सकलयूरोपवाद : यूरोपच्या सांस्कृतिक – राजकीय ऐक्यासाठी उद्‌भवलेले एक आंदोलन. प्राचीन काळी रोमन सम्राट व मध्ययुगात पोप आणि पवित्र रोमन साम्राज्य यांनी यूरोपात ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगापर्यंत यूरोपमध्ये रोमन कॅथलिक चर्च दृढपणे संघटित झाले होते पण सकल – यूरोपवादाला खरी चालना प्रबोधनकाल आणि धर्मसुधारणा आंदोलनाने मिळाली. यूरोपच्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रयत्न झाले तद्वतच मध्ययुगीन यूरोपमध्ये मुस्लिम सत्तेच्या अंकित गेलेली क्रिस्ती ‘ पवित्र भूमी ’ परत मिळविण्यासाठी धर्मयुद्धे झाली. यामुळे यूरोपातील सर्व क्रिस्ती धर्मीय एकत्र आले. पुढे धर्मसुधारणा आंदोलनाने (सोळावे-सतरावे शतक) यूरोपचा कायापालट झाला आणि राजकीय ऐक्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य प्रथमच धार्मिक जीवनात व नंतर हळूहळू जीवनाच्या सर्व अंगांत दृढमूल झाले. तसेच यूरोपमधील ख्रिश्चन समाजाच्या ऐक्यासाठी तर्कशुद्घ तत्त्वप्रणालींचा पुरस्कार करून अनेक लेखकांनी यूरोपच्या संरक्षणाबरोबरच जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले. प्रथम इरॅस्मसने क्वेरेला पॅरिस (१५१७) या गंथात हा विचार मांडला. नंतर फ्रान्सच्या एका मंत्र्याने त्याची रूपरेषा ठरविली. पुढे एमेरिक कूस या लेखकाने ली नोव्हेयू सिनी (१६२४) या गंथाव्दारे शांततेच्या संघटनेचा पुरस्कार करून लवाद न्यायालयाची संकल्पना मांडली. विल्यम पेनने यूरोपमधील भविष्यातील शांततेविषयी एक निबंध लिहून (१६९३) ‘ सोसायटी ऑफ फ्रेन्डस ’ अशी संस्था असावी, हे मत मांडले. अबे द सेंत-प्यिअर याने निरंतर शांततेसाठी एक प्रकल्पाची सूचना केली. पुढे रूसोने तो विचार संक्षिप्तपणे १७६१ मध्ये पसृत केला. इमॅन्युएल कांटने सकल – यूरोपवादी बुद्धीवाद ऑन पर्पेच्युअल पीस (१७९५) या गंथात विशद केला, तर जेरेमी बेंथॅमने प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनॅशनल लॉ (१७८९) या गंथाव्दारे तो मांडला.

एकोणिसाव्या शतकात व्हिक्टर ह्यूगोच्या अध्यक्षतेखाली पॅरिस येथे शांतता परिषद भरली (१८४९). तीत शांततेबरोबरच यूरोपच्या संयुक्त राज्याचाही पुरस्कार करण्यात आला. पहिल्या महायुद्धानंतर (१९१९) फेंच मुत्सद्दी ॲरिस्टाईड बियांड याने सकल – यूरोपीय राष्ट्रांच्या संघटनेची आवश्यकता प्रतिपादिली. त्यानंतर कौंट रिचर्ड कॉडेनहोव्ह – कार्लेजी या ऑस्ट्रियन लेखकाने सकल – यूरोपवादाच्या पुष्ट्यर्थ पॅन यूरोपा (१९२३) या गंथाव्दारे यूरोपीय संघाचा जोरदार पुरस्कार केला. एवढेच नव्हे, तर सकल – यूरोपीय संघ स्थापन केला परंतु त्याच्या हालचाली तत्कालीन राष्ट्रवादाच्या उठावामुळे निष्फल ठरल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोपातील अनेक लहान देशांत लोकशाही पद्घत आली. त्यामुळे पारस्परिक सहकार्यासाठी हेग येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरली (१९४८). यावेळी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी प्रथमच सकल – यूरोपवादास पाठिंबा दर्शविला. यूरोपच्या आर्थिक व्यवहारासाठी ‘ ऑर्गनायझेशन फॉर यूरोपियन इकॉनॉमिक को-ऑपरेशन ’ (ओइइसी) ही संस्था अस्तित्वात आली. तसेच ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, नेदर्लंड्स आणि लक्सेंबर्ग या देशांनी बूसेल्स तहाव्दारे एकमेकांना लष्करी सहकार्य करण्याचा करार केला आणि पुढे त्यात आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील सहकार्याचा अंतर्भाव केला. साम्यवादी रशिया व त्याची अंकित राष्टये यांविरूद्ध यूरोपच्या एकतेसाठी ⇨ नाटो संघटनेची स्थापना केली (१९४९). तीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा हे यूरोपेतर देशही सामील झाले. यामुळे सामुदायिक सुरक्षिततेचे तत्त्व दृढतर झाले आणि सुरक्षिततेबरोबरच राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य यांवर भर देण्यात आला. विसाव्या शतकाअखेर ही संघटना अबाधित राहिली आहे.

सकल – यूरोपच्या ऐक्यासाठी आर्थिक स्थैर्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील संशोधनासाठी ‘ यूरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी ’ (इसीएससी) ही संस्था स्थापण्यात आली (१९५१). यात सुरूवातीस सहा देश होते. त्यांनी यूरोपच्या संरक्षणासाठी नाटोच्या सहकार्याने पॅरिस येथे ‘ यूरोपियन डिफेन्स कम्युनिटी ’ ही संस्था स्थापिली (१९५२). झां मॉनेट या इसीएससीच्या अध्यक्षाने यूरोपच्या संयुक्त संघासाठी एक कृती समिती स्थापन केली. याच समितीने सामूहिक यूरोपीय बाजारपेठ आणि ‘ यूरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी ’ (इइसी) या दोन संस्था स्थापून आर्थिक व्यवहारास चालना दिली. त्यातून यूरोपियन फी ट्रेड असोसिएशन जन्माला आली. विन्स्टन चर्चिल यांसारख्या मातब्बर नेत्यांनी पुढाकार घेतल्यामुळे रशियेतर अनेक यूरोपीय देशांनी सकल – यूरोपवादाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपच्या ऐक्यासाठी व परस्परांच्या सहकार्यावर आधारित, विशेषत: शास्त्रीय संशोधनासाठी सेंटर फॉर मेडियम – रेंज वेदर फोरकास्ट्स (१९७३- इंग्लंड), जिओफिजिकल सोसायटी (१९७१- जर्मनी), यूरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हायरन्मेन्टल सायबेर्नेटिक्स (१९७०- ग्रीस), यूरोपियन मोलेक्यूलर बायॉलॉजी लॅबरेटरी (१९७४- जर्मनी), यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (१९५४- स्वित्झर्लंड), यूरोपियन फिजिकल सोसायटी (१९६८- स्वित्झर्लंड), यूरोपियन सायन्स फाउन्डेशन (१९७४- फ्रान्स), यूरोपियन स्पेस एजन्सी (१९७५- फ्रान्स) वगैरे संस्था कार्यरत असून यूरो हे सर्वमान्य चलन काही देशांचा अपवाद वगळता प्रचारात आहे. राजकीय दृष्टया सकल – यूरोपवाद या आंदोलनास फारसे यश प्राप्त झालेले नसले तरी अन्य क्षेत्रांत, विशेषत: आर्थिक व शास्त्रीय संशोधन यांत या आंदोलनाने नेत्रदीपक प्रगती केली आहे.

शिंदे, आ. ब.