मन्‍रो सिद्धांत : अमेरिकेचे अध्यक्ष जेम्स मन्‍रो (कार.१८१७-२५) यांनी २ डिसेंबर १८२३ रोजी अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) परराष्ट्रधोरणाविषयक केलेली तत्वांची घोषणा. या सिद्धांताच्या मागे तात्कालीन विशिष्ट राजकीय परिस्थिती कारणीभूत होती. यूरोपात प्रशिया, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स या चार राष्ट्रांच्या आघाडीचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी स्पेन व इटलीसारख्या उदारमतवादी देशांतील लोकशाही क्रांती दडपण्यास सुरूवात केली. याच काळात स्पेनच्या लॅटिन अमेरिकेतील वसाहती स्वतंत्र झाल्या. त्या नवस्वतंत्र वसाहतींना अमेरिकेने मान्यता दिली, पण या वसाहती आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी यूरोपातील साम्राज्यवादीराष्ट्रे पुन्हा प्रयत्न करतील, अशी भिती अमेरिकेला वाटू लागली. त्यांना पायबंद घालण्यासाठी या वसाहतीबाबत इंग्‍लंड व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी एक संयुक्त घोषणा करावी, अशी सूचना इंग्‍लंडचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्ज कॅनिंग यांनी केली, पण ती अमेरिकेन मान्य केली नाही. अमेरिका स्वातंत्र्य, लोकशाही, राष्ट्रवाद वगैरेंचा पाठपुरावा करणारे राष्ट्र आहे आणि हे धोरण स्पष्ट व सडेतोड भाषेत यूरोपीय साम्राज्यवादी देशांपुढे मांडावे, या उद्देशानेच अध्यक्ष ⇨जेम्स मन्‍रो यांनी एक सिद्धांत मांडला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन क्विन्झी याचा या सिद्धांताच्या मसुद्यात सिंहाचा वाटा होता. या सिद्धांतातीलप्रमुख तत्वे चार:

(१)उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांत कोणत्याही युरोपीय राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन करू नयेत. (२) सद्य:स्थितीत यूरोपीय राष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या अमेरिकेतील वसाहतींमध्ये अमेरिकेच्या संयुक्त स्थानांनी पूर्वी हस्तक्षेप केलेला नाही व पुढेही ती करणार नाही. (३) यूरोपीय राष्ट्रांनी अमेरिका खंडांतील देशांवर ताबा मिळवून त्यांवर आपली राज्यपद्धती लादण्याचा प्रयत्न केला, तर तो अमेरिकेच्या शांतता व सुरक्षिततेस धोका आहे, असे समजण्यात येईल आणि (४) यूरोपिय राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींत अमेरिका हस्तक्षेप करणार नाही, तसेच अमेरिकन देशांच्या अंतर्गत बाबींत यूरोपीय देशांना ढवळाढवळ करू दिली जाणार नाही.

मन्‍रो सिद्धांतामुळे जवळजवळ शंभर वर्षे अमेरिकन अलिप्ततावादी परराष्ट्रधोरण स्वीकारले आणि ते लॅटिन अमेरिकेतील देशांत बाह्या हस्तक्षेपास विरोध करून त्यांच्यावर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. मन्‍रो सिद्धांतमध्ये अमेरिकन जनतेला प्रिय असणार्‍या स्वातंत्र्य, राष्ट्रवाद इ. तत्वांचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्यास देशात लोकप्रियता व मान्यता लाभली.

संदर्भ: 1. Dexter Perkins, A History of Monroe Doctrine, London, 1955.

2. Perkins, Bradford &amp Others, England and The United States: 1812-23, Cambridge (California), 1965.

चौसाळकर, अशोक