ब्रेझन्येव्ह, ल्येऑन्यीट इल्यिच : (१९ डिसेंबर १९०६ – १० नोव्हेंबर १९८२). सामर्थ्यशाली रशियाचा एक शिल्पकार व अध्यक्ष. त्याचा जन्म सामान्य कामगार कुटुंबात काम्यिन्‌स्काय (विद्यमान नेप्रोपट्रॉफस्क – युक्रेन) या गावी झाला. त्याचे आजोबा व वडील पोलाद कारखान्यात काम करीत असत. प्राथमिक शिक्षण काम्यिन्‌स्काय येथे घेतल्यानंतर त्याने काही दिवस अध्ययन सोडून मजुरी केली आणि फावल्या वेळात अभ्यास करून पदवी मिळविली (१९२७). तत्पूर्वी तो कम्युनिस्ट युवक संघात प्रविष्ट झाला होता. सुरुवातीस शासनात त्याने काही काळ किरकोळ स्वरूपाच्या नोकऱ्या केल्या. पुढे त्याने नोकरी सोडून पक्ष संघटनेस व त्याची उद्दिष्टे जोपासण्याच्या विधायक कार्यास वाहून घेतले आणि कम्युनिस्ट पक्षाचा तो सभासद झाला (१९३१). मध्यंतरीच्या काळात काम्यिन्‌स्काय येथील धातुविज्ञान संस्थेत त्याने प्रवेश मिळविला. या संस्थेतून १९३५ मध्ये अभियंता म्हणून बाहेर पडला  आणि काही दिवस धातुवैज्ञानिक म्हणूनही त्याने काम केले तथापि रशियातील तत्कालीन राजकीय घडामोडींकडे तो पुन्हा आकृष्ट झाला आणि त्याने आपल्या युक्रेन भागातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिवपद मिळविले. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनीच्या रशियावरील आक्रमणानंतर तो लाल सैन्यात दाखल झाला आणि मेजर जनरल या हुद्यापर्यंतच्या विविध पदांवर त्याने काम केले. महायुद्धोत्तरकाळात मॉल्डेव्हिया प्रांतातील पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा तो मुख्य सचिव झाला (१९५०). १९५२ मध्ये पक्षाच्या मॉस्को येथील मध्यवर्ती समितीच्या सचिवालयात जोझेफ स्टालिनच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यास लाभली. स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) काही काळ त्यास इतरत्र दुय्यम पदावर काम करावे लागले तथापि त्याची प्रशासकीय कार्यक्षमता लक्षात घेऊन न्यिक्तित ख्रुश्चॉव्हने त्यास पुन्हा पक्षाच्या सचिवालयात स्थान दिले. ग्यिऑर्ग्यई माल्येन्कॉव्ह, व्ह्यिचस्लाव्ह मॉल्युटॉव्ह व ख्रुश्चॉव्ह यांच्यातील सत्तास्पर्धेत ब्रेझन्येव्हने ख्रुश्चॉव्हला पाठिंबा दिला होता (१९५७). परिणामतः ख्रुश्चॉव्हने प्रिसिडीयमच्या (कम्युनिस्ट पॉलिट ब्यूरो) अध्यक्षपदी ब्रेझन्येव्हची निवड केली (१९६०).

 ख्रुश्चॉव्ह याची १९६४ च्या ऑक्टोबरमध्ये अचानक पद्च्युती झाली आणि त्याच दिवशी सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या चिटणीसपदी त्याची निवड झाली. १९६६ पासून सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद स्वतःकडे घेऊन तो सर्वसत्ताधारी झाला. पक्षाच्या २४ व्या अधिवेशनात (१९७१) त्याने मध्यवर्ती समितीच्या निवडणुकीत अग्रक्रम मिळवून पक्षावरील आपली पकड अधिक बळकट केली आणि पुढे कोसीजिनच्या सहकार्याने राजकीय वर्तुळातील मातब्बर मंडळी हळूहळू आपल्या वर्चस्वाखाली आणली. सोव्हिएट रशियाचा अध्यक्ष व सरचिटणीस ही दोन्ही पदे अखेरपर्यंत त्याने आपल्याकडेच ठेवली.

आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत ब्रेझन्येव्हने रशियात राजकीय स्थैर्य निर्माण केले. स्टालिन आणि ख्रुश्चॉव्ह यांच्या काळातील व्यक्तिपूजेचा प्रभावी संप्रदाय त्याच्या वेळी निर्माण झाला नाही. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत सहकाऱ्यांना विचारात घेऊन एक प्रकारचे सामुदायिक जबाबदारीचे धोरण त्याने स्वीकारले. आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करी दृष्ट्या देशाचे सामर्थ्य वाढवून ते अमेरिकेशी तुल्यबळ करण्यातही तो यशस्वी झाला. पूर्व यूरोपीय अंकित राष्ट्रांच्या बाबत मर्यादित सार्वभौमत्वाचे तत्व स्वीकारून त्याने चेकोस्लोव्हाकिया (१९६८) व पोलंड (१९८०) येथील अंतर्गत उठावांत लष्करी हस्तक्षेप केला आणि अंकित राष्ट्रांच्या अंतर्गत व्यवहारात कम्युनिस्ट तत्वप्रणालीच्या रक्षणासाठी रशियास हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, असे चेकोस्लोव्हाकियावरील या आक्रमणाचे समर्थन त्याने केले. अफगाणिस्तानच्या कम्युनिस्ट शासनास लष्करी मदत करून (१९७९) त्याने पूर्व यूरोपातील कम्युनिस्ट राष्ट्रांवर आपले वर्चस्व कायम रहावे, म्हणून पश्चिम यूरोपातील कम्युनिस्टेतर राष्ट्रांशी निकटचे व समझोत्याचे संबंध प्रस्थापित केले. ⇨ देतान्तच्या तत्वानुसार १९७२ – ७४ दरम्यान अमेरिकेला आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भात -विशेषतः अण्वस्त्रांचा वापर व निःशस्त्रीकरण यांबाबतीत- मर्यादित सहकार्य दिले. त्यामुळे जागतिक स्फोटक परिस्थिती निवळली गेली. जागतिक शांततेला पूरक ठरतील अशा काही गोष्टीही ब्रेझन्येव्हने केल्या. उदा., यूरोपीय सुरक्षा यांबाबतचा हेल्‌सिंकी करार (१९७५) आणि सॉल्ट -२ (स्ट्रॅटेजिक आर्म्‌स लिमिटेशन ट्रीटी) हा अमेरिकेबरोबर केलेला करार (१९७९) तसेच त्याने आपल्या परराष्ट्रीय धोरणाच्या पुष्ट्यर्थ भारतासारख्या तटस्थ राष्ट्रांशी मैत्री करून व्यापार, उद्योग इ. क्षेत्रांत आर्थिक व तांत्रिक सहकार्य दिले. भारताला त्याने तीन वेळा (१९६१, १९७३ व १९८०) भेट दिली. पहिल्या भेटीत गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे त्याने निक्षून सांगितले.

ब्रेझन्येव्हच्या कारकीर्दीत शेती व उद्योग या क्षेत्रांत देशात स्पृहणीय प्रगती झाली आणि आर्थिक सुबत्तेबरोबरच विज्ञान क्षेत्रात रशियाची मान उंचावली. त्याच्याच काळात अवकाशातील विविध शास्त्रीय प्रयोगांत तसेच अण्वस्त्रांत रशियाने नेत्रदीपक कामगिरी बजावली. १९७७ मध्ये ब्रेझन्येव्हने नवे संविधान स्वीकारून काही मूलभूत बदल केले. हे संविधान ‘ब्रेझन्येव्ह संविधान’ म्हणून ओळखले जाते.

ब्रेझन्येव्ह याला लेनिन शांतता पुरस्कार (१९७६), कार्ल मार्क्स ऑर्डर, मार्शल ऑफ द सोव्हिएट, युनियन, कार्ल मार्क्स सुवर्णपदक, लेनिन साहित्य पारितोषिक इ. विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले. त्याने विपुल लेखन केले. तो लेनिनवादी होता व फॉलोइंग लेनिन्स कोर्स (इं. भा.- ७ खंड) हा त्याचा एक उल्लेखनीय बृहद्ग्रंथ. त्याचे इतरही काही लेखन प्रसिद्ध झाले. त्यात त्याच्या काही आठणींचा अंतर्भाव होतो.

मादाम व्हिक्टोरिया ही त्याची पत्नी पोलादी पडद्याचे जुने संकेत व शिष्टाचार बाजूला ठेवून अनेक समारंभ व दौऱ्यांत त्याच्याबरोबर उपस्थित असे. यूरी हा त्याचा मुलगा आणि गालिना ही मुलगी. ते रशियाच्या सक्रिय राजकारणात आहेत. ब्रेझन्येव्हच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीचे रहस्य त्याच्या धिम्या, सावध व प्रसंगी कठोर अशा स्वभावात होते. मिळेल त्या संधीचा फायदा उठवून त्याने पक्षातील आपले स्थान बळकट केले व टिकविले तथापि स्टालिन वा ख्रुश्र्वॉव्ह यांच्याप्रमाणे सर्वंकष सत्ता त्याला निरंकुशपणे उपभोगता आली असे दिसत नाही. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :  1. Cohen, Stephen F. and Others, Ed. The Soviet Union Since Stalin, Bloomington, 1980.

            2. Rush, Myron, Political Succession in the USSR, New York, 1968.

            3. Simmonds, G. W. Ed. Soviet Leaders, New York, 1967.

शेख, रुक्साना