पासी, फ्रेदेरीक : (२० मे १८२२ – १२ जून १९१२). फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व नोबेल शांतता परितोषिकाचा पहिला मानकरी. त्याचा जन्म पॅरिस येथे झाला. तो इपोलित पासी या लूई फिलिप राजाच्या अर्थमंत्र्याचा पुतण्या होता. वकिलीची परीक्षा देऊन त्याने फ्रेंच कौन्सिल ऑफ स्टेट या संस्थेत लेखापरीक्षक म्हणून नोकरी धरली (१८४६ – ४९). पुढे त्याने विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यास वाहून घेतले. तो खुल्या व्यापाराचा पुरस्कर्ता होता. रिचर्ड कॉबडेन व जॉन ब्राइट या एकोणिसाव्या शतकातील अर्थशास्त्रज्ञांचा तो चाहता होता. त्याचे शांतता कार्य क्रिमियाच्या युद्धाच्या वेळी सुरू झाले. त्यानंतर त्याने Melanges economiques (१८५७) हे पुस्तक लिहिले. तो आपले शांततेसंबंधीचे विचार Le Temps (१८६७) या नियतकालिकातून मांडीत असे. त्याच्या मध्यस्थीने फ्रान्स व प्रशिया यांत लक्सेंबर्गबद्दल होणारे युद्ध टळले. त्याने शांततेच्या प्रचारकार्यासाठी ‘द लीग इंटरनॅशनल द ला पेक्स’ ही संस्था स्थापन केली (१८६७). तिचा तो सु. वीस वर्षे सचिव होता. या संस्थेचे नाव पुढे बदलण्यात आले. फ्रँको-जर्मन युद्धानंतर (१८७० – ७१) ॲल्सेस-लॉरेन हा प्रदेश स्वायत्त व तटस्थ असावा, असा त्याने प्रसार केला. १८७७ मध्ये त्याची ‘अकादमी देस सायन्सिस मॉरल्स’ या संस्थेवर निवड झाली. त्यानंतर तो १८८१-८९ या काळात चेम्बर ऑफ डेप्युटीजचा सभासद होता. या वेळी त्याने मध्यस्थी करून फ्रान्स व नेदर्लंड्स यांमधील सीमातंटा यशस्वी रीत्या सोडविला. त्याने १८८९ मध्ये आंतरराष्ट्रीय संसद संघटना स्थापण्यात पुढाकार घेतला. त्याचे लेखन विपुल आहे आणि बहुतेक ग्रंथांतून त्याने जागतिक शांततेचा पुरस्कार केला आहे. एवढेच नव्हे, तर जागतिक तणाव कमी करण्यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबावा, हे तत्त्व प्रतिपादिले आहे. त्याच्या पुस्तकांपैकी Les Lecons d’ economie Politique (१८६० – ६१), Les machines et leur influence sur le progre’s social (१८८६), L’histoire du travail (१८७३), La solidarite du travail et du Capital (१८७५), La question de la paix (१८९१) इ. ग्रंथ उल्लेखनीय आहेत. त्याचे जागतिक शांतताविषयक विचार व कार्य यांचा गौरव त्यास झां आंरी द्यूनां (रेड क्रॉसचा संस्थापक) यासोबत शांततेचे पहिले नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला (१९०१). त्याचा मुलगा पॉल एद्वार पासी (१८५९-१९४०) हा कोशकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याने ध्वनिविचारासंबंधी संशोधन केले आहे. फ्रेदेरीक नयी येथे मरण पावला.

देशपांडे, सु.र.