वसाहतवाद : आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद  म्हणतात. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. दुसऱ्या प्रदेशात वा देशात वसती केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश व्यापणे अथवा त्या प्रदेशातील लोकांत आपला संघटित गट करून आपले वर्चस्व प्रस्थापिणे, ही पुढची प्रक्रिया होय. या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवृत्ती म्हणतात. या प्रवृत्तीत समर्थ देशाने आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वर्चस्व दुसऱ्या प्रदेशावर लादणे अंतर्भूत असते. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरूप विस्तृत व सर्वंकष झाले आणि त्याची परिणती नवसाम्राज्यवादात झाली. औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या यूरोपीय राष्ट्र-राज्यांनी व्यापारी बाजारपेठांसाठी मागासलेल्या व अविकसित वसाहतींवर राजकीय, आर्थिक, लष्करी वर्चस्व लादणे, ही अनिवार्य गोष्ट झाली. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतरचा वसाहतवाद आर्थिक दृष्ट्या शोषक, राजकीय दृष्ट्या जुलमी, सामाजिक दृष्ट्या अनुदार व सांस्कृतिक दृष्ट्या असहिष्णू बनला.  

वसाहतवादाची पार्श्वभूमी विशद करताना वसाहत व वसाहतीकरण, या दोन संकल्पनाचा विचार महत्त्वाचा ठरतो.  

वसाहत : या शब्दाला भिन्न अर्थ आहेत आणि या शब्दाची व्याख्या भिन्न प्रकारे केली जाते. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एका विशिष्ट भागात वसती करून राहणे व आपल्या मातृभूमीशी निष्ठा ठेवणे, असा या संज्ञेचा सरळ (सर्वसाधारण) अर्थ आहे. स्वयंशासनाचा अधिकार नसणारा, दुसऱ्या देशाच्या प्रभुत्वाखाली असणारा प्रदेश म्हणजेच वसाहत होय. सामर्थ्यशाली प्रगत देशातील एका लोकसमूहाने दुसऱ्या अविकसित वा मागासलेल्या भूप्रदेशात व्यापार वा अन्य कारणांसाठी स्थापन केलेली वसती म्हणजे वसाहत. वसाहतीच्या स्थापनेत सोने-चांदी, मसाल्याचे पदार्थ तसेच कच्चा माल यांबरोबरच हवामान हाही एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे समशीतोष्ण हवामान असलेल्या भूप्रदेशात वसाहती स्थापन करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. या दृष्टीने उत्तर अमेरिका खंड, हिंदुस्थान हे भूप्रदेश वैशिष्ट्यपूर्ण ठरले. वसाहतवाल्यांनी अमेरिकेतील इंडियनांना हाकून देऊन तेथे आपले बस्तान बसविले. अतिथंड व अतिउष्ण अशा प्रदेशांत तुलनात्मक दृष्ट्या फार थोडया वसाहती स्थापन झाल्या. अशा ठिकाणी वसाहतवाल्यांनी स्थानिक लोकांवर नियंत्रण ठेवून राज्यकर्त्याची भूमिका बजाविली. उदा., बेल्जियन काँगो, जिब्राल्टर, हॉंगकाँग, सिंगापूर या लघुवसाहती होत्या भारत, बेल्जियन काँगो, कॅनडा इ. प्रादेशिक वसाहती होत्या तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या इंग्रजांच्या कायम वस्ती करण्याच्या प्रस्थापित वसाहती होत्या. वसाहतीकरणाच्या विकासक्रमामध्ये वसाहतीचे राजकीय स्वरूप व दर्जा भिन्न होता. मुख्यतः बाजारपेठ काबीज करण्याच्या उद्देशाने सोळाव्या शतकापासून यूरोपातील सागरी दृष्ट्या सामर्थ्यवान देशांनी जगाच्या विविध भागांमध्ये वसाहती स्थापन केल्या. पुढे त्या प्रदेशांवर राजकीय वर्चस्व स्थापून ते आपल्याच देशाचे भाग बनवून टाकले. पहिल्या महायुद्धानंतर काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळेच वसाहतींची अधीन राज्य, रक्षित राज्य, महादेशक क्षेत्र व विश्वस्त स्वाधीन प्रदेश, अशी विभिन्न स्थित्यंतरे झालेली आढळतात.  

सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वसाहती स्वतःचे शासन चालविण्यास असमर्थ असल्याचे कारण देऊन त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला जात नसे. त्यावेळी ज्या राष्ट्राची ती वसाहत असेल, त्याचेच शासन त्या वसाहतीवर लादले जाई आणि वसाहतीसाठी ते राष्ट्रच कायदे करीत असे व त्यांची अंमलबजावणी आपल्या नियुक्त अधिकाऱ्यांमार्फत करी. अशा प्रकारची अधीन राज्यव्यवस्था फ्रेंच-पोर्तुगीज वसाहतींमधून प्रामुख्याने आढळते. वसाहतीचे रक्षित राज्य हे समर्थ संरक्षक राष्ट्राच्या प्रदेशाचा अविभाज्य भाग नसते. अशा वसाहतीच्या संरक्षणाची जबाबदारी संरक्षक राज्य घेते. अशा वसाहतीस काही प्रमाणात अंतर्गत स्वायत्तता मिळते परंतु आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजनैतिक संबंध यांबाबत त्या वसाहतीस स्वातंत्र्य नसते. वसाहत स्वतंत्र होण्याच्या मार्गातील ती प्राथमिक अवस्था म्हणावी लागेल कारण नायजेरिया, युगांडा, न्यासालॅंड, मोरोक्को, ट्युनिशिया या वसाहती इंग्लंड-फ्रान्सची रक्षित राज्ये म्हणून सुरुवातीस उल्लेखिल्या जात.  

महादेशक क्षेत्र : राष्ट्रसंघाच्या बाविसाव्या अनुच्छेदानुसार प्रस्थापित झालेली ही विश्वस्तपद्धती होती. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान यांचा पराभव झाला, तेव्हा त्यांच्या वर्चस्वाखालील वसाहतींच्या शासनव्यवस्थेसाठी राष्ट्रसंघाने एक योजना कार्यान्वित केली. तीनुसार अ, ब व क असे तीन वर्ग पाडण्यात आले आणि जेत्या राष्ट्रांपैकी ग्रेट ब्रिटन, फ्रान्स इत्यादींची अधीक्षक राष्ट्रे म्हणून नेमणूक करण्यात आली. अ वर्गात इराक, पॅलेस्टाइन, ट्रान्स-जॉर्डन, सिरिया व लेबानन ह्या तुर्की साम्राज्यांतर्गत वसाहतींचा समावेश करण्यात आला आणि त्यांची शासनव्यवस्था ग्रेट ब्रिटन वा फ्रान्सकडे अस्थायी स्वरूपात सुपूर्त करण्यात आली. ब वर्गात आफ्रिकेतील जर्मनीच्या सर्व वसाहतींचा अंतर्भाव होता आणि क वर्गात नैर्ॠत्य आफ्रिका आणि जर्मनीच्या ताब्यातील पॅसिफिक महासागरातील लहान भूप्रदेशांचा समावेश करण्यात आला होता परंतु पुढे राष्ट्रसंघ अधीक्षक राष्ट्रांवर योग्य ती देखरेख ठेवण्यात अयशस्वी झाल्याने ही राष्ट्रे केवळ अधीक्षक न राहता प्रत्यक्षात सत्ताधारी म्हणूनच वसाहतींचा कार्यभार पाहू लागली. म्हणजेच वसाहतींचा परतंत्र दर्जा कायम राहिला, राज्यकर्ता देश बदलला एवढेच.  

विश्वस्त स्वाधीन प्रदेश : दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती हा एक विश्वस्त निधी आहे, हा विचार संयुक्त राष्ट्रांनी आपल्या सनदेत अंतर्भूत केला आणि वसाहतीसाठी एक विश्वस्त समिती स्थापन केली. या योजनेनुसार सभासद राष्ट्रांनी आपल्या अखत्यारीतील वसाहतीचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि त्या वसाहतींच्या सांस्कृतिक प्रगतीकडे लक्ष देऊन तेथील प्रजेला स्वराज्यासाठी प्रशिक्षित करावे, असे ठरले.  


 

वसाहतीकरण : प्राचीन संस्कृतींच्या काळात वसाहतीकरणाची प्रक्रिया इ.स.पू. तिसऱ्या सहस्त्रकापासून अस्तित्वात होती. लष्करी दृष्ट्या समर्थ सत्तेने प्रतिष्ठा, प्रदेशविस्तार, व्यापारवृद्धी, वांशिक आकांक्षा यांसाठी कमकुवत वा दुर्बल राज्यशासन असलेल्या भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रवृत्तीतून वसाहतीकरणाची प्रक्रिया निर्माण झाली.  

परक्या प्रदेशांमध्ये जाऊन संपन्न संस्कृतींचे लोक वसती करून राहू लागले. तेथे ते आपले सांस्कृतिक वर्चस्व स्थापन करीत. अर्थात या सर्व वसाहतींवर मूळ सत्ताधाऱ्यांची नाममात्र मालकी वा अधिसत्ता असे आणि केंद्रीय सत्तेचा फारसा वचक नसे. या बहुतेक सर्व वसाहतींत स्वयंशासित कारभार असून त्या स्वतंत्रच होत्या, मात्र मातृदेशांशी त्यांचे भावनात्मक व धार्मिक बाबतींत संबंध असत. प्रसंगोपात अशा वसाहतींनी मातृदेशाविरुद्ध शत्रूला मदत केल्याचीही काही उदाहरणे आढळतात.  

प्रत्यक्षात अशी साम्राज्ये फार थोडी होती आणि यूरोपीय सागरपार वसाहती स्थापन होण्यापूर्वी ती जवळजवळ संपुष्टात आली होती. या प्राचीन वसाहतींचे स्वरूप आधुनिक वसाहतवादापेक्षा पूर्णतःभिन्न होते मात्र प्राचीन व अर्वाचीन वसाहतीकरणामागील प्रेरणा कमी-अधिक प्रमाणात त्याच होत्या आणि त्यांत साम्राज्यविस्तार व वांशिक आकांक्षा यांबरोबर धर्मप्रसार, व्यापारवृद्धी, व्यापारवाद व सीमा सुरक्षितता यांची भर पडली. 

 

आधुनिक वसाहतवादाची सुरुवात पंधराव्या शतकात पोर्तुगाल आणि स्पेन येथील समन्वेषकांनी केली. त्यांना भारत आणि अतिपूर्वेकडील देशांचा तसेच काही जलमार्गांचा शोध घ्यावयाचा होता. मध्य पूर्वेतील मार्ग मुसलमानांच्या अखत्यारीत होते आणि त्यामुळे ते युरोप व आशिया खंडांदरम्यानच्या व्यापारावर नियंत्रण ठेवीत. युरोपियनांना हा व्यापार आपल्या हाती यावा, असे वाटत होते. याचा सुमारास दक्षिण आफ्रिकेचा शोध १४८८ मध्ये लागल्यानंतर तो जलमार्ग परिचयाचा झाला आणि त्यानंतर १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लागला. तेव्हा अनेक यूरोपीय राष्ट्रांनी वसाहतीकरणासाठी आपल्या प्रवाशांना धाडले. पोर्तुगालने यात प्रथम प्रवेश केला. प्रिन्स हेन्‍री द नॅव्हिगेटर मरण पावला (१४६०), तेव्हा त्याची सुवर्ण, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ आणि गुलामांविषयीची अभिलाषा भागविण्यासाठी पाठविलेल्या प्रवाशांनी केप व्हर्द बेटांचा शोध लावला आणि मादीरा बेटांचे वसाहतीकरण झाले. बार्थालोमेऊ दीयश याने केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदी महासागरात प्रवेश केला आणि १४९८ मध्ये वास्को द गामा याने हिंदुस्थानातून मसाल्याचे पदार्थ गोळा केले. पुढे पोर्तुगालने ब्राझील घेऊन हळूहळू पश्चिम आफ्रिकेचा किनारा. हिंदुस्थानातील काही भाग आणि आग्नेय आशियातील निवडक प्रदेशांवर व्यापारी वसाहती स्थापल्या. स्पेनने विद्यमान अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि लॅटिन अमेरिकेचा काही प्रदेश व्यापला. कोलंबसने क्यूबाचा शोध लावल्यानंतर त्याने स्पेनसाठी बहामा, हिस्पेनिआ यांचा शोध घेतला. पुढे स्पॅनिश दर्यावर्दी पनामाची संयोगभूमी (इस्थमस ऑफ पनामा) आणि ब्राझील यांवर हक्क सांगू लागले. फर्डिनंड मॅगेलन ह्या पोर्तुगीज समन्वेषकाने स्पेनच्या झेंड्याखाली दक्षिण अमेरिकेचा काही भाग आणि पॅसिफिकमधील काही बेटांचा शोध लावला. यातून स्पेनला वेस्ट इंडीजची बेटे मिळाली. त्यांतून अमाप सोने-चांदी मिळाली. परिणामतः स्पेनने दक्षिणेत चिलीपासून उत्तरेकडे मेक्सिकोपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीसच डचांनी नाविक क्षेत्रात प्रगती करून इ.स. १६०२ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि व्यापाराच्या निमित्ताने पौर्वात्य जगतात एक छोटे साम्राज्यच निर्माण केले. तेव्हा त्यांच्या आधिपत्याखाली बटेव्हिया (जाकार्ता) जावा, माले हे प्रदेश होते. तेथून त्यांनी चीन, जपान, हिंदुस्थान, श्रीलंका, इराण यांबरोबर व्यापारी संबंध जोडले. याच सुमारास इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली (१६००). तिने अमेरिकेनंतर आशिया खंडाकडे लक्ष दिले. फ्रान्सचा सॅम्यूएल द शांप्लेन हा प्रथम कॅनडाला गेला (१६०३) आणि त्याने क्वीबेकचा शोध लावला (१६०८) परंतु फ्रेंच वसाहतीकरणाच्या शर्यतीत तसे एकूण संथच होते. सतराव्या शतकात डच, इंग्रज, फ्रेंच यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील आशियाई व्यापारावर नियंत्रण मिळविले. डचांनी इंडोनेशिया आणि इंग्रजांनी हिंदुस्थान येथे आपले बस्तान बसविले. याशिवाय डच, इंग्रज व फ्रेंच यांनी लॅटिन अमेरिकेतील काही भूप्रदेशांवर वर्चस्व मिळविले. इंग्रज व फ्रेंचांनी कॅनडाचा काही भाग व्यापला. डच, फ्रेंच व इंग्रजांनी विद्यमान अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांवर आपले अधिकार वेगवेगळ्या भूभागांवर प्रस्थापित केले. तेथे इंग्रजांनी प्रथम तेरा वसाहती स्थापन केल्या. इ.स. १६२४ मध्ये डचांनी न्यू नेदर्लंड्समध्ये असलेल्या प्रदेशावर ताबा मिळविला, त्यात चार वसाहती होत्या. इंग्रजांनी त्या १६६४ मध्ये घेतल्या. फ्रेंच व इंग्रज यांमधील युद्धातून इंग्रजांचे वर्चस्व वाढले. इंग्रजांनी फ्रेंचांच्या बहुतेक सर्व वसाहती घेतल्या. या वसाहतींचा इंग्लंडमध्ये प्रशिक्षित झालेल्या अधिकाऱ्यामार्फत राज्यकारभार चालत असे.  

 

अमेरिकेतील पहिल्या तेरा वसाहतींनी स्वातंत्र्य युद्धाद्वारे (१७७५-८३) इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळविले, त्यानंतर लॅटिन अमेरिकेतील वसाहतींनी स्वातंत्र्यासाठी लढा देऊन १८००-१९०० दरम्यान स्वातंत्र्य मिळविले. एकोणिसाव्या शतकात स्पेनच्या दक्षिण व मध्य अमेरिकेतील बहुतेक सर्व वसाहती संपुष्टात आल्या आणि १८९८-९९ मध्ये अमेरिकेबरोबरच्या युद्धानंतर त्यांपैकी काही अमेरिकेला मिळाल्या. त्यामुळे अमेरिकेतील यूरोपीय वसाहतवादाला शह बसला. इंग्लंडने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे स्थायी स्वरूपाच्या वसाहती स्थापन करून तेथे ग्रेट ब्रिटनमधून अनेक इंग्रज लोकांना नेले. या वसाहती ग्रेट ब्रिटनमधील बहुसंख्य उत्प्रवासी लोकांनी वसविल्यामुळे तेथील लोकसंख्या पूर्णतः ब्रिटिश झाली. औद्योगिक क्रांतीनंतर कच्च्या मालाची गरज वाढली. साहजिकच पक्क्या तयार मालासाठी व्यापारपेठांची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे वसाहतवादाला चालना मिळाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या चतुर्थकात जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बेल्जियम, इटली व जपान ह्या आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या सामर्थ्यशाली असलेल्या राष्ट्रांनी प्रदेश-विस्ताराच्या चढाओढीत सहभाग घेतला. रशिया हासुद्धा त्यात आला. त्याने सायबीरिया, अतिपूर्वेकडील भाग, कॉकेशस आणि आशिया खंडातील कोरियन साम्राज्यालगतचा प्रदेश व्यापला, पण रशिया-जपान युद्धानंतर (१९०५) रशियाने काढता पाय घेतला. अमेरिकेने फिलिपीन्स व हॉलंडने (नेदरर्लंड्स) ईस्ट इंडीज बेटे घेतली. पॅसिफिक बेटांविषयी पाश्चात्त्य राष्ट्रांत चढाओढ सुरू झाली. इंग्लंडने हिंदुस्थान, सीलोन (श्रीलंका) घेऊन साम्राज्य दृढतर केले. इतर यूरोपीय राष्ट्रांनी अफूच्या युद्धांद्वारे चीन विभागून घेतला. आफ्रिका खंडास नवसाम्राज्यवादाने धुमाकूळ घातला. आफ्रिकेतील भूप्रदेशाचे १८८० पर्यंत फारसे वसाहतीकरण झाले नव्हते परंतु त्यानंतर १९०० पर्यंत यूरोपीय राष्ट्रांनी इथिओपिया व लायबीरिया हे प्रदेश वगळता उर्वरित आफ्रिका खंड आपापसांत वाटून घेतले. याची सुरुवात फ्रान्सने अल्जीरिया घेऊन झाली. नंतर ब्रिटिशांनी ट्रान्सव्हाल, टांगानिका, दक्षिण आफ्रिका आदी प्रदेश घेतले. पहिले महायुद्ध आणि दुसरे यांतील सु. वीस वर्षांच्या काळात वसाहतीकरणास शीघ्र गती मिळाली, तद्वतच काही वसाहतींमधून राष्ट्रीय चळवळींनी जोर धरला व उठाव झाले. 


निर्वसाहतीकरण : यूरोपीय राष्ट्रे सततच्या संघर्षाने-युद्धाने-लष्करदृष्ट्या कमकुवत बनत चालली होती. एतद्‍देशीयांच्या वसाहतवादाविरुद्धची चळवळ हळूहळू क्रांतीचा पवित्रा घेऊ लागली होती. आशिया आणि आफ्रिका खंडांतील देशांतून राष्ट्रीय भावना जागृत होऊन स्वयंशासनाची मागणी पुढे येऊ लागली. याच सुमारास अनेक विचारवंत वसाहतवाद ही संकल्पनाच अन्यायकारक आहे, असे मत प्रतिपादन करू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या साम्राज्यविस्तारास आळा बसताच ग्रेट ब्रिटननेसुद्धा आपले वसाहतीविषयीचे धोरण सौम्य करून साम्राज्य आटोपते करण्यास प्रारंभ केला व भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य दिले (१९४७). त्यानंतर आफ्रिकेतील काही वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात आले (१९५६). सायप्रस, मॉल्टा हे देश स्वतंत्र झाले (१९६०). ग्रेट ब्रिटनने इराणच्या आखातामधून १९७१ मध्ये सैन्य काढून घेतले. त्याचवर्षी ब्रिटनने सिंगापूरमधूनही सैन्य काढले. काही वसाहतींनी शांततामय मार्गांनी स्वातंत्र्य मिळविले. फ्रान्सला याबाबत युद्धाला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा फ्रेंच इंडोचायना, मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जीरिया हे देश स्वतंत्र झाले. १९८० पर्यंत जवळजवळ बहुतेक वसाहती परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेल्या होत्या.  

ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्या अद्यापि कुठेतरी तुरळक प्रमाणात वसाहती आहेत तथापि ही राष्ट्रे अधिकृतरित्या त्यांना वसाहती म्हणून संबोधीत नाहीत. ग्रेट ब्रिटन त्यांना परावलंबी प्रदेश म्हणतो, सामोआ, ग्वॉम आणि काही पॅसिफिक बेटे तसेच व्हर्जिन बेटे, प्वेर्त रीको इ. देश अमेरिकेच्या कच्छपी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व यूरोपातील काही देशांवर सोव्हिएट रशियाने अप्रत्यक्ष वर्चस्व स्थापन केल्यामुळे शीतयुद्धाच्या काळात त्यांना काही वेळा वसाहती म्हणून सोव्हिएट विरोधकांकडून गणले जाई. १९८५ नंतर सोव्हिएट धोरणात बदल होऊन सर्व पूर्व यूरोपीय देश सोव्हिएट वर्चस्वातून मुक्त झाले आहेत.  

वसाहतवादाचे स्वरूप : वसाहतीकरणानंतर वसाहतीतील प्रजेवर मातृदेशातील लोकांनी, विशेषतः सत्ताधीशांनी, आपली जीवनपद्धती तेथील लोकांवर लादण्याचा सातत्याने प्रयत्‍न केला आणि त्यांनी असा आभास निर्माण केला की, आपली संस्कृती वसाहतीतील मूळ संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. काही वसाहतवाल्यांनी वसाहतीतील मूळ लोकांवर धर्मांतराची सक्ती केली. या संदर्भात पोर्तुगालचे उदाहरण अगदी बोलके आहे. काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी वसाहतीतील लोकांवर आपल्या भाषेची सक्ती केली. वसाहतींच्या भौतिक विकासासाठी वसाहतवाल्यांनी रेल्वे आणली, जुने रस्ते दुरुस्त केले, नवीन रस्ते खोदले, भव्य वास्तू बांधल्या आणि कारखाने सुरू करून वसाहतीत औद्योगिकरणास उत्तेजन दिले शाळा काढून शिक्षणप्रसारास प्रोत्साहन दिले दवाखाने उघडून लोकांच्या औषधोपचारांची व्यवस्था केली. या सर्व सुधारणांमागे त्यांचा हेतू मूलतः वसाहतीतील सामान्य लोकांची सहानुभूती मिळवून राजकीय सत्ता दृढतर करणे, हा होता. तीच बाब आर्थिक धोरणात त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली. लोकांचे कल्याण व्हावे, यापेक्षा संपत्तीचा ओघ मातृदेशात कसा जाईल, यावर त्यांची दृष्टी खिळली होती. म्हणून वसाहतीतील मजुरांचे श्रम ते जवळजवळ वेठबिगारीने घेत. 

 औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाची झपाट्याने वाढ झाली आणि नव-साम्राज्यवादाबरोबर यूरोपमध्ये व्यापारवाद (मर्कटिलिझम) ही आर्थिक पद्धत रूढ झाली. या पद्धतीनुसार पाश्चात्त्य राष्ट्रे आपल्या वसाहतींतील अर्थव्यवस्था आपल्या व्यापाराला कशी उपयुक्त होईल, या दृष्टिकोनातून पाहू लागली आणि त्यानुसार आर्थिक संयोजन करू लागली. ग्रेट ब्रिटनने या दृष्टीनेच अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत आपल्या व्यापारास अनुकूल असे अनेक कायदे वसाहतींत केले. त्याला अनुसरूनच वसाहतींनी कच्चा माल पुरवावयाचा आणि तयार झालेला पक्का माल विकत घ्यावयाचा, अशी पद्धत रूढ झाली. जणू हा विधिलिखित संकेतच ठरला. परिणामतः  वसाहती या हक्काच्या व्यापारपेठा बनल्या. गुलामगिरी हाही यातील एक फार मोठा भाग होता. म्हणून दक्षिण अमेरिकेतील वसाहतीत यूरोपियनांनी प्रथम तेथील इंडियन लोकांना कापसाचे उत्पन्न वाढविण्यासाठी व इतर कच्च्या मालाकरिता विविध मळ्यांवर (प्लॅटेशन्स) कामास सक्ती केली. पुढे त्यांनी आफ्रिकेतून काही गुलाम या कामासाठी आणले. त्यातून एकोणिसाव्या शतकात गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभी राहिली. पुढे ब्रिटिशांच्या हे लक्षात आले, की प्रचलित व्यापारवादामुळे काही धंद्यांवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा त्यांनी मुक्त व्यापाराचे धोरण अवलंबिले. त्यामुळे आपाततःवसाहतीतील व्यापारावरील निर्बंध शिथिल करण्यात आले. ग्रेट ब्रिटनचे अनुकरण अन्य काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी केले परंतु या धोरणामुळे आफ्रिका-आशिया खंडांतील वसाहतीकरणास आळा बसला नाही व कच्चा माल पुरविणे आणि तयार माल विकत घेणे, ही अवस्था तशीच काही प्रमाणात चालू राहिली. याशिवाय यूरोप खंडातील धनाढ्य लोक, उद्योगपती, बॅंका यांनी वसाहतींतील खाणी, कारखाने, चहा-कॉफीचे मळे, निळीचा उद्योग, रेल्वे उद्योग, जहाजबांधणी उद्योग इत्यादींत भांडवल गुंतवून त्यांतून नफा मिळविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे साहजिकच वसाहतींतील पैशाचा ओघ मातृदेशाकडे वाहत राहिला. 

वसाहतींतील राजकारणात वैविध्य आढळते. काही अधिसत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रांनी वसाहतींना स्वातंत्र्य दिले तर काहींनी वसाहतीचे स्वराज्य (डोमिन्यन स्टेटस) मान्य केले. प्रत्येक यूरोपीय राष्ट्राची याबाबतची भूमिका भिन्न होती.  


वसाहतवादाचे काही बरेवाईट परिणाम वसाहतींवर झालेले आढळतात. सत्ताधाऱ्यांनी वसाहतींतील आर्थिक साधनसामग्रीचे शोषण केले आणि सत्ताधारी राष्ट्रे श्रीमंत-सधन बनली आणि लष्करी दृष्ट्याही ती सामर्थ्यशाली झाली, ही वस्तुस्थिती आहे. त्याबरोबरच वसाहतींत काही विकासाची कामे झाली. राज्यकर्त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारले आणि वाढविले. याच सुमारास इंग्रजी भाषा, शिक्षणपद्धती, प्रशासन-पद्धती, पोस्ट-तार सेवा, रेल्वे, औद्योगिक विस्तार या बाबी आल्या. लोकशाहीची आणि आपल्या अस्मितेची जाणीव वसाहतीतील जनतेला झाली. आधुनिक पाश्चात्त्य तंत्रज्ञानाची ओळख वसाहतिक देशांना झाली. त्यामुळे तांत्रिक ज्ञान वाढून औद्योगिकीकरणास चालना मिळाली. वैद्यकीय सोयी उपलब्ध झाल्या आणि प्रागतिक संशोधनास प्रोत्साहन मिळाले. शिक्षणप्रसारामुळे लोकशाही तंत्राच्या कल्पना रुजल्या व सुशिक्षित माणूस विचार करू लागला. तथापि सत्ताधाऱ्यांनी राज्य करण्यास योग्य असे फारसे शिक्षण मूळ रहिवाशांना दिले नाही. उलट काही सत्ताधीशांनी आपल्या संस्कृतीची, धर्माची, भाषेची जबरदस्ती केली. त्यामुळे मूळ रहिवासी व वसाहतवाले यांत अखेरपर्यंत एक दरी राहिलीच. वसाहतवादामुळे स्थानिक संस्कृतींचे खच्चीकरण झाले आणि वसाहतिक प्रदेशांवर याचे खोलवर प्रतिकूल परिणामही झाले, हे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व गुणावगुणांची चिकित्सक व साक्षेपी चर्चा केल्यानंतर अनेक इतिहासकार हे मान्य करतात की, वसाहतवादामुळे मूळ लोकांना पाश्चात्त्य प्रगत ज्ञानाची ओळख होऊन विविध क्षेत्रांत प्रगती झाली. तसेच शिक्षणप्रसाराने राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होऊन शासनाला विरोध होऊ लागला. त्याचप्रमाणे वसाहतींचे दीर्घकाल आर्थिक शोषण झाले. वसाहतींच्या आजच्या आर्थिक दुर्बलतेचे ते एक मुख्य कारण आहे. त्यामुळे वसाहतींची वसाहतवादामुळे प्रगती झाली, असे मानण्यापेक्षा वसाहतवादामुळे सांस्कृतिक व आर्थिक मानहानी व दौर्बल्य आले, असे मानणेच वस्तुनिष्ठ ठरेल.  

वसाहतवादाचा सर्वत्र तत्त्वतःआज अंत झाला असला, तरीसुद्धा सधन-सामर्थ्यशाली राष्ट्रांनी वसाहतिक देशांवरील आपले वर्चस्व अन्य मार्गांनी प्रस्थापित केले आहे. त्यातून ‘नववसाहतवाद’ या संकल्पनेचा उगम झाला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुसंख्य वसाहतिक देशांनी राजकीय स्वातंत्र्य मिळविले असले, तरी ते अद्यापि विकसनशील वा मागास या अवस्थेतच गणले जातात. त्यामुळे अशा देशांना भौतिक प्रगती करण्यासाठी सुसंपन्न असलेल्या धनाढ्य देशांवर अवलंबून रहावे लागते. साहजिकच प्रगत भांडवलशाही देशांचे आर्थिक व सांस्कृतिक वर्चस्व अजूनही या वसाहतिक देशांवर आहे. त्यामुळे विकसित देश विकसनशील वा अविकसित देशांच्या अंतर्गत व्यवहारावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचा (आर्थिक कोंडी) प्रयत्‍न करतात. या परावलंबित्वामुळे विकसित राष्ट्रे विकसनशील राष्ट्राच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेतात आणि तेथील राजकीय परिस्थितीवर वर्चस्व गाजवितात किंवा आपल्याला योग्य वाटेल अशा व्यक्तींना सत्तास्थानी आणण्याचा प्रयत्‍न करतात किंवा दबाव आणतात. प्रत्यक्षात राजकीय वर्चस्व प्रस्थापित न करता संस्कृती विचार, तंत्रज्ञान, शिक्षण व आधुनिक शस्त्रास्त्रे यांची निर्यात करून वसाहतिक देशांवर आपले वर्चस्व कायम ठेवतात. जागतिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे ही पाश्चात्त्य प्रगत देशांची महत्त्वाकांक्षा दिसते. आंतरराष्ट्रीय आर्थिक यंत्रणांच्या मार्फत आपल्याला अनुकूल अशी आर्थिक धोरणे हे देश अप्रगत देशांवर लादतात. याशिवाय पाश्चात्त्य सांस्कृतिक मानदंड प्रमाण मानणे, पाश्चात्त्यांचे अनुकरण करणे इ. स्वरूपातही प्रगत देशांचे छुपे वर्चस्व व्यक्त होते. या परिस्थितीचे वर्णन नववसाहतवाद असे केले जाते. हा नवा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी आर्थिक सुबत्तेएवढेच स्वसंस्कृतीच्या अभिमानालाही महत्त्व आहे. विविध रूपांमध्ये देशीवाद व्यक्त होतो, तो या नववसाहतवादावरील प्रतिक्रियाच होय.

पहा : आफ्रिका इंग्रजी अंमल, भारतातील ईस्ट इंडिया कंपन्या पोर्तुगीज सत्ता, भारतातील फ्रेंच सत्ता, भारतातील साम्राज्यवाद.

संदर्भ : 1. Bert, J. Chailley, The colonization of Indo-China, London, 1985.

           2. Burns, Sir Alan C. In Defence of Colonies : British Colonial Tarritrories in International Affairs, London, 1957.

          3. Cohen, Benjamin Jerry, The Question of Imperialism : The Political Economy of Dominance and Dependence, New York, 1973.

           4. Easton, Stewart C. The Rise and Fall of Western Colonialism : A Historical Survey from the Early Nineteenth Century to the Present,

New York, 1964.

          5. Fieldhouse, David Kenneth, 1870-1945 : An Introduction, New York, 1981.

          6. Fieldhouse, David Kenneth, The Colonial Empires : A Comparative Survey from the Eighteenth Century, New York, 1966.

          7. Memmi, Albert, The Colonizer and the Colonized, St. Boston (Mass.), 1967.

          8. Nkrumah, Kwame, Neo colonialism : The Last Stage of Imperialism, London, 1965.

          9. Parry, John Horace, The Spanish Seaborne Empire, New York, 1966.

         10. Rathmann, Lothar and Others, Ed., Colonialism, Neo-colonialism and African Path to Peaceful Future, Berlin, 1985.

         11. Walker, E. A. Ed., The Cambridge History of the British Empire, Vol. 8, Cambridge, 1963.

         12. Warren, Bill, Imperialism : Pioneer of Capitalism, London, 1980.

         13. Winch, Donald N. Classical Political Economy and Colonies, London, 1965.

देशपांडे, सु. र.