शीतयुद्ध : प्रत्यक्ष युद्ध टाळून धमक्या, जहाल प्रचार, छुप्या विध्वंसक कारवाया इत्यादींचा अवलंब करणारा मूलतः अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांमधील राजकीय संघर्ष किंवा शत्रुत्व. दुसऱ्या महायुद्धोत्तर जगाची राजकीय आणि आर्थिक पुनर्रचना करण्याच्या प्रश्नावर शीतयुद्धाची सुरुवात झाली. हा संघर्ष या दोन महासत्तांपुरता मऱ्यादित न राहता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी राष्ट्रे अशा दोन राष्ट्रगटांतील संघर्षात त्याची परिणती झाली. शीतयुद्ध हा ह्या विचारप्रणालींच्या संघर्षाचा जागतिक अविष्कार होता. शीतयुद्धाची समाप्ती साधारणपणे १९९० मध्ये झाली.

 शीतयुद्ध–कोल्ड वॉर–या संज्ञेचा जनक प्रसिद्ध स्तंभलेखक वॉल्टर लिपमन होय. या संकल्पनेत पुढील घटकांचा समावेश होतो : (१)  प्रतिस्पर्धी राष्ट्रगटांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा अभाव,(२) दोहोंमध्ये तीव्र शस्त्रस्पर्धा, (३) आक्रमक राजनीती(४) संशययुक्त आणि तणावग्रस्त आंतरराष्ट्रीय वातावरण (५) आपापला राष्ट्रगट अधिक विस्तृत व बलवान करण्याच्या उद्देशाने अलिप्त राष्ट्रांवर त्यांनी शीतयुद्धात सामील व्हावे, म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव, (६) दोन्ही प्रतिस्पर्धी राष्ट्रगटांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था विरुद्ध साम्यवादी अर्थव्यवस्था असा तत्त्वप्रणालींचा संघर्ष.

दुसऱ्या महायुद्धानंतरचे जागतिक राजकारण शीतयुद्धाने ग्रासलेले होते. महायुद्धानंतरच्या सत्तासंतुलनात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या महासत्ता प्रभाव गाजवू लागल्या आणि त्यांच्यात तीव्र सत्तास्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेला महायुद्धाच्या राजकारणाचा संदर्भ असला, तरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः १९१७ च्या बोल्शेव्हिक क्रांतीपासूनच त्यांच्यातील स्पर्धा वाढत गेली. महायुद्धोत्तर काळात या दोन महासत्ता अण्वस्त्रसज्ज असल्याने विनाशकारी प्रत्यक्ष युद्धाचा मार्ग त्यांनी टाळला पण त्यांच्यात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या प्रभावाखालील राष्ट्रगटांमध्ये डावपेचांचे व वैचारिक युद्ध धुमसत राहिले, तेच शीतयुद्ध म्हणून ओळखले जाते.

शीतयुद्धाची सुरुवात पूर्व बर्लिनच्या रशियाने केलेल्या नाकेबंदीने झाली (१९४७). पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, रूमानिया आणि चेकोस्लोव्हाकिया हे पूर्व युरोपियन देश सोव्हिएट अधिपत्याखाली गेले. रशियांकित पूर्व युरोप व लोकशाहीवादी पश्चिम युरोप यांमधील या कडव्या विभाजनाला उद्देशूनच विन्स्टन चर्चिल यांनी ⇨पोलादी पडदा असा शब्दप्रयोग केला. पराभूत जर्मनीची फाळणी होऊन पूर्व जर्मनी सोव्हिएट नियंत्रणाखाली अगोदरच गेला होता. १९४९ मध्ये  चीनमध्ये राज्यक्रांती होऊन तेथे साम्यवादी राजवट आली. साम्यवादी प्रभुत्वाचे क्षेत्र आशियात पसरू लागले.

खुद्द अमेरिकेत साम्यवादाचा एक बागुलबुवाच उभा राहिला व साम्यवाद रोखण्यासाठी जोसेफ मॅकार्थी या सेनेटरने व त्याच्या गटाने एक मोहिम उघडली. आरोप, अपप्रचार, साम्यवादाची जवळीक असल्याच्या संशयावरून अनेकांची चौकशी व बडतर्फी असे एक देशांतर्गत सूडचक्रच सुरू झाले. १९५० च्या दशकात या मॅकार्थीवादाने अमेरिकेत बराच प्रभाव गाजवला. कालांतराने मॅकार्थीवाद थंडावत गेला, तरी तो पूर्णपणे कधीच विझला नाही.

सोव्हिएट विस्तारवादास रोखण्यासाठी अमेरिकेने जागतिक पातळीवर व्यूहरचना केली. ती कंटेनमेंट या नावाने प्रसिद्ध आहे. अमेरिकन परराष्ट्र खात्यातील एक उच्च अधिकारी जॉर्ज एफ. केनन हे या व्यूहरचनेचे जनक होत. उत्तर अटलांटिक करार संघटना ⇨ नाटो (१९४९) व १९५० मध्ये कार्यवाहीत आलेला ‘पॉइंट फोर’ कार्यक्रम ही या धोरणाची दोन प्रमुख अंगे होती. नाटो करारामुळे पश्चिम युरोपला संरक्षक कवच प्राप्त झाले. दारिद्र्य, औद्योगिक मागासलेपणा या कारणांनी अनेक देश साम्यवादी व्यवस्थेकडे झुकू शकतील हे टाळावयाचे असेल, तर त्यांच्या विकासासाठी तंत्रवैज्ञानिक साहाय्य केले पाहिजे, ही विचारसरणी पॉइंट फोर कार्यक्रमामागे होती. नाटोसारख्या अमेरिकाप्रणीत प्रयोगांना प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएट युनियनने साम्यवादी राष्ट्रांचा ⇨ वॉर्सा करार  (१९५५)घडवून आणला. 

 साम्यवादी उत्तर कोरियाच्या सशस्त्र कारवाईमधून उद्भवलेल्या युद्धात (१९५०) उत्तर कोरियास चीनने आणि दक्षिण कोरियास अमेरिकेने साहाय्य केले.[→ कोरियन युद्ध]. पुढे अशाच प्रकारचे युद्ध उत्तर व्हिएटनाम (सोव्हिएट युनियनचे मित्रराष्ट्र) आणि दक्षिण व्हिएटनाम (अमेरिकेचे मित्रराष्ट्र) यांमध्ये सुरू झाले, ते १९७५ पर्यंत चालू राहिले. शीतयुद्धांतर्गत अमेरिका आणि सोव्हिएट युनियन यांमधील सत्तासंघर्ष गंभीर पातळीवर पोहोचल्याचे ते लक्षण होते . [→ व्हिएटनाम युद्ध]. शीतयुद्धातील आणखी एक गंभीर पेचप्रसंग १९६२ मध्ये निर्माण झाला. साम्यवादी क्यूबा देशाच्या भूमीवर सोव्हिएट रशियाकडून प्रक्षेपणास्त्रे तैनात करण्यात येत आहेत, अशी अमेरिकेची खात्री पटल्याने अमेरिकेने क्यूबाची नाविक नाकेबंदी केली व ती तोडण्याचा प्रयत्न रशियाने केल्यास या दोन महासत्तांमध्ये प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. दोन्ही महासत्ता अणुयुद्धाच्या सीमेवर येऊन पोहोचल्या परंतु अशा प्रकारच्या संघर्षाच्या भयानक परिणामांची पूर्ण जाणीव झाल्याने त्यांनी राजनैतिक परिपक्वता दाखवून संभाव्य विनाशापासून जगाला वाचविले. शीतयुद्धाद्वारे जगातील अनेक संघर्ष चिघळले आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे कार्यही झाकोळून गेले. अर्थात द्विध्रुवीय राजकारणाविरुद्ध प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि शीतयुद्धाच्या फोलपणावर बोट ठेवले जाऊ लागले. विविध टप्प्यांमधून विकसित होत शीतयुद्ध अखेर थंडावत गेले.

अणुयुद्धाच्या परिणामांची भयानकता आणि अविरत संघर्षावर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांची निष्फलता लक्षात आल्याने शीतयुद्धाचे पर्व संपवून परस्पर-सामंजस्याचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्णय दोन्ही महासत्तांनी घेतला आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. एखाद्या पेचप्रसंगी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्या शासनप्रमुखांना विनाविलंब एकमेकांशी बोलता यावे, म्हणून ‘हॉट लाईन’ सुरू करण्याचा करार करण्यात आला (१९६३). यानंतरच्या काळात  दोन्ही महासत्तांनी काही करारांत (उदा. अंशतः अणुचाचणीबंदी करार, बाह्य अवकाश करार) सहभागी होऊन सामंजस्याच्या वातावरणाचा पाया अधिकाधिक भक्कम केला. १९७५ मध्ये व्हिएटनाम युद्धाची समाप्ती झाली. याच वर्षी झालेल्या हेलसिंकी परिषदेने सर्व युरोपियन देशांचे संबंध नव्या संदर्भात समतेच्या आणि सार्वभौमत्वाच्या पायावर उभे केले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर उभा केलेला ‘पोलादी पडदा’ इतिहासजमा झाला. महासत्तांनी अवलंबिलेल्या सलोख्याच्या धोरणामुळे शीतयुद्ध शिथिल होऊ लागले. [→ देतान्त].

रशियात ⇨ न्यिक्यित ख्रुश्चॉव्ह यांनी आणि त्यानंतरच्या सर्व नेत्यांनी कमीअधिक फरकाने सामंजस्याच्या धोरणाचा पाठपुरावा केला. म्यिखईल गार्बाचॉव्ह हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया अधिकच वेगवान केली. या प्रक्रियेचे त्यांनी केलेले सारथ्य आणि तत्संबंधी त्यांनी घेतलेले निर्णय हे विवाद्य विषय आहेत हे खरे पण त्यांच्या ‘पुनर्रचना’ (पेरेस्त्रोइका) आणि ‘खुलेपणा’ (ग्लासनोस्त) या द्विसूत्री धोरणाचा अनिवार्य परिणाम होऊन रशियन महासत्ता विघटित झाली. परिणामतः १९९० च्या सुमारास शीतयुद्ध इतिहासजमा झाले.

पहा : अलिप्तता आफ्रो-आशियाई गट आफ्रो-आशियाइइ परिषद.

संदर्भ : १. Crockatt, Richard Smith, Steve, Ed. The Cold War : Past and Present, London, १९८७.

           २. La Feber, Walter, America, Russia and the Cold War : १९४५-१९९०, New York, १९९१.

           ३. Van de Goor, Luc Rupesinghe, Kumar Sciarone, Paul, Ed. Between Development and Destruction :

                   An enquiry into the Causes of Conflict in Post-Colonial States, The Hague, १९९६.

           ४.     बापट, भ.ग. रशियातील पुनर्रचना, पुणे, १९९१.

तवले, सु. न.