खान, अब्दुल गफारखान : ( ३ जून १८९०– ). महात्मा गांधींचे एकनिष्ठ अनुयायी व पख्तुनांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते. बादशाहखान असेही त्यांना म्हणतात. ह्यांचा जन्म पेशावरजवळील उत्मानझाई ह्या खेड्यात एका श्रीमंत घराण्यात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पेशावर येथे झाले. त्यांनी लष्करात गाइड्स ह्या तुकडीत नोकरी धरली. गोऱ्या अधिकाऱ्यांकडून हिंदी लष्करी अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणून लष्करी नोकरीचा त्याग करून ते अलीगढ विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. १९१० पासून आपल्या प्रदेशात राष्ट्रीय शाळा काढून पठाण बांधवांत जागृती व देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.
रौलट ॲक्टसारख्या जुलमी कायद्याविरूद्ध महात्मा गांधीनी सूरू केलेल्या आंदोलनात गफारखानांनी सक्रिय भाग घेऊन वायव्य सरहद्द प्रांतात चैतन्य निर्माण केले. १९२० च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घेतला तसेच आपल्या प्रांतात खिलाफत चळवळ संघटित केली. १९२४ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य हाती घेतले. १९२९ मध्ये महात्मा गांधी, नेहरू, मौलाना आझाद आदी भारतीय पुढाऱ्यांशी त्यांचा परिचय झाला व काँग्रेस चळवळीत ते सामील झाले. ह्याच कार्यास मदत व्हावी, म्हणून ⇨ खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवक संघटना त्यांनी १९२९ मध्ये स्थापन केली. पठाण जमातीत सत्य, अहिंसा, शिस्त व राष्ट्रप्रेम निर्माण करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. ब्रिटीश सरकारचा रोष होऊन ही संघटना बेकायदेशीर ठरविण्यात आली. १९३० च्या सत्याग्रहात त्यांना पुन्हा कारावास भोगावा लागला. याच काळात पेशावरला २३ एप्रिल १९३० रोजी गढवाल पलटणीने खुदाई खिदमतगारांवर गोळ्या झाडण्यास नकार दिला.
काँग्रेसचे अध्यक्षपद गफारखानांना दोनदा देऊ केले असता, आपण केवळ एक सेवक आहोत, असे म्हणून त्यांनी ते पद नाकारले. एवढेच नव्हे, तर प्रांतीय अगर अखिल भारतीय निवडणुकीस उभे राहण्याचेही त्यांनी कधी मान्य केले नाही. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे ते १९४७ च्या फाळणीपर्यंत सदस्य होते. १९२०–४७ पर्यंत त्यांनी एकंदर चौदा वर्षांचा तुरुंगवास भोगला.
दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या वाटाघाटीत भारताचे विभाजन होण्याची चिन्हे दिसताच, त्याला गफारखानांनी तीव्र विरोध तर केलाच परंतु विभाजन झालेच तर वायव्य सरहद्दीवरील पठाणांच्या स्वायत्त पख्तुनिस्तान झाला पाहिजे, असाही त्यांनी आग्रह धरला. परंतु त्यांचा प्रयत्न निष्पळ ठरला आणि सरहद्द प्रांत पाकिस्तानचाच एक भाग झाला. भारतीय पुढाऱ्यांनी आम्हाला लांडग्यांच्या ताब्यात देऊन स्वतःला स्वातंत्र्य मिळविले, असे दुःखपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले.
महात्मा गांधींच्या आदेशानुसार ते आपल्या प्रांतात गेले. पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याची त्यांनी शपथही घेतली पण आपल्या प्रदेशासाठी स्वायत्तता मिळाली पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात येऊन त्यांची खुदाई खिदमतगार संघटना बंद करण्यात आली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून १९६४ पर्यंत जवळजवळ ते पाकिस्तानी तुरुंगातच राहिले. १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर भूत्तो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. सरहद्द प्रांतात प्रारंभी काही काळ नॅशनल अवामी पार्टी व जमियत-उलेमा यांच्या सहकार्याने सरहद्द गांधींचे चिंरजीव अब्दुल वलीखान अधिकारावर आले. पठाणांच्या या वयोवृद्ध नेत्यास स्वदेशी बोलाविण्यात आले. ते पेशावरला परत गेले व पुन्हा त्यांनी प्रांतिक स्वायत्ततेचा लढा सुरू केला.
प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सप्टेंबर १९६४ मध्ये गफारखानांना इंग्लंड येथे जाण्याची पाकिस्तान सरकारने परवानगी दिली. पाकिस्तानात परत येणे धोक्याचे आहे, हे जाणून ते डिसेंबर १९६४ मध्ये अफगाणिस्तानात गेले. आजही त्यांचे वास्तव्य बहुतेक त्या देशात असून पख्तुनिस्तानचे ध्येय त्यांच्या पुढे अजूनही आहे.
गांधी जन्मशताब्दी महोत्सवात भाग घेण्यासाठी गफारखान भारत सरकारच्या निमंत्रणानुसार ऑक्टोबर १९६९ मध्ये भारतात आले. येथील मुक्कामात त्यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी योजण्यात आलेले नेहरू पारितोषिक देण्यात आले. भारतासाठी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी त्यांना थैली अर्पण केली.
सरहद्द प्रांतातील म. गांधींसारखी महान व्यक्ती म्हणून त्यांना सरहद्द गांधी असे गौरवाने संबोधिले जाते.
संदर्भ : Tendulkar, D.G. Abdul Ghaffar Khan, Bombay, 1967.
देवगिरीकर, त्र्यं. र.
“