सकल-आशियावाद : आशियाच्या भौगोलिक, भाषिक, राष्ट्रीय, वांशिक तसेच धार्मिक सहकार्याच्या व ऐक्याच्या कार्याला वाहि-लेली एक चळवळ. सकल (पॅन) ही संकल्पना अतिव्याप्त असून तिचा उपयोग लोकोत्तर घटकांतील वैविध्यपूर्ण विषमता निर्दिष्ट करण्यासाठी केला जातो. भौगोलिक दृष्टया आशियाचे पूर्व आशिया (चीन, मंगोलिया, कोरियन व्दीपकल्प, जपान आणि रशियाचा अतिपूर्वेकडील भाग), आग्नेय आशिया (व्हिएटनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपीन्स) आणि दक्षिण आशिया (भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगला देश व श्रीलंका) असे विभाजन झालेले असून, मध्यपूर्वेतील इराण व सौदी अरेबिया तसेच मध्य आशियातील भूतपूर्व सोव्हिएट रशियातील कझाकस्तान व उझबेकिस्तान हे भागही त्यात अंतर्भूत होतात. यांतील काही देश आधुनिक, तर काही परंपरानिष्ठ व रूढीप्रिय आहेत. काही देश सधन, तर काही दारिद्रयात खितपत पडलेले आहेत. यांतील काही देशांत साम्यवादी प्रशासन आहे, तर काहींत एकाधिकारशाही आहे काही पूर्णत: लोकशाही देश आहेत. साहजिकच आशियास यूरोप वा अमेरिकेसारखे स्वत:चे सांस्कृतिक अथवा राजकीय स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभलेले नाही. साम्यवादी व भांडवलशाही विचार-प्रणालीतील संघर्षाने या आडव्या आणि उभ्या विभाजनात आणखीन गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे आशियाई ऐक्याचा प्रश्न अवघड झाला आहे. शिवाय वसाहतवादाचा कटू अनुभव व त्यातून निर्माण झालेला पाश्चात्त्य विरोधी राष्ट्रवाद अदयापि प्रखर असून तो त्यांच्या राजकारणातील प्रमुख घटक बनला आहे. तोच त्यांच्या ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे. ⇨ बांडुंग परिषद ही आशियाई देशांची परिषद (१९४९व १९५५) सोडल्यास त्यानंतर पुन्हा या देशांची सकल आशियावादासाठी आपापसांतील दुहीमुळे परिषद भरली नाही. त्यामुळे कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय राजकीय संस्था, हे आतापर्यंत स्वप्नच ठरले आहे तथापि आर्थिक, प्रादेशिक, राजकीय व कीडा स्तरांवर आशियाई देशांना एकत्र येण्यात थोडे यश प्राप्त झाले आहे. उदा., आशियाई विकास बँकेची स्थापना (१९६६) आणि मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर व थायलंड या आग्नेय आशियाई देशांनी आर्थिक प्रगती व परस्परसहकार्य यांसाठी स्थापन केलेली असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स ही संस्था (१९६७) होय. याशिवाय पाकिस्तान, तुर्कस्तान व इराण या पश्र्चिम आशियाई देशांनी रीजनल को-ऑपरेशन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही आर्थिक संघटना परस्परांच्या सहकार्यासाठी स्थापन केली परंतु वरील संस्थांचे यश मर्यादित राहिले आहे.

आशिया खंडातील बहुतेक सर्व देश कृषिप्रधान असून कच्च्या मालाची निर्यात करतात. त्यांच्याकडे भांडवलाची व आधुनिक तंत्रज्ञानाची उणीव जाणवते. त्यामुळे उदयोगधंदयांच्या बाबतीत सहकार्यावर मर्यादा पडतात. साहजिकच यूरोपियन कॉमन मार्केट कम्यूनिटीसारखी एकात्मता त्यांच्यात येणे कठिण आहे. तरीसुद्धा काही प्रयत्न झाले. अरब राष्ट्रांच्या हितसंबंधांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अरब लीगची स्थापना झाली (१९४५) पण आपापसांतील दुहीमुळे ही संघटना निष्क्रिय बनली. पुढे साम्यवादी चीनच्या विस्तारवादास पायबंद घालण्यासाठी आग्नेय आशियाई संघटना (सीटो) स्थापन झाली (१९५४) पण पाकिस्तान, थायलंड व फिलिपीन्स या तीनच देशांनी तीत सहभाग घेतला. ग्रेट ब्रिटनने स्थापन केलेल्या मध्य आशियाई संरक्षण संघटनेत (सेंटो) फक्त इराण, पाकिस्तान व तुर्कस्तान हे देश सहभागी झाले. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस बेझनेव्ह यांनी आशियाई देशांच्या सामूहिक संरक्षणाची एक योजना मांडली पण तिला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगला देश व मालदीव प्रजासत्ताक या देशांनी प्रादेशिक सहकार्यासाठी साउथ एशिअन असोसिएशन फॉर रीजनल को-ऑपरेशन (सार्क) ही संस्था १९८५ मध्ये स्थापन केली. तिची नियमित अधिवेशने भरतात आणि परस्परांच्या सहकार्याने दक्षिण आशियात शांतता नांदावी, म्हणून हे देश प्रयत्नशील आहेत. एवढेच नव्हे, तर दहशतवादाविरूद्धही त्यांनी मोहीम अलीकडे (२००८) आखली आहे. या काही आशियाई ऐक्याच्या प्रयत्नांबरोबरच आशियातील खेळाडूंसाठी ऑलिंपिक कीडासामन्यांच्या धर्तीवर एशियन गेम्स फेडरेशन या संस्थेव्दारे दर चार वर्षांनी आशियाई कीडासामने १९५१ पासून सातत्याने भरत आहेत. त्या सामन्यांतून आशियाई देशांतील बंधुभाव व सहकार्य वृद्धीगत होण्यास मदत होत आहे.

संदर्भ : 1. Baxter, Craig, Government and Politics in South Asia, Boulder, 1993.

2. Chan, Steve, East Asian Dynamism : Growth, Order and Security in the Pacific Region, Boulder, 1993.

3. Magstadf, Thomas M. Nations and Governments : Compara- tive Politics in Regional Perspective, New York, 1994.

4. Norton, James K. Ed. Global Studies : India and South Asia, Guilford, 1995.

देशपांडे, सु. र.