आचार्य नरेंद्र देव

देव, नरेंद्र : (३० ऑक्टोबर १८८९–१९ फेब्रुवारी १९५६). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते व विचारवंत. त्यांचा जन्म सीतापूर (उत्तर प्रदेश) येथे  मध्यमवर्गीय खत्री कुटुंबात झाला. त्यांचे वडील बलदेवप्रसाद व आई जवाहरदेवी. वडील सीतापूर येथे वकिली करीत. त्यांच्याकडे स्वामी रामानंदतीर्थ व पं. मदन मोहन मालवीय येत. नरेंद्रांचे प्राथमिक शिक्षण सीतापूर येथे झाले. अलाहाबाद व बनारस येथे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी एम्. ए. (१९१३), आणि एल्एल्. बी. (१९१५) या पदव्या घेतल्या. विद्यार्थिदशेतच वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण लवकरच त्यांची पहिली पत्नी वारली व त्यांनी १९१९ मध्ये प्रेमादेवी यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी झाली.

अलाहाबादला शिक्षण घेत असताना त्यांना लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष वगैरे काँग्रेसमधील थोर नेत्यांची भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. या जहाल पुढाऱ्यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. नरेंद्रांचा दहशतवादी क्रांतिकारकांशीही संबंध आला. पुढे फैजाबाद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली परंतु त्यांचा ओढा तत्कालीन राजकारणाकडे होता. टिळक तुरुंगातून सुटल्यानंतर नरेंद्र देव त्यांना भेटले आणि त्यांनी फैजाबाद येथे होमरूल लीगची शाखा स्थापन केली (१९१६). यानंतर त्यांची जवाहरलाल नेहरूंशी गाठ पडली आणि त्यांच्या सल्ल्याने ते काशी विद्यापीठात अध्यापनासाठी दाखल झाले (१९२१). प्रथम ते विनावेतन शिकवीत पण पुढे वडील वारल्यानंतर पगार घेऊ लागले. भगवानदास हे प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यावर नरेंद्रांची प्राचार्यपदी नियुक्ती झाली (१९२६). तेव्हापासूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली. विद्यापीठात त्यांनी बौद्ध धर्म, मार्क्सवाद व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. १९२८ मध्ये ते स्वराज्य पक्षाचे चिटणीस झाले. १९३० मध्ये ते असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना तीन महिन्यांची कैद झाली. पुन्हा १९३२ मध्ये त्यांनी रायबरेली येथे सत्याग्रह केला. काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या नव्या पक्षाचे काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टी असे नाव ठेवण्यात आले. पं. जवाहरलाल नेहरूंच्या नियंत्रणाखाली १९३६ मध्ये आचार्य नरेंद्र देव काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासद झाले. याच सुमारास त्यांची उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात निव़ड झाली. दुसऱ्या महायुद्धकाळात वैयक्तिक सत्याग्रहाबाबत त्यांना शिक्षा झाली (१९४०) व पुन्हा ते छोडो भारत आंदोलनात पडले. त्यांना पकडण्यात येऊन अहमदनगरच्या तुरुंगात इतर नेत्यांबरोबर ठेवण्यात आले (१९४२). १९४५ मध्ये ते मुक्त झाले व १९४६ मध्ये उत्तर प्रदेश विधिमंडळावर निवडून आले. तथापि त्यांनी केव्हाही मंत्रिपद स्वीकारले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला. त्यात नरेंद्र देवही होते. त्यांनी विधिमंडळाचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लढविली पण ते अयशस्वी झाले. दरम्यान त्यांनी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारले (१९४७–५१). या काळात त्यांनी विद्यापीठातील गैरकारभार दूर करून अनेक सुधारणा केल्या. या त्यांच्या कार्यामुळे त्यांची कुलगुरू म्हणून बनारस हिंदू विद्यापीठात नियुक्ती झाली. १९५३ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हे पद सोडले. दम्याच्या विकारावर उपचार करून घेण्यासाठी ते यूरोपला गेले.

नरेंद्र देवांनी १९५० मध्ये थायलंड, ब्रह्मदेश या देशांना भेटी दिल्या. १९५२ मध्ये ते चीनला सदिच्छा मंडळाचे सदस्य म्हणून गेले. आपला पक्ष किसान मजदूर पक्षात विलीन करू नये, असा त्यांचा आग्रह होता. तेथून परतल्यावर पक्षांतर्गत समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. आचार्य कृपलानींच्या किसान मजदूर प्रजा पक्षाशी आपल्या समाजवादी पक्षाचे एकीकरण घडवून स्थापन झालेल्या प्रजासमाजवादी पक्षाचे ते अध्यक्ष झाले (१९५४). आपल्या पक्षाची शकले होऊ नयेत, म्हणून ते प्रयत्नशील होते. तथापि राम मनोहर लोहिया यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली. या सर्व घटनांचा ताण पडल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. गया येथील आपल्या पक्षाच्या अधिवेशनासही ते जाऊ शकले नाहीत (१९५५). एरोड येथे ते निधन पावले.

नरेंद्र देवानी बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून बौद्ध धर्म–दर्शन हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ हिंदीत लिहिला. मातृभाषेतून सर्व शिक्षण दिले जावे व सर्व भारतीय भाषांना एकच लिपी असावी, असे त्यांचे मत होते. ते मार्क्सवादी होते पण त्यांना अभिप्रेत असलेला मार्क्सवाद लोकशाहीवादी व मानवतावादी होता. भारतीय समाजवादी आंदोलनाच्या वैचारिक विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाजवादी चळवळ राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त असता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. भारतातील शेतकरी वर्ग समाजवादी चळवळीत सहभागी झाल्याशिवाय चळवळीला विधायक स्वरूप प्राप्त होणार नाही, असे त्यांना वाटे. तसेच समाजवाद ही केवळ आर्थिक चळवळ नसून सांस्कृतिक आंदोलन आहे, अशी त्यांची भूमिका होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वांनुसार त्यांनी सर्व जीवन व्यतीत केले.

देवगिरीकर, त्र्यं. र.