झुल्फिकार अली भुट्टो

भुट्टो, झुल्फिकार अली : (५ जानेवारी १९२८ – ४ एप्रिल १९७९). पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७१ -७३), पंतप्रधान (१९७३ – ७७) व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक. जन्म लार्कान (सिंध प्रांत) येथे. वडील सर शाहनवाझखान हे मोठे जमीनदार व राजकीय कार्यकर्ते असून ब्रिटिश काळात त्यांनी कायदेमंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते. सर शाहनवाझखानांची चौथी हिंदू पत्‍नी लाखी ही भुट्टोंची आई होय. मुंबईत या कुटुंबाची मोठी मालमत्ता होती. शिक्षण मुंबई येथील कॅथीड्रल स्कूल व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‍स. राज्यशास्त्राच्या पदवींसाठी अमेरिकेत (कॅलिफोर्निया विद्यापीठ) असतानाच हिंदुस्थानची फाळणी झाली. नंतर ते इंग्‍लंडला येऊन ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे एम्.ए. व नंतर बॅरिस्टर झाले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांनी इंग्‍लंडमध्ये व पुढे १९५८ पर्यंत कराचीला कायद्याचे अध्यापक म्हणून नोकरी केली. कराचीला वकिलीचा व्यवसायही केला.

जनरल अयुबखान हे १९५८ साली राष्ट्राध्यक्ष झाले व त्यांनी भुट्टोंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. या तरुण मंत्र्याने पुढील सात वर्षात संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानी शिष्टमंडळाचा प्रमुख म्हणूनही लौकिक मिळविला. काश्मीर प्रश्नावर दर वेळी भारताविरुद्ध भडक प्रचार करून लोकप्रियता संपादन केली. चीनशी मैत्री करण्यात भुट्टोंनी पुढाकार घेतला. १९६३ साली ते परराष्ट्रमंत्री झाले. पुढील वर्षी त्यांनी भारतीय विरोधाला न जुमानता पाकव्याप्त काश्मीर व चीन यांमधील सीमा निश्चित करण्यासंबंधीचा करार चीनबरोबर केला.

काश्मीरमध्ये १९६४ साली हजरत बाल प्रकरणावरून मोठी खळबळ झाली. पैगंबरांचा केस चोरीला गेला होता, तो परतही मिळाला तथापि तेथील जनता कोणत्याही क्षणी भारताविरुद्ध उठाव करण्याच्या मनःस्थितीत आहे, अशी भुट्टो व पाकिस्तानचे अध्यक्ष अयुबखान यांची दृढ समजूत झाली. काश्मीरमध्ये उठाव व्हावा, म्हणून कच्छवर आक्रमण करण्यात आले. काही आठवड्यानंतर शस्त्रसंधी करावा लागला. काश्मीरमध्ये काही घडेना, तेव्हा साध्या वेशातील सैनिक घुसविण्यात आले व घनघोर युद्ध झाले. पुढे शस्त्रसंधी होऊन रशियाच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान यांत ⇨ताश्कंद करार करण्यात आला (१० जानेवारी १९६६). हा करार भुट्टोंना मान्य नसल्याने त्यांनी राष्ट्राध्यक्ष अयुबखानांवर जाहीर टीका केली. परिणामतः जून १९६६ मध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

सप्टेंबर १९६७ मध्ये भुट्टोंनी पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष स्थापन केला. पुढील वर्षी या पक्षाने अयुबराजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनात भुट्टोंना सहा महिने कारावास घडला. पश्चिम पाकिस्तानात त्यांचा प्रभाव वाढत होता. नोव्हेंबर १९६९ आणि मार्च १९७० असा दोनदा त्यांच्या खुनाचा प्रयत्‍न झाला. अयुबखानांच्या उच्चाटनानंतर (मार्च १९६९) राष्ट्राध्यक्ष याह्याखानांनी निवडणुका घेतल्या. त्यांत भुट्टोंच्या पक्षाला सिंध व पंजाबमध्ये भरघोस बहुमत मिळाले परंतु राष्ट्रीय संसदेत आणि पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीब यांच्या पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले होते तथापि पश्चिम पाकिस्तानी नेते मुजीबांच्या हाती सत्ता देण्यास तयार नव्हते. त्यांमध्ये भुट्टो अर्थातच प्रखर मुजीबविरोधी म्हणून पुढे आले. याची परिणती बांगला देशाच्या मुक्तियुद्धात झाली.

या युद्धात पराभव डोळ्यासमोर दिसत असतानाच याह्याखानांनी भुट्टोंना ८ डिसेंबर १९७१ रोजी उपपंतप्रधान नेमले व पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे धाडून दिले. पाकिस्तानच्या पराभवानंतर याह्याखानांनी राजीनामा दिला व भुट्टोंचा २० डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि लष्करी कायदा प्रशासक म्हणून शपथविधी झाला. पुढे २८ जून ते २ जुलै १९७२ या काळात सिमला येथे इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यात वाटाघाटी होऊन ⇨सिमला करार करण्यात आला. यानंतर भुट्टोंच्या भूमिकेत मूलभूत बदल झाला. त्यांनी शेख मुजीबना झालेली देहान्ताची शिक्षा रद्द केली आणि त्यांना मुक्त करण्यात आले. देशांत भुट्टोंनी वर्षभराच्या अवधीनंतर लष्करी कायदा रद्द केला. तत्पूर्वी पुन्हा लोकशाही शासन आणण्यासाठी संविधान तयार करण्यात आले. हे संविधान १९७० च्या निवडणुकांत निवडून आलेल्या सदस्यांनी मंजूर केले होते.

भुट्टोंनी राष्ट्रध्यक्ष झाल्यावर १५ दिवसांतच काही उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि जमिनसुधारणा करून भूमिहीनांना जमिनी वाटण्याचा उपक्रम सुरू केला. युद्धात दारुण पराभव झाल्यामुळे तसेच अर्थव्यवस्थेला जबर हानी पोहोचल्यामुळे जनतेचे मनोधैर्य खचले होते. अशा वेळी भुट्टोंनी पाकिस्तानी जनतेला दिलासा देऊन तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. पाकिस्तानी सेनादल निष्प्रभ झाले होते. जनमानसात त्याला विशेष स्थान उरले नव्हते. पुरोगामी आर्थिक आणि सामाजिक धोरणे राखल्यामुळे भुट्टोंची लोकप्रियता वाढत होती. दुखावलेले प्रस्थापित हितसंबंधी आणि आतंकी धर्मगुरू यांच्याखेरीज त्यांना कोणाचाच विरोध नव्हता तरी त्यांनी सरहद्द प्रांत व बलुचिस्तानातील विरोधी पक्षीयांची पुरोगामी सरकारे बरखास्त करून तेथे सरकारी यंत्रणा व दडपशाहीचा वापर करून आपल्या पक्षाची सरकारे स्थापन केली. लोकशाहीची भाषा व हुकूमशाही तंत्राचा प्रत्यक्षात अवलंब यांमुळे त्यांच्या लोकप्रियतेला धक्का बसल्यासारखे झाले. पुरोगामी पक्ष आणि धर्माधिष्ठित पक्ष एकत्र येऊन विरोधी आघाडी उभी राहिली. १९७७ चे सुरुवातीस होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल्स पार्टीला स्पष्ट बहुमत मिळण्याची खात्री असूनही धोका वाढत असलेल्या काही जागा जिंकण्यासाठी भुट्टोंच्या पाठीराख्यांनी सत्तेचा व सरकारी यंत्रणेचा प्रच्छन्न गैरवापर केला. त्याविरुद्ध हाकाटी झाली. विरोधी पक्षीयांनी आंदोलन उभारले. याच सुमारास भारतामध्ये मतपेट्यांतून शांततापूर्ण सत्तांत्तर होऊन जनता पक्ष सत्तेवर आला. याचा पाकिस्तानी जनतेवर मोठाच परिणाम झाला. भुट्टोंविरोधी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. तडजोडीसाठी भुट्टोंनी प्रयत्‍न केले. अनेक निवडणुका रद्द करून तेथे फेरनिवडणुका घेण्याचे जाहीर केले परंतु सरकार व विरोधी पक्ष यांच्यात समेट झाला नाही.


जनरल झिया-उल्-हक यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै १९७७ रोजी लष्कराने सत्ता हातात घेतली. दोन महिन्यांनी कसूरी खून खटल्यासाठी भुट्टोंना पकडण्यात आले. १९७४ साली भुट्टोंचे राजकीय विरोधक अहमद रझा कसूरी व त्यांचे काही कुटुंबीय यांच्यावर अचानक हल्ला झाल होता. त्यात कसूरी व त्यांचे अनुयायी निसटू शकले परंतु अहमद रझांचे वडील नवाब महंमद खान यांचा खून झाला. या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा भुट्टोंवर आरोप होता. भुट्टो व इतर आरोपींवरचा खटला लाहोर हायकोर्टात ऑक्टोबर १९७४ मध्ये सुरू झाला. १८ मार्च १९७८ मध्ये उच्च न्यायालयाने सर्वांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा फर्माविली. जवळजवळ वर्षांने सुप्रीम कोर्टाने चार विरुद्ध तीन या अल्प बहुमताने ही शिक्षा कायम केली. आपली बाजू जगाला कळावी, यासाठी त्यांनी तुरुंगात इफ आय् एम् असॅसिनेटेड (१९७९) या शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले. ते गुप्तपणे बाहेर धाडण्यात येऊन भारतातच प्रसिद्ध झाले. ४ एप्रिल १९७९ रोजी पहाटे २ वाजता भुट्टोंना फाशी देण्यात आली.

मीर मूर्तझा व शाहनवाझ हे भुट्टो यांचे पुत्र. शिक्षणासाठी ते लंडनमध्ये होते. भुट्टोंची पहिली पत्‍नी अमीरबेगम राजकारणात नाही परंतु दुसरी पत्‍नी नुसरतजहाँ व मुलगी बेनझीर निर्धारपूर्वक पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व करीत आहेत.

भुट्टोंनी १९५८-७८ या वीस वर्षांच्या राजकीय जीवनात पाकिस्तानचे राजकीय पुनरुत्थान हेच ध्येय ठेवले होते. यासाठी भारतविरोधी कट्टर भूमिका, चीन व अमेरिका यांच्याशी निकटचे संबंध आणि इस्लामी देशांशी घनिष्ठ मैत्री या गोष्टींवर त्यांनी भर दिला. अंतर्गत राजकारणातही प्रांतवादी किंवा फुटीर शक्तींना पायबंद घालण्यासाठी अर्थव्यवस्थेची नवीन घडी बसविली. अकरा मोठ्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, लोकपाल व प्रशासकीय न्यायालयाची स्थापना, १० वी पर्यंतचे मोफत शिक्षण, स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क, दहेज (हुंडा) बंदी, कमाल व किमान जमीनधारणा कायदा इ. महत्त्वाच्या सुधारणा अंमलात आणल्या. त्याचप्रमाणे प्रसंगोपात्त लष्करी व हुकूमशाही मार्गांचा अवलंब केला. भुट्टोंची लोकशाही निष्ठा ही काहीशी पोकळ होती कारण लोकशाहीचा आदर्श जनतेपुढे ठेवून त्याप्रमाणे जनतेचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले नाही. उत्कृष्ट आणि प्रभावी वक्ता व लेखक अशी त्यांची रास्त ख्याती होती. द मिथ ऑफ इंडिपेंडन्स (१९६८), द ग्रेट ट्रॅजिडी (१९७१) इ. त्यांची काही प्रमुख पुस्तके होते. यांशिवाय त्यांनी स्फुटलेखन व काही कविताही लिहिल्या आहेत.

पहा : भारत-पाकिस्तान संघर्ष.

संदर्भ : 1. Bhutto, Benzir, Pakistan : the Gathering Storm, New Delhi, 1983.

            2. Mody, Piloo, Zulfi My Friend, New Delhi, 1973.

            3. Mukerjee, Dilip, Zulfiqar Ali Bhutto : Quest For Power, Delhi, 1972.

            4. Taseer, S. Bhutto : a Political Biography, New Delhi, 1980.

नगरकर, व. वि.