८११ मध्ये तेथील नोकरीचा त्याने राजीनामा दिला आणि लंडन येथे कायद्याच्या अभ्यासास सुरुवात केली. कायद्याबरोबर इतिहास, राज्यशास्त्र व नीतिशास्त्र ह्या विषयांचेही त्याने अध्ययन केले. १८१८ मध्ये त्याने सेअरा टेलर ह्या बुद्धिमान मुलीशी विवाह केला. तिच्यामुळे त्याच्या भावी आयुष्यास एक वेगळी दिशा व वळण मिळाले. ह्या सुमारास तत्कालीन उपयुक्ततावादी विचारवंत जेरेमी बेंथॅम व जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्यांच्याशी त्याचा दृढ परिचय झाला. नव्याने स्थापन झालेल्या लंडन विद्यापीठात न्यायशास्त्राचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली (१८२६–१८३२). दरम्यान न्यायशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तो काही दिवस बॉन (जर्मनी) येथे राहिला. पुढे त्याची सरकारी आयोगांवर नेमणूक झाली. ‘क्रिमिनल लॉ कमिशन’ व ‘माल्टा कमिशन’ यांचा तो स‌भासद होता. १८३६ मध्ये तो माल्टाला गेला, परंतु प्रकृती बिघडल्याने त्यास‌ १८४८ मध्ये इंग्लंडला परत यावे लागले. त्यानंतर अखेरपर्यंत तो केंब्रिज येथे राहिला.

त्याने प्रॉव्हिन्स ऑफ ज्युरिसप्रुडन्स डिटरमिन्ड (१८३२) व लेक्चर्स ऑन ज्युरिसप्रुडन्स (१८६१-६३) ही पुस्तके लिहिली. त्यांपैकी दुसरे पुस्तक त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. वरील पुस्तकांत त्याने न्यायशास्त्रासंबंधी स‌विस्तर चर्चा केली असून त्यास शास्त्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मते प्रत्यक्षानुसारी कायदा हाच विधिनियमांच्या व्याख्येत बसू शकतो. त्या कायद्यात सार्वभौम स‌त्तेने प्रजाजनांस दिलेल्या आज्ञा असतात. रुढी, चालीरीती ह्यांचा स‌मावेश कायद्यात करु नये. सार्वभौम स‌त्तेची आज्ञा म्हणजे कायदा, असे गृहीत धरुन त्याने एक राज्य दुसऱ्याराज्यासंबंधी कायदे करु शकत नाही. असे प्रतिपादिले कारण कायदेशीर दृष्ट्या राज्याचे सार्वभौमत्व निरंकुश व स‌र्वश्रेष्ठ असते. न्यायशास्त्राचा पद्धतशीर व शास्त्रशुद्ध अभ्यास करुन कायदा व नीतिशास्त्र ह्यांहून न्यायशास्त्र वेगळे आहे, हे त्याने दाखविले. ह्याकरिता प्रथमच त्याने विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब केला, म्हणून त्यास पहिला कायदेपंडित म्हणतात. राज्यशास्त्राच्या दृष्टीनेही ऑस्टिनची सार्वभौमत्वाची कल्पना महत्त्वाची आहे. ऑस्टिनचे हे विचार शास्त्रशुद्ध असले, तरी अपुरे व स‌दोष वाटतात, अशी त्यांवर टीका झाली. त्याची पुस्तके अभ्यासपूर्ण असूनही विशेष लोकप्रिय झाली नाहीत. तथापि पुढील पिढ्यांच्या न्यायशास्त्रीय व विधिशिक्षणावर त्याच्या लेखनाचे दूरगामी परिणाम झालेले दिसतात.

संदर्भ : 1. Brown, Jethro, Ed. The Austinian Theory of Law, Boston, 1910.

             2. Eastwood, R. A. Keeton, G. W. Austinian Theories of Law and Sovereignty, London, 1929.

लिमये, आशा