कास्ट्रो, फिडेल : (१३ ऑगस्ट १९२६-                           ). बातीस्ताची क्यूबातील राजवट उलथून टाकणारा व लॅटिन अमेरिकेत पहिले साम्यवादी राज्य स्थापन करणारा क्रांतिकारक. आपल्या कुटुंबाचा साखरउद्योग असलेल्या बीरान गावी जन्म. त्याने १९५० मध्ये हाव्हॉना विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि तत्कालीन चळवळीत तो सामील झाला. २६ जानेवारी १९५३ रोजी सांत्यागो येथील लष्करी छावणीवर त्याने अयशस्वी हल्ला केला.

फिडेल कास्ट्रो

त्यामुळे त्यास अठरा वर्षांची शिक्षा झाली. १९५४ मध्ये त्याची शिक्षा माफ करण्यात आली. पुढे त्याने मेक्सिको येथे क्रांतिकारक संघटना उभी केली व गनिमी काव्याने लढून बातीस्ताच्या सैन्याला नामोहरम केले. ३१ डिसेंबर १९५८ रोजी मध्यरात्री बातीस्ताने क्यूबातून पलायन केले व अमेरिकेत आश्रय घेतला. सत्ता काबीज केल्यावर सहा आठवड्यांनी कास्ट्रोने पंतप्रधानपद आपणाकडे घेतले आणि प्रथम रशिया व नंतर चीन यांच्याबरोबर राजकीय व आर्थिक संबंध प्रस्थापित केले. १९६१ चे लेनिन शांतता पारितोषिक त्यास देण्यात आले. यावेळी त्याने आपण मार्क्स आणि लेनिन यांचा अनुयायी आहोत, असे उघडपणे जाहीर केले. पुढे सर्व क्रांतिकारी गटांचे रूपांतर त्याने क्यूबन कम्युनिस्ट पक्षामध्ये केले.

अमेरिकेतील कास्ट्रोविरोधी क्यूबन निर्वासितांनी १९६१ मध्ये अमेरिकेच्या मदतीने क्यूबावर आक्रमण केले. ‘बे ऑफ पिग्स’चे आक्रमण म्हणून ते प्रसिद्ध आहे. कास्ट्रोची राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी ठरून त्याची राजवट अधिक स्थिर झाली. १९६२ मध्ये रशियाने कास्ट्रोच्या संमतीने क्यूबामध्ये क्षेपणास्त्रांचे तळ उभारले. अमेरिकेने क्यूबाची नाकेबंदी केली व ‌रशियाला क्षेपणास्त्रे काढून घेण्याबद्दल निर्वाणीचा इशारा दिला. अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला होता पण रशियाने माघार घेतल्यामुळे तो टळला. क्यूबन कम्युनिस्ट पक्षाच्या हातात१९६५ पर्यंत सर्व सत्ता होती. परराष्ट्र धोरण मात्र पूर्णत: रशियाच्या तंत्राने चाले. चेकोस्लोव्हाकियातील १९६८ मधील रशियाच्या चढाईच्या धोरणास कास्ट्रोने प्रतिसाद दिला. पुढे त्याने आपली चळवळ लॅटिन अमेरिकेत इतरत्र प्रसृत केली, पण ती फारशी यशस्वी झाली नाही कारण चे गेव्हाराचे सर्व गनिमी कावे १९६७ मध्येच तिथे अयशस्वी झाले होते. कास्ट्रोने अंतर्गत बाबतींत अनेक सुधारणा केल्या. त्याने मुख्यत: शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले व अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली क्यूबास १९७२ मध्ये आर्थिक व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. कम्युनिस्टेतर देशांशीही तो आता व्यापारी दृष्ट्या मैत्री प्रस्थापित करू लागला आहे.

संदर्भ : 1. Herbert, L. M. Fidel Castro, New York, 1969.

2. Mariaune, Alexandre, Ed. On Trial, Fidel Castro, London, 1968.

देशपांडे, सु. र.