अय्यर, जी. सुब्रमण्यम्: (१९ जानेवारी १८५५–१८ एप्रिल १९१६). भारतीय काँग्रेसच्या स्थापनेपासून भारतीय राजकारणातील एक पुढारी. जन्म मद्रास इलाख्यात एका गावी. १८७८ मध्ये बी. ए. झाल्यावर काही काळ मद्रासमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्याच साली सुरू झालेल्या हिंदू या इंग्रजी पत्राचे ते एक संस्थापक व प्रमुख संपादकही होते. ह्या पत्रानेच मद्रासकडील राजकीय चळवळीस चालना दिली. त्याच सुमारास मद्रास येथे स्थापन झालेल्या ‘महाजनसभे’चेही ते एक संस्थापक होते. भारतीय काँग्रेसच्या मद्रास येथील अधिवेशनानंतर पुढे सु. दहा-बारा वर्षे त्यांनी काँग्रेसच्या कार्यात हिरिरीने भाग घेतला. ऑगस्ट १८९९ साली त्यांनी लोकजागृतीसाठी स्वदेशमित्रम् हे तमिळ वृत्तपत्र सुरू केले. त्याचे ते प्रमुख संपादक होते. भारतीय अर्थविषयक प्रश्नांचा सखोल अभ्यासक अशी त्यांची कीर्ती होती. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या सडेतोड व निर्भीड लेखनामुळे ब्रिटिश सरकारचा रोष होऊन त्यांना कारावासही सोसावा लागला.

 

देवगिरीकर, त्र्यं. र.