न्यूरेंबर्ग खटले : दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकरणासमोर न्यूरेंबर्ग येथे सुनावणी झालेले खटले. महायुद्धानंतर जित राष्ट्रांनी – उदा., अमेरिका, इंग्‍लंड, फ्रान्स, रशिया इत्यादींनी – नाझी पक्ष व जर्मनीतील पुढारी यांच्यावर आक्रमक युद्ध, ज्यूंचे हत्याकांड, लूटमार व मानवजातीवरील अमानुष अत्याचार यांबद्दल खटले भरले. हे न्यूरेंबर्ग शहरात १९४५–४६ च्या दरम्यान खास आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणासमोर चालविण्यात आले. न्यायमंडळावर ब्रिटनचे सर जेफ्री लॉरेन्स हे अध्यक्ष होते आणि फ्रान्सिस बिडल (अमेरिका) व आंरी दोन्नेदी द व्हेब्रिस (फ्रान्स) हे इतर न्यायाधीश होते. या देशांच्या वतीने रॉबर्ट जॅक्सन (अमेरिका), हार्टली शॉक्रॉस (ग्रेट बिटन), फ्रान्खा द मेन्थॉन व ऑगस्ट शाम्पिटीअर द रीब्ज (फ्रान्स) आणि आर्. ए. रूडेन्को (रशिया) या वकिलांनी हे खटले चालविले. एकूण १३ खटले होते. त्यांत नाझी जर्मनीचे गोरिंग, हेस, रिबेनट्रॉप, डनिट्स, कायटेल, फॉन पापेन, क्रप इ. नेते प्रमुख आरोपी होते. वैयक्तिक आरोपींशिवाय जर्मन गुप्तहेरखाते (गेस्टापो), नाझी सीक्रेट पोलीस वगैरे संघटनांवरही अत्याचार व वंशविच्छेद यासंबंधी आरोप ठेवून खटले भरण्यात आले.

बहुतेक सर्व आरोपींनी आपण जे केले ते शासनाचा घटक व आज्ञाधारक सेवक म्हणून केले हुकुमाच्या ताबेदारांवर गुन्ह्याची जबाबदारी येत नाही, तर ती हुकूम देणाऱ्यावर, धोरण ठरविण्यावर येते असा बचाव केला. आरोपींपैकी तिघांस कोर्टाने निर्दोषी ठरविले बारा जणांना फाशीची शिक्षा फर्माविली, तर तिघांस जन्मठेप व चौघांना १० ते २० वर्षांची शिक्षा दिली. यांपैकी गोरिंगने आत्महत्या केली. बाकीच्या ११ जणांस १६ ऑक्टोबर १९४६ रोजी फासी देण्यात आले. त्याचप्रमाणे वरील संघटनेच्या सदस्यांना देहान्त शिक्षेस पात्र ठरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये आक्रमक युद्ध हा भीषण गुन्हा आहे, असा निर्णय देऊन या न्यायाधिकरणाने सद्‍सद्‍‍विवेकास न्यायाचे अधिष्ठान दिले. तसेच ‘शासनाच्या प्रतिनिधींस व सेवकांस काही बाबतींत आतंरराष्ट्रीय कायद्यात जे अभय दिले आहे, ते त्याच कायद्याने गुन्हा ठरविलेल्या गोष्टींत मागता येत नाही’, हा महत्त्वाचा मुद्दा या खटल्यात विशद झाला. या न्यायाधिकरणाचे काम सु. २१६ दिवस चालले आणि त्यांनी दिलेले बहुतेक निर्णय एकमताने देण्यात आले.

शहाणे, मो. ज्ञा.