कनैयालाल माणेकलाल मुनशी

मुनशी, कनैयालाल माणेकलाल : (३० डिसेंबर १८८७–८ फेब्रुवारी १९७१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय पुढारी, कायदेपंडित, शिक्षणतज्ञ व साहित्यकार. जन्म भडोच (गुजरात) येथे. त्यांचे वडील माणेकलाल शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर होते. आईचे नाव तापीबेन. प्राथमिक शिक्षण घरीच आणि माध्यमिक शिक्षण खान बहादूर दलाल हायस्कूल, भडोच येथे. मॅट्रिकनंतर (१९०१) त्यांनी बडोदा कॉलेजातून बी. ए. (१९०६) आणि नंतर एल्एल्.बी. (१९१०) या मुंबई विद्यापीठाच्या पदव्या मिळविल्या. विद्यार्थिदशेत त्यांनी प्राचीन संस्कृत साहित्य तसेच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इ. भाषासाहित्याचा अभ्यास केला. बडोदा कॉलेजात अरविंद घोष त्यांचे प्राध्यापक होते. त्यांच्या प्रभावामुळे ते काही काळ क्रांतिकारी गटाकडे आकृष्ट झाले.

वकिलीच्या व्यवसायानिमित्त ते १९१३ मध्ये मुंबईला आले आणि तिथेच स्थायिक झाले. पुढे होमरूल लीगचे ते सचिव झाले (१९१५). १९१७ पासून ते काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते. मुंबई विधान परिषदेवर विद्यापीठ मतदार संघातून ते निवडून आले (१९२७). बारडोलीच्या सत्याग्रहात सामील झाल्यानंतर ते पूर्णतः गांधीवादी झाले. काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि पुढे काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले (१९३०–३६). मिठाचा सत्याग्रह आणि इतर अनेक राजकीय संग्रामांत त्यांनी भाग घेतला. त्यामुळे अनेक वेळा त्यांना कारावास भोगावा लागला तथापि छोडो भारत आदोलनाच्या वेळी त्यांनी तुरुंगाबाहेर राहून ‘अखंड हिंदुस्थान’ या कल्पनेचा भारतभर दौरा करून पुरस्कार केला. पुढे काँग्रेसशी मतभेद आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तत्पूर्वी १९३७–३९ मधील काँग्रेसच्या मंत्रिमंडळात ते मुंबई प्रांताचे गृहमंत्री होते. १९४५ मध्ये छोडो भारत आंदोलनातील कार्यकर्त्यांचे खटले त्यांनी विनामूल्य चालविले. म. गांधींच्या सल्ल्यानुसार ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले (१९४६). त्याच वर्षी त्यांची संविधान समितीवर निवड झाली आणि घटनेचा मसुदा तयार करणाऱ्या तज्ञांच्या समितीवर त्यांची नेमणूक झाली. स्वातंत्र्योत्तर काळात हैदराबाद संस्थानशी विलिनीकरणाची बोलणी करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांची एजंट-जनरल म्हणून नियुक्ती केली (१९४८). स्वातंत्रोत्तर काळात ते लोकसभेवर निवडून आले (१९५२) व अन्नखात्याचे मंत्रिपद त्यांनी संभाळले. १९५३ ते १९५८ दरम्यान ते उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल होते. पुढे काँग्रेसच्या धोरणाशी त्यांचे पुन्हा मतभेद आले आणि त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र पक्षात प्रवेश केला (१९६०). त्यानंतर ते या पक्षाचे उपाध्यक्ष झाले तथापि राजकारणात त्यांना फारसा रस वाटेना. तेव्हा त्यांनी सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतले आणि उर्वरित आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन कार्यात व्यतीत केले. त्यांचे मुंबईला निधन झाले.

मुनशींचा पिंड साहित्यकाराचा होता. इंग्रजीत व गुजराती या दोन्ही भाषांतून त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. पत्रकारितेच्या क्षेत्रात ते पहिल्यापासून अखेरपर्यंत होते. ईस्ट अँड वेस्ट, हिंदुस्थान रिव्ह्यू यांतील लेखन, भार्गव हे गुजराती मासिक (१९१२), यंग इंडियाचे सहसंपादन (१९१५) गुजरात हे सचित्र मासिक (१९२२). सोशल वेल्फेअर हे साप्ताहिक (१९४०) व भवन्स जर्नल (१९५४) इ. नियतकालिके या संदर्भात उल्लेखनीय आहेत. भारतीय भाषांतील महत्त्वाचे साहित्य हिंदीमधून अनुवादित-संकलित करण्यासाठी १९३६ साली त्यांनी ‘द हंस लिमिटेड’ ही संस्था काढली.

मुनशींच्या इंग्रजी पुस्तकांतील काही उल्लेखनीय पुस्तके अशी : गुजरात अँड इट्स लिटरेचर (१९३५), आय फॉलो द महात्मा (१९४०), अखंड हिंदुस्तान (१९४२), द क्रिएटिव्ह आर्ट ऑफ लाइफ (१९४६), पिल्‌ग्रिमेज टू फ्रीडम (१९६८), सागा ऑफ इंडियन स्कल्प्चर (१९५९), कृष्णावतार (१९६७) इत्यादी. ऐतिहासिक, सामाजिक पौराणिक कादंबऱ्या व नाटके लिहून मुनशींनी आधुनिक गुजराती साहित्य समृद्ध केले. त्यांनी आत्मचरित्रपर लेखनही केले आहे. वेरनी वसुलात (१९१४), स्वप्नद्रष्टा (१९२५) या सामाजिक व पृथ्वीवल्लभ (१९२१), भगवान कौटिल्य (१९२५) या ऐतिहासिक कांदबऱ्या तसेच पुरंदर पराजय (१९२३), लोपामुद्रा (१९३३) ही पौराणिक नाटके व डॉ. मधुरिका (१९३६) आणि ब्रह्मचर्याश्रम (१९३१) ही सामाजिक नाटके उल्लेखनीय आहेत.

मुनशींचा अनेक सामाजिक-शैक्षणिक संस्थांशी अध्यक्ष, उपाध्यक्ष वा सदस्य इ. विविध नात्यांनी निकटचा संबंध होता. पाचगणी येथील हिंदू हायस्कूलची (विद्यमान संजीवन हायस्कूलची) स्थापना त्यांनी केली. मुंबई येथील भारतीय विद्याभवन (१९३८) हे त्यांच्या कार्याचे चिरंतर स्मारक होय. या संस्थेतर्फे भारताचा समग्र इतिहास हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल (१० खंड १९५८–७७) या शीर्षकाने रमेशचंद्र मजुमदार यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित झाला. भारतात अनेक ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत. त्यांना सन्मान्य डॉक्टरेटसह अनेक मानसन्मान लाभले.

कनैयालाल हे सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी १९२६ मध्ये दुसरा विवाह एका जैन विधवा महिलेशी केला आणि आंतरजातीय पुनर्विवाहाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या पत्नी लीलाबाई (? १८९९–६ जानेवारी १९७८) या पूर्वाश्रमीच्या लालाभाई शेठ (अहमदाबाद) यांच्या सुविद्य विधवा पत्नी होत. लीलाबाई या लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी १९३२ व १९४० मधील असहकार आंदोलनांत सक्रिय भाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. हरिजन सेवक संघ, मुंबई महानगरपालिका, मुंबई विधिमंडळ, राज्यसभा, हिंदी विद्यापीठ इ.संस्थांतून विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या गुजराती पुस्तकांपैकी रेखा चित्रो अने बिजा लेखे (१९२५), कुमारदेवी (१९२९), जीवनमन्थी जडेली (१९३२), रेखा चित्रो-जुना अने नवा (१९३५) इ. उल्लेखनीय आहेत. लीलाबाईंनी खाद्यपेय आयोजनाचे पहिले महाविद्यालय मुंबईत स्थापन केले.

कनैयालाल मुनशींचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. श्रेष्ठ कायदेतज्ञ व प्रभावी वक्ते म्हणून त्यांचा लौकिक होता. गुजराती साहित्यात त्यांचे स्थान मोठे आहे. भारतीय विद्याभवन ही जगन्मान्य संस्था स्थापून भारतीय साहित्य-संस्कृतीचे दर्शन त्यांनी जगाला घडविले.

संदर्भ : 1. Munshi, K. M. His Art and Work, Diamond Jubilee Vol., Bombay, 1947.              २. मुनशी, के. एम्. मारी विंजवबदर कहानी, मुंबई, १९४३.

देशपांडे, सु. र.