नक्षलवादी: पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी पोटविभागात आणि हिमालयाच्या पायथ्याशी नक्षलबारी हा सु. २०७ चौ. किमी.चा प्रदेश आहे. या भागात एकूण ६० खेड्यांचा अंतर्भाव होतो. तेथील वस्ती बव्हंशी संथाळ, ओराओं, मुंडा आणि राजवंशी या आदिवासी जमातींची आहे. मे १९६७ मध्ये मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या नक्षलबारी शाखेने मध्यवर्ती पक्षाला डावलून येथे आदिवासींचा सशस्त्र उठाव केला. नक्षलवादी उठावाची ही सुरुवात होती. ‘सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन’ आणि ‘माओ-त्से-तुंग हे आमचे प्रमुख’ या त्यांच्या घोषणा आणि चिनी सरहद्दीची समीपता यांमुळे नक्षलवादी उठावाकडे सर्व देशांचे लक्ष वेधले गेले. या उठावामागील विचारप्रणाली नक्षलवाद म्हणून ओळखली जाते.

नक्षलवादी उठावांच्या एकंदर पाच अवस्था आढळून येतात. पहिली अवस्था म्हणजे प. बंगालमध्ये संयुक्त आघाडीचे सरकार अधिकारावर असताना झालेला उठाव ही होय. हा उठाव दोन महिने टिकला. जुलै १९६७ मध्ये पोलिसांनी या बंडाचा बीमोड करून त्याचे सूत्रधार चारू मजुमदार व प्रत्यक्ष संचलन करणारे नेते कनू संन्याल व जंगल संथाळ यांना अटक केली. तीन महिन्यांनंतर त्यांना सोडून देण्यात आले. दुसऱ्या अवस्थेत नोव्हेंबर १९६८ मध्ये आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम् भागात असाच आदिवासी उठाव करण्यात आला. एप्रिल १९६९ मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ इ. राज्यांत अस्तित्वात आलेल्या नक्षलवादी गटांना एकत्र करून त्यांचा मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यात आला. मुख्यतः शेतकऱ्यांच्या द्वारा ग्रामीण भागांत सशस्त्र लढे करून सत्ता काबीज करणे, हे या पक्षाचे ध्येय होते. संसदीय कार्यपद्धतीला तसेच जनसंघटना व जनआंदोलन यांना त्यांचा तीव्र विरोध होता. चारू मजुमदार हे या पक्षाचे मुख्य सैद्धांतिक होते. माओ-त्से-तुंग आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी संपूर्ण एकनिष्ठ राहणे व माओच्या विचारानुसार भारतात क्रांती करणे, ही नक्षलवादाची प्रमुख तत्त्वे होती.

तिसऱ्या अवस्थेत त्यांनी ग्रामीण भागांत ‘लाल तळ’ स्थापन करणे आणि वर्गशत्रूंचा निःपात करणे हे दोन कार्यक्रम हाती घेतले. या अवस्थेत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम्‌मधील पार्वतीपुरम् या आदिवासी वस्त्या आणि प. बंगालमधील डेब्रा व गोपीबल्लवपूर या भागांत उठाव करण्यात आले. ते १९७० च्या मध्यापर्यंत चिरडले गेले. वर्गशत्रूंचा निःपात याचा अर्थ प्रत्यक्षात जमीनदार व पोलीस सहायक यांचा खून करणे असा होतो. त्यांची तथाकथित ‘गनिमी पथके’ ही त्यांच्या राजकीय पक्ष-संघटनेपासून स्वतंत्रपणे काम करू लागली.

चौथी अवस्था साधारण एक वर्ष टिकली. या अवस्थेत त्यांच्या हालचाली मुख्यतः कलकत्ता शहर आणि उपनगरे यांपुरत्याच केंद्रित होत्या. एप्रिल १९७० मध्ये शाळांवर छापे घालून नासधूस करणे व परीक्षांवर बहिष्कार घालणे, मान्यवर नेत्यांच्या पुतळ्यांचा विध्वंस करणे हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. नंतर त्यांनी शहरांतही वर्गशत्रूंचा निःपात करण्याचे धोरण स्वीकारले. या धोरणानुसार अनेक निःशस्त्र पोलीस, छोटे व्यापारी आणि राजकीय विरोधक (मुख्यतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते) यांचे खून केले. कलकत्त्याच्या काही भागांत त्यांनी आपली ‘मुक्तता क्षेत्रे’ स्थापन करून तेथून सर्व विरोधकांची हकालपट्टी केली. काही विद्यार्थी व समाजकंटक यांच्या गटाने ही चळवळ आपल्या ताब्यात घेतली.

त्यानंतर चळवळीत फाटाफूट पडली. उत्तर प्रदेश–बिहारच्या नक्षलवाद्यांनी पक्षातून अंग काढून घेतले. श्रीकाकुलम्‌मधील नक्षलवाद्यांनी पक्षनेतृत्वाचा धिक्कार केला व बंगालमधील सुशीतल रॉयचौधरीसारखे प्रमुख पुढारी भ्रमनिरास होऊन चारू मजुमदार यांच्यापासून दूर गेले. नक्षलवादी गटांचे आपसांतही सशस्त्र संघर्ष झाले. सुशीतल रॉयचौधरी मार्च १९७१ मध्ये हृदयविकाराने मरण पावले. आशू मजुमदार पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. चारू मजुमदार जुलै १९७२ मध्ये पकडले गेले व तुरुंगात असतानाच तेही निधन पावले. अशी रीतीने या नक्षलवादी उठावांचा शेवट झाला.

नक्षलवाद हा भारतातील माओवाद म्हणून सामान्यतः ओळखला जातो. मार्क्सवादी-लेनिनवादी आणि कट्टर माओवादी अशी त्यांची विचारप्रणाली  आहे परंतु प्रत्यक्षात नक्षलवादी तंत्र हे माओच्या जनयुद्धाच्या तंत्रापेक्षा फार भिन्न होते. विशेषतः जनसंघटना आणि जनआंदोलन यांचा पुरस्कार, मुख्य शत्रूविरुद्ध दुय्यम शत्रूबरोबर संयुक्त आघाडी करणे, लोकांमध्ये पाण्यातील माशांप्रमाणे मिसळून राहणे, या सर्व बाबतींत त्यांनी माओची सूत्रे पाळली नाहीत. पक्षसंघटनेच्या बाबतीत त्यांनी ‘लोकशाहीनिष्ठ केंद्रीकरणा’चे लेनिनचे तत्त्व सोडून विकेंद्रित पक्षसंघटना बांधण्याचा प्रयत्न केला. किंबहुना विकेंद्रितच काय पण कोणत्याच प्रकारची संघटना बांधण्यास व समिती पद्धतीने कामकाज करण्यास चारू मजुमदार यांचा विरोध होता. संसदीय पद्धतीवरील संपूर्ण बहिष्कार हाही मार्क्सवादाशी आणि साम्यवादी पक्षाच्या धोरणाशी सुसंगत नव्हता. तसेच वर्गशत्रूंचे वैयक्तिक रीत्या खून करणे, हे मार्क्सवादी-लेनिनवादी अथवा माओवादी धोरणात बसत नाही. तो निव्वळ वैयक्तिक दहशतवाद होतो. रशियात व चीनमध्ये गनिमी पथकांवर राजकीय पक्षाचे नियंत्रण होते बंदुकीवर पक्षाचेच नियंत्रण असावे, अशी भूमिका माओने साग्रह मांडलेली आहे  परंतु चारू मजुमदार यांनी त्यांच्या पथकांना पक्षनियंत्रणापासून अलिप्त ठेवले. चारू मजुमदार यांचा माओवाद हा माओवादाचीही भ्रष्ट नक्कल ठरला. शेतकऱ्यांच्या संघटना उभारण्यास नकार देऊन आणि आर्थिक लढ्यांना विरोध करून मार्क्सवाद-लेनिनवादातील एका मूलभूत सूत्रालाच त्यांनी मुरड घातली. नक्षलवाद्यांचे तीन किंवा चार प्रमुख गट निरनिराळ्या प्रदेशांत काम करीत असतात. ते कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) या त्यांच्या पक्षाची पुनर्घटना करून सर्व नक्षलवाद्यांत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संदर्भ : Dasgupta, Biplab, The Naxalite Movement, Bombay, 1974.

साक्रीकर, दिनकर