चेंबरलिन, सर ऑस्टिन: (१६ ऑक्टोबर १८६३  – १६ मार्च १९३७). एक ब्रिटिश मुत्सद्दी व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहविजेता. जोसेफ चेंबरलिनचा मुलगा व पंतप्रधान नेव्हिल चेंबरलिनचा (१९३७ – ४०) सावत्र भाऊ. बर्मिंगहॅम येथे जन्म. रग्बी व ट्रिनिटी महाविद्यालयांत (केंब्रिज विद्यापीठ) आणि पुढे फ्रान्स व जर्मनी येथे शिक्षण. १८९२ मध्ये तो हुजूरपक्षातर्फे संसदेत (हाउस ऑफ कॉमन्स) बिनविरोध निवडून आला व अखेरपर्यंत तो संसदेचा सभासद होता. हुजूरपक्ष १८९५ मध्ये सत्तेवर येताच त्यास विविध अधिकारपदे मिळत गेली. १९०३ ते १९०५ दरम्यान तो अर्थमंत्री होता. मात्र १९०६ मध्ये हुजूरपक्षाची सत्ता संपुष्टात येताच त्याचे हे पद नष्ट झाले पण इतर जबाबदाऱ्या वाढल्या. १९११ मध्ये त्याची हुजूरपक्षाचा नेता होण्याची संधी हुकली. १९१५ मध्ये संयुक्त मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले व चेंबरलिनची भारतमंत्री म्हणून नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर मेसोपोटेमियाच्या आयोगात सामील व्हावयाचे म्हणून त्याने राजीनामा दिला परंतु १९१८ – २२ दरम्यान पुन्हा त्याची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि लवकरच त्याच्याकडे हुजूरपक्षाचे नेतृत्व आले. तथापि त्याला तत्कालीन हुजूरपक्षाच्या धोरणामुळे पंतप्रधान होण्याची  संधी मिळाली नाही. तेव्हा त्याने राजीनामा दिला. १९२४ – २९ च्या दरम्यान तो परराष्ट्रमंत्री झाला. या काळात त्याने परराष्ट्रीय धोरणात अनेक सुधारणा घडवून आणून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. त्यांपैकी लोकार्नो करार  (१९२५) त्याने यशस्वी रीत्या घडवून यूरोपात शांतता प्रस्थापित केली आणि जर्मनीस राष्ट्रसंघात सामील करून घेतले. याबद्दल त्यास चार्ल्‌स डॉझसमवेत शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९२५). यानंतर त्याने आरमाराच्या मर्यादासंबंधी जिनीव्हा येथे परिषद घेतली (१९२७) आणि इंग्लंड व फ्रान्स यांमध्ये निः शस्त्रीकरणासंबंधी प्रयत्न केले (१९२८). यांत तो अयशस्वी तर झालाच पण त्याची लोकप्रियताही ओसरू लागली. १९२९ मध्ये हुजूरपक्षाचा पराभव झाल्यावर त्याला फक्त एकदा लॉर्ड ऑफ ॲडमिरॅल्टी होण्याची संधी मिळाली (१९३१). उर्वरित आयुष्यात एक मुरब्बी राजकारणपटू म्हणून तो संसदेत बसे.

त्याने आपले अनुभव व विचार डाउन द इयर्स  (१९३५), पॉलिटिक्स फ्रॉम इनसाइड  (१९३६) व सीन इन पासिंग (१९३७) या ग्रंथांत मांडले आहेत. लंडन येथे तो मरण पावला.

संदर्भ : Petrie, Charles, Life and Letters of … Austen Chamberlain, 2 Vols., London, 1939 — 40.

देशपांडे, सु. र.