हामारशल्ड, डाग : (२९ जुलै १९०५–१८ सप्टेंबर १९६१). जागतिक शांततेचा एक महान पुरस्कर्ता, संयुक्त राष्ट्र संघटनेचादुसरा डाग हामारशल्डकार्यक्षम महासचिव आणि थोर मानवतावादी. त्याचा जन्म स्वीडनमधील सरदार घराण्यात जाँकॉपिंग या गावी झाला. त्याच्या घराण्यात शासकीय सेवेची परंपरा होती. त्याचे वडील याल्मार हामारशल्ड हे स्वीडनचे पंतप्रधान (कार. १९१४–१७) होते. त्यानंतर त्यांनी नोबेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून (कार. १९२९–४७) काम केले. डाग हामारशल्ड याचे बालपण अप्साला येथे गेले. त्या वेळी त्याचे वडील राज्यपाल होते. त्याने खासगी विद्यालयातून प्रारंभीचे शिक्षण घेऊन अप्साला विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली (१९३०) आणि स्टॉकहोम विद्यापीठातून पुढे पीएच्.डी. पदवी मिळविली (१९३४). त्याचा कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा मोठा व्यासंग होता. दरम्यान राजकीय अर्थशास्त्राचा अ धि व्या ख्या ता म्हणून त्याने स्टॉकहोम विद्यापीठात काम केले (१९३३–३६) आणि १९३६ मध्ये स्वीडिश नागरी सेवेत प्रवेश केला. त्याची अर्थखात्यात स्थायी अवर सचिव म्हणून नेमणूक झाली. पुढे तो स्वीडनच्या बँक मंडळाचा अध्यक्ष होता (१९४१–४८). दरम्यान १९४७ मध्ये त्याची परराष्ट्र खात्यात नियुक्ती झा ल्या व र त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि आर्थिक विषय सोपविण्यात आले होते. परराष्ट्र खात्याच्या महासचिव पदानंतर त्याला मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेतले गेले (१९५१) आणि उपपरराष्ट्र मंत्र्याची सर्व कामे त्याच्याकडेच सोपविण्यात आली. तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अधिवेशनाला पाठविलेल्या शिष्टमंडळाचे त्याने १९४९ मध्ये उपाध्यक्षपद भूषविले होते आणि १९५१–५३ मध्ये अध्यक्ष या नात्याने नेतृत्व केले. १० एप्रिल १९५३ रोजी त्याच्या या बहुविध अनुभवामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेचा महासचिवम्हणून त्याची निवड पाच वर्षांकरिता करण्यात आली. पुढे त्याच पदावर त्याची फेरनियुक्ती झाली (१९५७). या पदाची परंपरा आणि प्रतिष्ठा सांभाळण्याचा त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला. तसेच त्याने जागतिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरनिर्माण झालेली शीतयुद्धाची परिस्थिती आणि आफ्रिका खंडातीलस्वतंत्र व नवीन उदयास आलेली राष्ट्रे यांच्या बहुविध समस्या यांनातोंड द्यावे लागले. यांकरिता त्याने प्रथम संयुक्त राष्ट्र संघटनेची शांतीसेना स्थापन केली आणि संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अविकसित देशांना तांत्रिक आणि आर्थिक साहाय्य देण्यास सुरुवात केली. परस्परांतील संघर्ष संपुष्टात येऊन आंतरराष्ट्रीय नागरी सेवा निर्माण व्हावी, असे त्याला वाटत होते. त्यामुळे शांतता आणि जनकल्याण या दोन उच्च उद्दिष्टांचा पाठपुरावा करता येईल, अशी त्याची धारणा होती.

 

हामारशल्डने कोरियन युद्धसमाप्तीनंतर झालेल्या तहाच्या वाटाघाटींत भाग घेतला आणि जानेवारी १९५५ मध्ये चीनला खास भेट दिली. या भेटीचा उद्देश संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अमेरिकेचे जे कैदी चीनमध्ये अडकले होते, त्यांची मुक्तता हा होता. त्याने वाटाघाटींतून या कैद्यांची मुक्तता करावयास लावली. यानंतर त्याने मध्यपूर्वेत इझ्राएल-अरब संघर्षात व्यक्तिशः लक्ष घालून मध्यस्थाची भूमिका बजावली. ईजिप्तचा अध्यक्ष गमाल नासर आणि इझ्राएलचा पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरिआन यांची भेट घेऊन त्यांना तडजोड करण्याची विनंती केली. नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले (१९५६) आणि ईजिप्तची मालकी त्यावर असल्याचे घोषित करून हा कालवा जागतिक वाहतुकीला बंद केला. तेव्हा ब्रिटन, फ्रान्स व इझ्राएल यांनी युद्धाची धमकी दिली आणि तशी तयारी केली. या वेळी हामारशल्डने मध्यस्थी करून या तिघांना आपली सेना मागे घेण्याची विनंती केली व ईजिप्तला कालवा पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले. त्यामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेली युद्धजन्य तंग परिस्थिती निवळली.

 

हामारशल्डने यानंतर आफ्रिकेतील अशांत टापूत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे शांतीसेना पथके धाडली. त्याने १९६० मध्ये २४ आफ्रिकी देशांनाभेट दिली. काँगो प्रजासत्ताकात अंतर्गत कलह निर्माण झाला आणि यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा समितीने हामारशल्डला मध्यस्थीचे सर्व अधिकार दिले. एवढेच नव्हे, तर लष्करी साहाय्यही देण्याची तयारी दर्शविली. १९६१ च्या सप्टेंबरमध्ये त्याने काँगो प्रजासत्ताकास भेट दिली आणि तेथील विविध राजकीय गटांत सामंजस्य घडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी कटाइंगा प्रांत आणि यूनोचे शांतता दल यांच्यात चकमकी सुरू झाल्या. हामारशल्डने प्रथम काँगोचे अध्यक्ष जोसेफ कासाबाबू यांची किन्शासा (लिओपोल्डव्हिल) येथे भेट घेऊन नंतर काटांगाचा नेता मोशे तचोंबे याची भेट घेतली आणि शांततेसाठी निकराचा प्रयत्न केला. परतीच्या विमानास अपघात होऊन त्यात हामारशल्डचे दुर्दैवी निधन झाले.

 

हामारशल्डच्या मुत्सद्दीपणाला ‘पीस डिप्लोमसी’ ही संज्ञा तत्कालीन जगात रूढ झाली होती कारण १९५३–६१ दरम्यान तिसरे महायुद्ध उद्भवण्याची स्फोटक परिस्थिती असतानाही त्याच्या मध्यस्थीमुळे शांतता प्रस्थापित झाली. म्हणूनच नोबेल समितीने प्रथमच संकेत मोडून त्याला मरणोत्तर १९६१ चे नोबेल शांतता पारितोषिक दिले.

 

हामारशल्डचा मूळ पिंड अध्यात्मवादी शिक्षकाचा होता. त्याला कलांची आवड होती, तसेच धर्म आणि गूढता यांचे आकर्षण होते. यासंबंधी त्याने आपल्या दिनदर्शिकेत स्फुटलेखन केले होते आणि ते नंतर छापावे, अशी इच्छाही प्रदर्शित केली होती. त्यानुसार ते मार्किंग्ज या नावाने १९६४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. याशिवाय त्याची व्याख्याने आणि काही महत्त्वाचे लेख समग्र रीत्या छापण्यात आले आहेत.

 

संदर्भ : 1. Aulen, Gustaf, Dag Hammarskjold’s White Book : An Analysis of Markings, Minneapolis, 1961.

           2. Zacher, M. W. Dag Hammarskjold’s United Nations, Colambia, 1970.

शेख, रुक्साना