पोंबाल, सबाश्तियांत जुझॅ द कार्व्हाल्यु ई मॅलु मार्केज् द : (१३ मे १६९९ – ८ मे १७८२). पोर्तुगालचा एक प्रसिद्ध मुत्सद्दी व सुधारक. जन्म पोंबाल शहरानजीक सोरी या खेड्यात. तो कोईंब्रा विद्यापीठाची कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाला. काही दिवस त्याने घोडदळात काम केले. पुढे त्याने लिस्बन येथील इतिहास अकादमीत नोकरी केली. अर्कोआच्या एक मोठ्या सरदाराच्या पुतणीबरोबर पळून जाऊन त्याने लग्न केले. या लग्नामुळे सरकारी कारभारात त्याचे वजन वाढले. १७४० ते १७४४ या काळात त्याने लंडन येथे आणि त्यानंतर ऑस्ट्रियात राजदूत म्हणून काम केले. १७४२ साली तो पोर्तुगालचा परराष्ट्रीय सचिव झाला. यावेळी पाचवा जॉन मरण पावला आणि पहिला जोसेफ पोर्तुगालच्या गादीवर आला (१७५०). १७५५ मध्ये पोर्तुगालला भूकंपाचा मोठा तडाखा बसला त्यात देशाची विशेषतः लिस्बनची फार हानी झाली. पोंबालने लिस्बनची झपाट्याने पुनर्रचना केली. जोसेफने त्याला मुख्यमंत्री केले (१७५६). जुन्या सरदारांनी व धर्मगुरूंनी त्यास विरोध करताच पोंबालने हुकुमशाहचा पवित्रा घेऊन आपल्या शत्रूंचा निःपात केला व जेझुइट्सना देशातून हाकून लावले. पोर्तुगालच्या प्रशासनव्यवस्थेत त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या. पोर्तुगालमधील गुलामगिरी नष्ट करण्यात तसेच शैक्षणिक आणि लष्करीव्यवस्था यांत आमूलाग्र बदल करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. कृषी व उद्योग यांना त्याने उत्तेजन दिले आणि खनिज द्रव्ये, तंबाखू व साखर या वस्तूंच्या व्यापाराची पोर्तुगालची मक्तेदारी प्रस्थापित केली. या त्याच्या धोरणामुळे जुनी सरदार मंडळी नाराज झाली. त्यातील एका गटाने जोसेफचा खून करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने या सरदारांना जबर शिक्षा केल्या त्यांपैकी काहींना फाशी दिले. तथापि त्याला इंग्लंडचे पोर्तुगालवरील व्यापारी वर्चस्व कमी करता आले नाही. शिवाय त्याच्या विविध योजनांमुळे पोर्तुगालचा खजिना रिकामा झाला. जोसेफ १७७७ मध्ये मरण पावला आणि त्याची मुलगी मारिया फ्रँसीश्क गादीवर आली. तेव्हा सरदारांचे फावले व अनेक आरोपांखाली पोंबालला दोषी ठरविण्यात आले. त्यास मुख्यमंत्रिपदावरून काढण्यात जुन्या सरदारांना यश मिळाले. तो लिस्बन येथे मरण पावला.

संदर्भ : 1. Cheke, Marcus, Dictator of Portugal : A Life of the Marquis of Pombal, 1699-1782, London, 1969.

2. Livermore, H.V. A New History of Portugal, New York, 1966.

ओक, द. ह.