उमरावशाही: व्युत्पत्तिशास्त्रानुसार उमरावशाही म्हणजे श्रेष्ठांचे, सर्वोत्तम मानवांचे राज्य. प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात या शब्दाचा प्रथम उपयोग केला आहे. वरवर पाहता ही पद्धती सर्वश्रेष्ठ वाटते, पण श्रेष्ठ कोण व तो कसा ठरवावयाचा याचा विचार करता, तिच्यातील दोष स्पष्ट होतात. जे स्वतःला श्रेष्ठ मानतात व ज्यांना इतर श्रेष्ठ मानतात, अशांचे राज्य म्हणजे उमरावशाही. ती उच्च जन्म, कुल वा वंश, सांस्कृतिक श्रेष्ठत्व, संपत्ती, धार्मिक पुढारीपण, लष्करी सामर्थ्य अथवा नेतृत्व इत्यादींवर आधारित असते. प्रत्येक समाजात तिचा आविष्कार भिन्न असतो. राज्याच्या ध्येयानुसार, ध्येयसिद्धीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनां नुसार व समाजाच्या स्वरूपानुसार उमरावशाहीच्या स्वरूपात फरक पडतो. जिच्यामध्ये पात्रता जन्मावर आधरित असते व चारित्र्य, कुवत व गुणवत्ता यांना दुय्यम मानले जाते अशी ऐतिहासिक उमरावशाही जेथे व्यक्ती गुणवत्तेवर निवडली जाते, अशा अभिजनसत्तेपेक्षा निराळी असते. ती राजेशाही व लोकशाही यांच्या विरोधी असते.

उमरावशाहीत उमराव हे एकाच वर्गाचे असतात, एकाच दर्जाचे असतात व इतर वर्गांहून निराळे असतात. समाजाचा विचार करता उमराव अल्पसंख्य असले, तरी एकजिनसी असल्यामुळे संघटित सामर्थ्याने त्यांना आपल्या सत्तेचे संरक्षण करून ती टिकविणे शक्य होते. सत्तेचा वापर हा त्यांचा कायम विशेषाधिकार राहतो व तशा प्रकारचा अधिकार त्यांच्यावर सत्ता गाजविली जाते, त्यांना कोणत्याही स्वरूपात असत नाही.

पूर्वकालीन राजेशाहीत सत्ता एखाद्या लहानशा गटाच्या हाती असे व सामान्यतः ती वंशपरंपरागत असे. असा गट जनतेला जबाबदार नसे व त्या गटाने केलेला राज्यकारभार जनतेच्या हितासाठी फारसा न होता तो गटाच्या हितसंबंधासाठी असे. प्राचीन ग्रीसमध्ये उमरावशाही बलिष्ठ होती. पुष्कळ वेळा स्वतंत्रपणे सत्ता गाजविण्यापेक्षा, नामधारी राजेशाही अस्तित्वात ठेवून उमराव वर्ग सत्ता गाजवीत असे. उमराव राजदरबारात मानकरी म्हणून रहात, आपली उन्नती करून घेत, मानमरातब मिळवीत, शासकीय व लष्करी पदाधिकारी म्हणून महत्त्वाच्या जागा अडवून सत्ता गाजवीत असत. सरंजामशाहीच्या काळात उमरावर्गाने अशाच पद्धतीने सत्ता गाजविली. त्या काळात जमिनीची मालकी उमरावशाहीचे प्रमुख अधिष्ठान होते.

आधुनिक काळात लोकशाही, उद्योगधंदे व आर्थिक व्यवस्था यांमुळे उमरावशाहीचा ऱ्हास झाला. जमिनीच्या मालकीमुळे प्राप्त होणारे वर्चस्व कमी झाले संपत्तीच्या बाबतीत उमराववर्गाच्या तोडीस तोड असणाऱ्या व्यापारी वर्गामुळे मध्यम वर्गाची सत्ता प्रस्थापित झाली. उमराववर्ग नव्या सत्ताधारी वर्गापासून दूर राहिला व आपले विशेषाधिकार कायम ठेवण्याच्या प्रयत्नांत त्या वर्गाला यश मिळाले नाही. व्यक्तीव्यक्तींमध्ये व वर्गावर्गांमध्ये राजकीय व्यवहारांत भाग घेण्याच्या क्षमतेत फरक असतो. वांशिक श्रेष्ठतेमुळे प्रशासकीय क्षमता निर्माण होते, उच्चवर्ग नेतृत्त्व करतो, म्हणून नेतृत्व हाच त्या वर्गाच्या कायम श्रेष्ठत्वाचा पुरावा असतो इ. कल्पना मागे पडल्या व उमरावशाही संपुष्टात आली. उमरावशाहीचे एक चांगले उदाहरण म्हणजे मध्ययुगीन इंग्लंड. धैर्य, दूरदर्शित्व, सार्वजनिक कर्तव्यबुद्धी व नेतृत्व करण्याची क्षमता फक्त आपल्याच वर्गात असते, हा उमराव वर्गाचा विश्वास नव्याने प्रस्थापित झालेल्या लोकशाहीच्या मूल्यांशी सुसंगत नव्हता व त्या विश्वासाला शास्त्रीय आधारही नव्हता, म्हणून उमराववर्गाला आपले स्थान टिकविता येणे शक्य नव्हते.

उमरावशाही नष्ट झाली असली, तरी एके काळी तिने मानवी इतिहासात महत्त्वाचे कार्य बजाविले. भौतिक शास्त्रांची वाढ व लोकशाहीची वाढ यांमुळे ही पद्धती मागे पडली कारण नवी निर्माण झालेली परिस्थिती या पद्धतीला साजेशी राहिली नाही. राज्यशास्त्रातील एक संकल्पना म्हणून उमरावशाहीला महत्त्व आहे.

सोहोनी, श्री. प.