लूटूली, ॲल्बर्ट जॉन : (?१८९८-२१ जुलै १९६७). दक्षिण आफ्रिकेतील अहिंसावादी नेते, वर्णविद्वेषाचे विरोधक आणि शांतता नोबेल पारितोषिकाचे पहिले आफ्रिकन मानकरी.

त्यांचा जन्म सॉलूशी या ऱ्होडेशियातील एका खेड्यात ख्रिस्ती झूलू जमातीत झाला. हे कुटुंब मूळचे ग्रूटव्हिल (द. दरबान) येथील असून वडील जॉन बन्यन दुभाषाचे काम करीत, तर आई काही काळ धोबीकाम करत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर (१९०८) चुलते व आई यांनी त्यांचे संगोपन-शिक्षण केले. नाताळच्या मिशन स्कूलमधून शिक्षण घेऊन त्यांनी अमेरिकन बोर्ड मिशन महाविद्यालयातून (ॲडम्स) पदवी घेतली आणि तेथेच अध्यापकाची नोकरी धरली (१९२१). त्यांनी सहाध्यायी शिक्षिका जाकेरून्या भोंगू हिच्याशी विवाह केला (१९२७). तिथे सु. पंधरा वर्षे त्यांनी अध्यापन केले. या काळात त्यांनी आफ्रिकन शिखक संघटनेचे सचिव (१९२८) आणि अध्यक्ष (१९३२) ही पदे भूषविली. पुढे झूलू प्रथेप्रमाणे त्यांच्या घराण्याकडे जमात प्रमुखपद आले. जमातीतील वयोवृद्धांच्या इच्छेनुसार त्यांनी हे पद स्वीकारले (१९३६). त्यांच्यापुढे जमातीतील अनेक प्रश्र्न उभे होते. याशिवाय त्यांना जमातीतील प्रत्येक समारंभाचे संयोजन, दंडाची वसुली, आपापसांतील तंटे मिटविणे, जमातीच्या बैठकांना अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणे इ. कामे करावी लागत. जमातप्रमुख असताना त्यांचे लक्ष आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसने वेधून घेतले. ते या संघटनेचे १९४५ मध्ये सक्रिय सभासद झाले. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्यांचे वांशिक पृथक्वसनाचे प्रयत्न जोरदार चालू होते. त्याला त्यांनी अहिंसात्मक मार्गांनी विरोध केला. तेव्हा जमातप्रमुख या त्यांच्या पदाला शासनाची मान्यता नाही, या तत्त्वावर त्यांना पदच्युत करण्यात आले (१९५२). त्याच साली त्यांची आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसचा मूळ उद्देश मानवी हक्कांचे रक्षण हा होता. दक्षिण आफ्रिकेत काळ्यांना  राजकीय हक्क नाकारण्यात येऊन त्यांच्या खाजगी जीवनावरही प्रतिबंध लादण्यात आले होते. त्यांनी पारंपरिक रीत्या चालत आलेल्या काळे आणि गोरे यांच्या संघर्षातील वर्णभेद मिटविण्यासाठी दोघेही मानवतेच्या अतूट नात्याने कसे बांधले गेले आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि काळ्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी मोहीम आखली. परिणामतः त्यांच्या हालचालींवर कडक निर्बंध लादण्यात आले. त्यांना काही वर्षे कारावासातही डांबण्यात आले. अपार्थाइट (वर्णविद्वेष) कायद्याविरूद्ध निदर्शने करणाऱ्यांची शार्पव्हिल येथे शासनाने कत्तल केली आणि आफ्रिकन काँग्रेसवर बंदी घातली. शांततामय व अहिंसात्मक लढ्यासाठी त्यांना जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९६०).

यानंतर त्यांना ग्लासगो विद्यापीठात कुलमंत्रिपद देण्यात आले परंतु या पदावर हजर राहण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. लूटूलींनी विपुल स्फुटलेखन केले. त्यांचे आत्मवृत्त लेट माय पीपल गो एकाच वेळी ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध झाले (१९६२). शासनाने राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना नजरकैदेत ठेवले होते. ग्रूटव्हिल येथील रेल्वे अपघातात ते मरण पावले.

संदर्भ : 1. Benson, Mary, Chief Albert Luthuli of South Africa, London, 1963.

           2.Callan, Edward, Albert John Luthuli and the South African Race Conflict, London, 1965.

           3. Callan, Edward, The African Patriots : The Story of the African National Congress, London, 1965. 

           ४. शेख, रुक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६. 

शेख, रुक्साना