सय्यद, सर अली इमाम : (११ फेबुवारी १८६९-२७ ऑक्टोबर १९३२). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील मुस्लिम लीगचे एक नेते व कायदेपंडित. त्यांचा जन्म धार्मिक परंपरा असणाऱ्या सधन कुटुंबात पाटणा जिल्ह्यातील (बिहार राज्य) नेवरा या गावी झाला. शिया पंथीय इमाद इमामांचा हा ज्येष्ठ मुलगा. अर्हा झिला विदयालयातून मॅट्रिक झाल्यानंतर (१८८७) ते इंग्लंडला बार ॲट लॉसाठी गेले आणि बॅरिस्टर होऊन आले (१८९०). तत्काल त्यांनी पाटण्यात वकिली सुरू केली. त्यांनी नयिमा खातून या चुलत बहिणीशी पहिला विवाह केला (१८९१). त्यांना पाच मुलगे व चार मुली झाल्या. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पुढे त्यांनी चंद्रनगरच्या मेरी रोझ या महिलेशी दुसरा विवाह केला (१९१६). याशिवाय त्यांनी ॲनीस इमाम या महिलेशीही विवाह केला होता (१९१८).

वकिलीत त्यांना पैसा व प्रतिष्ठा लाभली. त्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांची शासनाचा सल्लगार म्हणून कलकत्ता उच्च न्यायालयात नियुक्ती केली (१९१०). त्यानंतर काही महिन्यांतच गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बिहारच्या भल्यासाठी पडदयामागून तेथील संविधानात्मक तरतुदीत कार्य केले. पुढे त्यांची पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली (१९१७). बिहार आणि ओरिसा प्रांतांच्या कार्यकारी मंडळावरही त्यांनी १९१८-१९ काम केले. त्यांची हैदराबाद संस्थानच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली (१९१९) तथापि बेरार प्रांत ब्रिटिश शासनाकडून परत मिळविण्यात त्यांना अपयश आले. शिवाय राजवाडयातील कारस्थाने यांना कंटाळून ते या सेवेतून मुक्त झाले.

यानंतरच त्यांच्या राजकीय जीवनास सुरूवात झाली. त्यांची राष्ट्रसंघावर भारतीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली (१९२०). त्यांनी प्रभावीपणे भारताची बाजू या संघटनेत मांडली. त्यानंतर पुन्हा त्यांनी वकिलीस प्रारंभ केला (१९२३) व अखेरपर्यंत ते यात कार्यमग्न होते. रांची येथे किरकोळ आजाराने त्यांचे निधन झाले.

त्यांना ब्रिटिश शासनाने सरदारकी (नाइटहुड) दिली (१९१०) आणि सीएस्आय् (१९११) व केसीएस्आय् (१९१४) हे बहुमान बहाल केले. तत्पूर्वी अलीगढ महाविदयालयाचे विश्वस्त (१९०८) व कलकत्ता विदयापीठाचे अधिछात्र (१९०८-१२) म्हणूनही ते होते. बिहारच्या प्रांतिक परिषदेत त्यांनी अध्यक्षपद भूषविले. मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा पुरस्कार केला तथापि भारताच्या एकात्मतेला तडा जाईल, अशी भूमिका घेतली नाही. तिचा पुनरूच्चार त्यांनी अमृतसरच्या मुस्लिम लीग अधिवेशनात (१९०८) अध्यक्षपदावरून बोलताना केला. हीच भूमिका राष्ट्रीय मुसलमानांच्या लखनौ परिषदेत (१९३१) त्यांनी अध्यक्षपदावरून प्रभावीपणे मांडली. हिंदूंच्या भावना गृहीत धरून मुसलमानांनी आपले अधिकार व सवलती यांचा लाभ घ्यावा आणि भारताची एकात्मता राखली पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांच्यावर पश्चिमी उदारमताचा प्रभाव होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या सत्तेमुळे शिक्षणाचा प्रसार झाला आणि लोकशाही तत्त्वे रूजली. तसेच इंगजी माध्यमामुळे अनेक ज्ञानाची कवाडे खुली झाली. भारतीयांमधील प्रादेशिकवाद, वांशिक भेदभाव आणि अनेक धर्मसंप्रदाय संपुष्टात आल्याशिवाय ब्रिटिशांनी (ब्रिटिश संसद) भारताला स्वराज्य देऊ नये, असे त्यांचे मत होते पण अखेरच्या दिवसांत त्यांनी भारतीय राष्ट्रवादाविषयी आत्मीयता दर्शविली (१९३१) आणि भारतीय मुस्लिम त्याला हातभार लावतील, असा विश्वास लखनौच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

अली इमाम हे उत्तम वक्ते होते. अरबी, फार्सी, उर्दू, इंगजी, फ्रेंच या भाषा त्यांना अवगत होत्या. पाश्चात्त्य पद्धतीच्या राहणीमानाबरोबरच त्यांचा दानधर्मही मोठा होता. मुसलमानांच्या, विशेषत: मुस्लिम लीगच्या मागण्यांविषयी सुरूवातीस ते आगही होते पण तत्कालीन राजकारणातील कॉंग्रेसची स्वातंत्र्य-चळवळ पाहता, ते राष्ट्रवादी मुस्लिम बनले.

देशपांडे, सु. र.