गेट्स्केल, ह्यू टॉड नेलर : (९ एप्रिल १९०६ — १८ जानेवारी १९६३). ग्रेट ब्रिटनमधील मजूरपक्षाचा पुढारी व एक मुत्सद्दी. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व ऑक्सफर्ड विद्यापीठांत शिक्षण. तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयांत प्रथम श्रेणीत एम्.ए. १९३९ च्या सुमारास लंडन विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली परंतु ह्यू डाल्टन ह्या मित्राच्या सल्ल्याने त्याने ही नोकरी सोडली व तो नागरी सेवा खात्यात रूजू झाला. तिथे विशेष वाव मिळाला नाही, म्हणून त्याने राजकारणात प्रवेश केला. १९४५ मध्ये तो प्रथम संसदेवर निवडून आला. थोड्याच दिवसांत त्याचा ॲटली सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला पण १९५१ च्या मजूरपक्षीय मंत्रिमंडळाच्या पराभवानंतर एक विरोधी सभासद म्हणून तो संसदेत नावलौकिकास आला. १९५५ मध्ये ॲटली निवृत्त झाल्यानंतर तो संसदेत मजूरपक्षाचा पुढारी झाला. मजूरपक्षातील अंतर्गत दुही मिटविण्याची महत्त्वाची कामगिरी त्याने केली. वयाच्या अवघ्या छपन्नाव्या वर्षी लंडन येथे तो मरण पावला. त्याने मनी अँड एव्हरी डे लाइफ (१९३९) आणि चॅलेंज ऑफ द को-एक्झिस्टन्स  ही पुस्तके लिहिली. 

देशपांडे, सु. र.