आझाद, चंद्रशेखर: (२३ जुलै १९०६-२७ फेब्रुवारी १९३१). भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक क्रांतीकारक. आडनाव तिवारी. मध्य प्रदेशातील भावरा गावी जन्म. बनारस येथे विद्यार्थीदशेत

 चंद्रशेखर आझाद

असतानाच ड्यूक ऑफ विंझरच्या भेटीवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने त्यांनी पाठशाळेत निरोधन केले. त्याबद्दल झालेल्या फटक्यांच्या शिक्षेमुळे ते दहशतवादी बनले. काशी राष्ट्रीय विद्यापीठात शिकत असतानाही त्यांचे सर्व लक्ष क्रांतिकारक चळवळींकडे होते. १९२५ च्या काकोरी कटात त्यांनी भाग घेतला . कटातील प्रमुख व्यक्तींना पकडण्यात येताच चंद्रशेखर फरारी झाले. सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘हिंदुस्थान रिपब्‍लिक असोसिएशन’या जुन्या संस्थेचे‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्‍लिक असोशिएशन ’मध्ये रूपांतर केले व या संघटनेचे सेनापतिपद स्वीकारले . या संस्थेचा लाहोर-कट उघडकीस आल्यामुळे ती संस्था विसर्जित झाली. तरीसुध्दा चंद्रशेखर आझाद आपल्या सशस्त्र क्रांतीच्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. दिल्लीतील पेढीवरील व पंजाब बँकेवरील दरोडे, सॉडर्स या पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ला,कानपूरला चालविलेला गुप्त बाँबचा कारखाना . प्रकरणांत चंद्रशेखरांचा पुढाकार होता. ब्रिटीश सरकारने त्यांना पकडण्यासाठी दहा हजार रूपायांचे बक्षीसही लावले होते.

धिप्पाड देहयष्टीचा व निग्रही वृत्तीचा हा क्रांतिकारक अलाहाबाद येथे ॲल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. त्यांच्या मृत्यूने भारतातील भूमिगत संघटनेची मोठी हानी झाली.

देवगिरीकर, त्र्यं. र.