सदाशिव कृष्ण वैशंपायनवैशंपायन, सदाशिव कृष्ण : ( १४ मे १९१६–२४ ऑगस्ट १९८१). दक्षिण भारतातील हैद्राबाद संस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते. भाऊसाहेब म्हणून ते ओळखले जातात त्यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनुक्रमे जालना व औरंगाबाद येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा त्यांनी हैद्राबाद येथून दिली. वंदेमातरम हे राष्ट्रगीत गाण्याच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला (१९३८). त्यानंतर पुढील शिक्षण मुंबईत घेत असताना त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडला. १९३९ साली ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. त्यांनी १९४० मध्ये मुंबई विद्यापीठाची भौतिकीतील एम.एससी. ही पदवी मिळविली. हैद्राबाद संस्थानात स्टेट कॉग्रेसवर बंदी असल्यामुळे महाराष्ट्र परिषदेत त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. जानेवारी १९४१ मध्ये कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून ⇨ गोविंदभाई श्रॉफ, आ, कृ. वाघमारे वगैरे दहा-बारा कार्यकर्त्यांना अटक झाली व बावीस महिने त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. मात्र त्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सभासद असलेले वैशंपायन हे एकटेच होते. नंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाबरोबरचे संबंध तोडले. मार्च १९४३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव प्रतिभाताई. ते महाराष्ट्र परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य (१९४३-४४) व चिटणीस (१९४५) होते. स्टेट काँग्रेसवरील बंदी ३ जुलै१९४६ रोजी उठल्यावर अध्यक्ष ⇨स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेमलेल्या कार्यकारिणीचे ते सदस्य होते. मराठवाड्यातील विणकरांची संघटना बांधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. हैद्राबाद स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या पर्वात (१९४७–४८) सत्याग्रह-आंदोलनाच्या जोडीला, रझाकारांच्या हिंसेला आळा बसावा म्हणून सरहद्दीवर प्रतिकार शिबिरे संघतित करण्याचा निर्णय झाला, तेंव्हा लढ्याचे मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांमध्ये वैशंपायनही प्रमुख्य होते. मुंबई येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय कार्यालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. हैद्राबाद चळवळीची माहिती प्रक्षेपित करण्यासाठी काही काळ मुंबईतून चालवण्यात आलेल्या आजाद हैद्राबाद नभोवाणीचे मार्गदर्शनही त्यांनी केले. स्टेट काँग्रेसच्या चळवळीला एक वैचारिक दिशा देणारे नेते, स्वामी रामानंद तीर्थांचे विश्वासू सहकारी, स्वातंत्र्यानंतर स्टेट काँग्रेसच्या विचार-प्रचारासाठी स्वामीजींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रापैकी न्यू लाइफ या इंग्रजी दैनिकाचे संपादक अशा अनेक नात्यांनी त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. न्यू लाइफ बंद पडल्यावर स्वामीजींच्याच संपादकत्वाखालील व्हिजन या साप्ताहिकात त्यांनी स्तंभलेखनही केले. मवाळांना पाठिंबा देण्याच्या काँग्रेस श्रेष्ठींच्या धोरणामुळे गोविंदभाई श्रॉफ, रा, गो. ऊर्फ बाबासाहेब परांजपे वगैरेंच्या बरोबर भाऊसाहेबांनी काँग्रेस सोडली व या सर्वांनी ‘लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स’ची स्थापना केली. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९५३ मध्ये लीग विसर्जित झाली. मराठवाड्यातील ‘सरस्वतीभुवन’ या शिक्षणसंस्थेचे ते चिटणीस होते (१९५१–६१). सष्टेंबर १९५७ मध्ये मराठवाड्याला स्वतंत्र विद्यापीठ देण्याचे ठरल्यावर त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे ते एक पदाधिकारी होते. त्यांनी १ मे १९६० रोजी काँग्रेस पक्षात पुनप्रवेश केला. राज्यसभेचे ते दोन वेळा सभासद होते (१९६४–७० व १९७६–८१). दरम्यानच्या काळात (१९७१–७५) महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्य होते. औरंगाबाद येथे कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

                                       

चपळगावकर, नरेंद्र