समष्टिवाद : ( कलेक्टिव्हिझम ). आदर्श समाजव्यवस्थेची एक कल्पना आणि सामाजिक प्रगतीची एक आर्थिक-राजकीय पद्धती. या विचार-प्रणालीने प्रसृत केलेल्या पद्धतीत शासन वा लोकसमूह जमीन, कारखाने किंवा अन्य उत्पादन साधनांची मालकी धारण करतो. समष्टिवाद ही संकल्पना अठराव्या शतकात उत्कांत झाली. तिचा उद्‌गम भांडवलदार वर्गाच्या विरोधातील कांतिकारक विचारातून झाला. अठराव्या शतकात सेंट-सायमन, झां झाक रूसो (१७१२-१७७८), रॉबर्ट ओएन (१७७१-१८५८), चार्ल्स फूर्ये (१७७२-१८३७), प्रूदाँ (१८०९-१८६५) प्रभृती यूरोपीय विचारवंतांनी समाजातील असमतोल संपत्तीच्या मालकीविषयी प्रतिकिया व्यक्त केल्या. त्यांनी सामूहिक-सहकारी समाज हाच अशा अपप्रवृत्तीवरील एकमेव उपाय वा उपचार आहे, असे मत व्यक्त केले. या विचारातून फ्रान्स, इंग्लंड, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, टांझानिया वगैरे देशांतून स्वयंसेवी सामूहिक तत्त्वावर ( सहकारावर ) आधारित संस्थांचे ( कॉम्यून्स ) आदर्श निर्माण झाले.

समष्टिवादाची अनेक रूपे-प्रकार अठराव्या शतकात यूरोपात विकसित झाले. त्यांपैकी श्रमिक संघसत्तावाद हा एक होता. त्यानुसार कामगारांनी कारखान्याचे व्यवस्थापन करावे आणि मालकीही त्यांचीच असावी. सहकारी क्षेत्रात मालकी व सेवा सर्वांचीच असावी. आधुनिक समष्टिवादात साम्यवाद-समाजवाद या विचारसरणींचाही अंतर्भाव होतो.

आधुनिक समष्टिवादाचा सुरूवातीचा आविष्कार रूसोच्या ‘ सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी ’त आढळतो. झां झाक रूसो याने आपला सामाजिक कराराचा सिद्धांत समान ईहा ( जनरल विल ) या संकल्पनेवर रचला. मोठा समाज एकत्र नांदत असला की, सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक, सर्वांना समान अशी सार्वत्रिक भावना किंवा इच्छा निर्माण होते. तीच समान ईहा होय. ही ईहा वा इच्छा म्हणजे केवळ अनेकांच्या अनेक इच्छांची बेरीज नसते, तर ती सर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक स्वतंत्र प्रेरणा असते. समान ईहेला प्रत्येक व्यक्ती समूह-नियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते. यानंतर रॉबर्ट ओएन या समाजवादी सहकाराचा प्रवर्तक असलेल्या बिटिश विचारवंताने ऐक्य व सहकार्य या दोन तत्त्वांवर नगरे उभारण्याची योजना मांडली. स्पर्धेला बाजूला सारून सहकार्यावर आधारलेली समाजरचना त्याला अभिप्रेत होती. सहकारी तत्त्वावरील शेती व औदयोगिकीकरण यांची सांगड घालून त्याने हा नगररचनेचा प्रयोग केला. त्याने प्रामुख्याने सहकार पद्धतीचा पुरस्कार केला. त्याच्या मते अशा सहकारी पद्धतीच्या अर्थरचनेत सर्वांना आर्थिक न्याय मिळेल. त्याचा समकालीन चार्ल्स फूर्ये या फेंच विचारवंताने उत्पादकांच्या नागरीसंस्था ( उत्पादक गट ) हा मूलाधार धरून समाजाची पुनर्रचना करावी, या तत्त्वाचा पुरस्कार केला. त्याच्या या पद्धतीस फूर्येवाद ही संज्ञा रूढ झाली. त्याच्या या उत्पादक गटांना त्याने फॅलेन्झीस हे नाव दिले. प्येअर झोझेफ प्रूदाँ हा एकोणिसाव्या शतकातील अराज्यवादाचा निर्भीड फेंच पुरस्कर्ता होता. या शतकातील भांडवलशाही-विरोधी विचारांची एक धारा प्रूदाँच्या रूपाने प्रकट झाली. ‘प्रॉपर्टी मालमत्तेचा हक्क म्हणजे चोरी, हे मत त्याच्या नावाशी निगडित आहे. स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तींनी आणि संस्थांनी केलेले सहकार्य, ही त्याच्या समाजवादाची आधारशीला आहे. शिवाय त्याचा समाजवाद उत्पादनाऐवजी समान वितरणावर भर देतो. वरील विचारवंतांचे समष्टिवादाच्या संदर्भातील योगदान हे पूर्णत: अ-मार्क्सवादी समाजवादी विचारेतिहासात अंतर्भूत होते.

समष्टिवाद ही संज्ञा समाजवादी विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांच्या १८६९ च्या आंतरराष्ट्नीय परिषदेत प्रथम उच्चरली गेली. त्यामुळे समष्टिवाद समाजवादाशी निगडित आहे, अशी सर्वसाधारण भावना झाली. त्यानंतरच्या काळात मार्क्सवादी समाजवादापेक्षा निराळा, सर्वसत्तावादी नसूनही समाजवादी अशी विचारप्रणाली दर्शविण्यासाठी समष्टिवाद ही संज्ञा प्रचारात आली. क्रपॉटक्यिअन याने कांतिकारी साम्यवादाच्या मार्गावरील समष्टिवाद ही संकमणकालीन अवस्था कल्पिली. या अवस्थेत मालकी हक्क राहणार होता. फक्त तो व्यक्तिगत नसून मानवी गटांकडे राहणार होता. आधुनिक काळात राज्याच्या अधिसत्तेकडून समाजजीवन नियंत्रित असावे, असे मान साणाऱ्याम्यवाद, समाजवाद, फॅसिझम आदी विचारप्रणाली दर्शविण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्थेत राज्याचा वाढता हस्तक्षेप असावा, असे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धांताला समष्टिवाद हा शब्द योजला. समष्टिवाद हा व्यक्तिवादाविरोधी मानला जातो. ज्याचे विचार, कल्पना व्यक्तिवादी विचारांशी सुसंगत नाहीत, तो समष्टिवादी, अशी सर्वसाधारण धारणा होती. काही विचारवंत समष्टिवादाचे लोकशाही समष्टिवाद व सर्वसत्ताधारी समष्टिवाद असे प्रकार कल्पितात. लोकप्रतिनिधींनी कायद्यावर व नियोजित धोरणांवर आधारित समष्टिवाद लोकशाही व जनतेचे मत लक्षात न घेता निर्माण केलेला व एखादया नेत्याच्या अगर पक्षाच्या प्रमुखाच्या मतानुसार ठरविलेले धोरण, अंमलात आणणारा समष्टिवाद, सर्वसत्ताधारी समष्टिवाद अशी व्याख्या केली जाते. गुंतागुंतीच्या समाजजीवनात व्यक्ती स्वत:ला हरवून बसण्याचा संभव असल्यामुळे, तिच्या खासगी जीवनाचे रक्षण करण्यासाठी राज्यसंस्थेला जीवनाच्या विविध क्षेत्रांत हस्तक्षेप करावा लागला. याबरोबरच व्यक्तिगत उदयोगधंदयांऐवजी अनेक व्यक्तींनी सहकारी तत्त्वावर आधारित उदयोगधंदे अस्तित्वात आणले व उदयोगधंद्यांत एक प्रकारे समष्टिवाद निर्माण झाला.

समष्टिवादी विचारसरणीमुळे आधुनिक राष्ट्र-राज्ये महत्त्वाचे आर्थिक-सामाजिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. मजुरांच्या समस्या सोडवितात, त्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करतात. प्रत्येक व्यक्तीला कामधंदा मिळावा व तिचे जीवनमान सुधारावे, असा प्रयत्न करतात. विविध सामाजिक गटांत सहकार्य, सामाजिक सामंजस्य असावे आणि व्यक्तिवादाला आळा बसावा, यासाठी प्रयत्नशील असतात. प्राप्त समस्या सोडविण्यासाठी पारंपरिक संस्था, त्यांची धोरणे, कार्यपद्धती बदलली पाहिजे, ही गोष्ट मान्य करतात. समाजकल्याणासाठी सामूहिक गरजांना व्यक्तिगत गरजांपेक्षा अधिक महत्त्व देतात, अशा सामूहिक-सहकारी समाजाने अधिक आदर्श व आनंददायी जग निर्माण करावे, अशी यूटोपियवादी भूमिका घेतात. समष्टिवादी तत्त्वज्ञानाने भारलेल्या राष्ट्रीय समाजात थोडया व्यक्तींमध्ये निर्णायक भूमिका पार पाडण्याची शक्ती वा सामर्थ्य असते. उदारमतवादी लोकशाहीनिष्ठ समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगता येते. औपचारिक व अनौपचारिक संस्थात्मक नियमन, या उदारमतवादी लोकशाहीनिष्ठ समाजामध्येही अस्तित्वात असते पण त्याची कक्षा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेपेक्षा मर्यादित असते. एकूण समष्टिवाद हा आधुनिक राजकीय जीवनाची लक्षणे निर्दिष्ट करणारी काहीशी अस्पष्ट ( इल-डिफाईन्ड ) संज्ञा आहे.

सोहोनी, श्री. प.