सुरेंद्रनाथ बॅनर्जी

बॅनर्जी, सुरेंद्रनाथ  : (१० नोव्हेंबर १८४८–६ ऑगस्ट १९२५). थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. जन्म कलकत्ता येथे. वडील दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्‍लंडला जाऊन ते आय्. सी. एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९). भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले (१८७४). त्या विरुद्ध त्यांनी इंग्‍लंडमध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्‍न केला पण तो निष्फळ ठरला. त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली. इंग्‍लंडमधील मुक्कामात एडमंड बर्क, जूझेप्पे मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय्य धोरणामुळेच त्यांच्या विरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली (१८७५). कलकत्त्यातील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये (विद्यमान विद्यासागर महाविद्यालय) ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे अध्यापक होते. नंतर काही दिवस ते फ्री चर्च कॉलेजमध्ये होते. पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय (विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय) स्थापन केले. तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी सु. ३७ वर्षे घालविली तथापि राजकारणापासून ते अलिप्त नव्हते. जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले (१८७८). त्यातून त्यांनी सु.५० वर्षे सातत्याने लेखन केले.

शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्योसमाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला, की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले. सुरेंद्रनाथांनी इंडियन ॲसोसिएशन ही संस्था स्थापन केली (२६ जुलै १८७६) आणि तिच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला. बेंगॉली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा देशभर हरताळ व निषेधाच्या सभा झाल्या. भारतीय सनदी सेवा परीक्षेचे किमान वय २१ वरून १९ वर आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी भारतभर प्रचार केला. सुरेंद्रनाथांनी इंडिया ॲसोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात बोलविली (डिसेंबर १८८३). यानंतर दुसरी सभा १८८५ मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते दोनदा (पुणे–१८९५ अहमदाबाद–१९०२) अध्यक्ष झाले. सुरुवातीपासून ते मवाळ पक्षात होते बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला (१९०५) आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला. सुरेंद्रनाथांना लो. टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते. द्विदल राज्यपद्धती असेलल्या बंगालच्या विधिमंडळावर त्यांची नियुक्ती झाली (१९२१) व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइट’ हा किताब बहाल केला. १९२१–२३ दरम्यान त्यांची स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अखेरच्या दिवसांत त्यांची लोकप्रियता कमी झाली. बराकपूर येथे त्यांचे निधन झाले.

सुरेंद्रनाथांनी स्फुट लेखन बेंगॉली या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. त्याशिवाय त्यांनी ए नेशन इन मेकिंग : बिइंग द रेमिनन्सीस ऑफ फिफ्टी यीअर्स ऑफ पब्लिक लाइफ (१९२५) या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले.

सुरेंद्रनाथांनी भारतात विशेषतः बंगालमध्ये राष्ट्रवाद जागृत केला आणि आपल्या अस्खलित वक्तृत्वाने त्याचा देशभर प्रसार केला. त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना ‘बंगालचा अनभिषिक्त राजा’ ही उपाधी बारिसाल देऊन करण्यात आला.

संदर्भ1.  Bose, S. K. Surendranath Banerjea, New Delhi, 1968.

          2.  Roy-Chaudhury, P. C. Gandhi and His Contemporaries, Jullandar, 1972.

देशपांडे. सु. र.