ब्रांट, विली: (१८ डिसेंबर १९१३ -). फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचा पहिला समाजवादी चॅन्सेलर व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. मूळचे नाव हेर्बेर्ट एर्न्स्ट कार्ल फ्राम. त्याचा जन्म ल्यूबेकच्या नॉर्थ सी पोर्ट या गावी एका सामान्य मजूर कुटुंबात झाला. गरिबीमुळे बालपणात त्यास विशेष असे शिक्षण मिळाले नाही. डेमॉक्रटिक पक्षाच्या युवा संघटनेने त्यास शिष्यवृत्ती दिली. तेव्हा त्याने शारीरिक शिक्षणात नैपुण्य दाखवून आणखी काही शिष्यवृत्त्या मिळविल्या आणि ल्यूबेक व ऑस्लो विद्यापीठांत अध्ययन करून पदवी मिळविली (१९३२). त्याच वर्षी समाजवादी कामगार युवा संघटनेचा तो सभासद झाला. या वेळी सोशॅलिस्ट डेमॉक्रटिक पक्षाचे व्होल्क्सबोटेन नावाचे मुखपत्र होते. ब्रांट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करीत असे.

जर्मनीमध्ये १९३३ पासून नाझी राजवट सुरू झाली आणि आडोल्फ हिटलर सर्व सत्ताधारी झाला. त्याने जर्मनीत हुकूमशाही प्रस्थापित करून इतर सर्व राजकीय पक्षांचा छळ सुरू केला. तेव्हा त्या पक्षांच्या अनेक अनुयायांनी परदेशाचा आश्रय घेतला. या वेळी विली ब्रांट हे नाव धारण करून त्याने नॉर्वेचा आश्रय घेतला. तेथे त्याने जर्मन निर्वासितांना मदत केली नॉर्वेचे नागरिकत्व स्वीकारले आणि नॉर्वेतील वृत्तपत्रांसाठी तो लेखन करू लागला तथापि नॉर्वेमध्येही जर्मन निर्वासितांना हिटलरच्या हुकूमशाही राजवटीची झळ पोहोचली. तेव्हा त्याने तटस्थ स्वीडनमध्ये प्रयाण केले (१९३७ – ४५). दुसऱ्या महायुद्धकाळात तो स्वीडनमध्ये होता. युद्धानंतर त्याची नियुक्ती १९४६-४७ मध्ये नॉर्वेजियन लष्करी तुकडीचा वृत्तपत्रीय साहाय्यक म्हणून बर्लिनमध्ये झाली.

त्याने रूट  हॅन्सन या युवतीबरोबर विवाह केला (१९४८). त्यांना तीन मुलगे व एक मुलगी आहे. पुढे त्याने पुन्हा जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारले आणि तो प. जर्मनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सोशल डेमॉक्रटिक पक्षातर्फे झटू लागला. पक्षाध्यक्ष कुर्ट शूमाखरच्या आज्ञेवरून पक्षाचा तो संघटक अधिकारी बनला. १९४९ मध्ये तो प. जर्मनीच्या संसदेवर (बुनडेसटाख) निवडून आला आणि त्या वर्षी बर्लिन महानगरपालिकेचा सदस्य म्हणूनही तो निवडला गेला. या काळात रशियाच्या तडजोडीविरोधी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील बर्लिनचे महत्त्व खूप वाढले होते. रशियाने बर्लिनची नाकेबंदी आरंभली होतीतर लोकशाहीवादी जगाचा प्रतिनिधी म्हणून बर्लिन रशियाच्या या कारवायंना तोंड देत होते. याच सुमारास ब्रांटची प. बर्लिनचा महापौर म्हणून निवड झाली (१९५७). कम्युनिस्ट हुकूमशाहीविरुद्ध लढा देणारा एक कणखर समाजवादी नेता म्हणून त्याचा अगोदरच नावलौकिकविली ब्रांट झाला होता. १९५८ मध्ये सोशल डेमॉक्रटिक पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर त्याची निवड झाली आणि काही वर्षांनीय त्यास पक्षाचे अध्यक्षपद मिळाले (१९६४). १९६१ व १९६५ मध्ये त्याने चॅन्सेलरची निवडणूक लढविली होतीपण त्यांत त्यास यश आले नाही. १९६६ मध्ये त्याने ख्रिश्चन डेमॉक्रटिक युनिअन या पक्षाचा नेता कुर्ट गेओख किझिंगर यास आपल्या पक्षाचे साहाय्य देऊन संयुक्त सरकार बनविले. ब्रांटकडे उपाध्यक्षपद व परराष्ट्रमंत्रिपद अशी दुहेरी जबाबदारी किझिंगरने सोपविली. या वेळी त्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात प. जर्मनीची प्रतिमा अधिक उजळ केली. पुढे १९६९ च्या सार्वत्रिक निवडणुकांत त्याच्या पक्षाने छोट्या पक्षांच्या मदतीने मते मिळवून बहुमत प्रस्थापित केले. त्याची चॅन्सेलर-पदावर निवड झाली. यूरोपीय आर्थिक संघटना (ई. ई. सी.) अधिक बळकट करण्यासाठी इंग्लंड वगैरे देशांना तसेच पूर्व यूरोपातील कम्युनिस्ट देशांना सदस्य करून घेऊन जागतिक बाजारपेठेतील तणाव त्याने कमी केला आणि रशियादी कम्युनिस्ट राष्ट्रांशी काही मर्यादेपर्यंत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले. या त्याच्या देतान्तच्या धोरणामुळे शीत युद्धाचा धोका कमी झाला. या कार्याबद्दल त्यास शांततेचे १९७१ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले१९७२ मध्ये राइनहोल्ड नीबुर याच्या स्मरणार्थ असलेले पारितोषिकही त्यास देण्यात आले. पुढे १९७२ मधील सार्वत्रिक निवडणुकांत त्याच्या पक्षास ४६% मते मिळून निर्विवाद बहुमत प्राप्त झाले. पुन्हा त्याची चॅन्सेलर म्हणून निवड झाली. त्याने प. जर्मनीच्या अंतर्गत धोरणात अनेक सुधारणा करून देशाची आर्थिक स्थिती सुधारली आणि पू. जर्मनी व विशेषतः पूर्व यूरोपीय देश यांच्याशी समझोत्याचे धोरण अवलंबून राजनैतिक संबंध दृढ केले.

त्याच्या सचिवांपैकी एकास कम्युनिस्ट गुप्तहेर या आरोपाखाली अटक करण्यात आली (१९७४). तेव्हा त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. या समस्यांतून त्यास सवड मिळते ना मिळते तोच त्याची नियुक्ती संयुक्त राष्ट्रे या संघटनेने विकास विषयक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी  नेमलेल्या स्वतंत्र समितीच्या अध्यक्षपदावर केली (१९७७). एकवीस सदस्य असलेल्या या समितीचा अहवाल १९८० साली प्रसिद्ध झाला. अध्यक्ष म्हणून ब्रांटने केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तत्पूर्वी १९७९ मध्ये तो यूरोपच्या पार्लमेंटवर निवडला गेला. वृत्तपत्रीय लेखनाशिवाय त्याचे स्फुट लेखन विपुल आहे. ए पीस पॉलिसी फॉर यूरोप (इं. भा., १९६८), पीपल अँ पॉलिटिक्स (इं. भा., १९६० – ७५), द ऑर्डिअल ऑफ कोएकझिस्टन्स (इं. भा., १९६३) इ. ग्रंथ प्रसिद्ध असून माय रोड टू बर्लिन (इं. भा., १९६०) हे आत्मचरित्र आठवणींच्या स्वरूपात त्याने लिहिले आहे.

संदर्भ: 1. Brandt, H. W. Portrait and Self Portralt, New York, 1972.

            2. Struve, G. Ed. Willy Brandt in Exile : Essays Reflections and Letters, 1933 – 47, London, 1971.

देशपांडे, सु. र.