पख्तुन : पुश्तू भाषा बोलणारे ते पख्तुन किंवा पठाण व त्यांचा देश म्हणजे पख्तुनिस्तान. पठाण हा शब्द पाश्त-पश्टन-पाश्टनाह-पख्तुन या शब्दापासून रूढ झाला. पाकिस्तानच्या पेशावर विभागापासून, विशेषतः पूर्वीच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या प्रत्यक्ष ब्रिटिश अंमलाखालील सहा जिल्ह्यांच्या पलीकडील ड्युरँड रेषेपर्यंतचा मुलूख व अफगाण हद्दीतील ड्युरँड रेषेच्या परिसरातील प्रदेश यातील पठाणांच्या स्वातंत्र्य चळवळीमुळे पख्तुनिस्तानची समस्या निर्माण झाली आहे. ब्रिटिशांच्या वेळी वायव्य सरहद्द प्रांतातील दोन तृतीयांश भूभागात पठाणी टोळ्यांचे वर्चस्व असून राजकीय दृष्ट्या तो मलकंद, कुर्रम, खैबर, उत्तर व दक्षिण वझीरीस्तान येथील राजकीय प्रतिनिधीच्या देखरेखीखाली असे. या मुलुखात अफ्रिडी, मोहंमद, वझीरी, युसुफझाई, मोहंमदझई, शिन्वारा या टोळ्या तसेच कित्येक उत्तरेकडील टेकड्यांचा मुलूख आणि पेशावरच्या अन्य जमातीही राहतात. पेशावरच्या वायव्येस काबूल व स्वात नद्यांच्या दोआबात मोहंमद, खैबरच्या दक्षिणेस अफ्रिडी व कुर्रम नदीच्या परिसरात वझीरी टोळ्या राहतात. भटक्या टोळ्यांचा संचार सर्वत्र चालू असतो. या सर्व भूभागाला सामान्यतः टोळ्यांचा मुलूख म्हणतात. या पठाणी टोळ्या कोणाचेही दडपण न मानणाऱ्या व स्वातंत्र्यप्रिय आहेत. पठाण लोक पख्तुनवाली म्हणजे पठाणांचा अलिखित कायदा मानतात. त्यांच्या जीवनात शत्रूचा सूड आणि आतिथ्य (मेलमस्लिया) यांना विशेष महत्त्व आहे. हा सर्व टापू आपल्या संपूर्ण वर्चस्वाखाली आणून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी १८५८–१९०२ च्या दरम्यान अनेक मोहिमा काढल्या पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी टोळ्यांना खंडणी देऊन वायव्य सरहद्द प्रांतात शांतता ठेवण्याचे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारले. १९१९ पासून ह्या टापूस सरहद्द गांधी  अब्दुल गफारखानांचे नेतृत्व लाभले व त्यांच्या खुदाई खिदमतगार संघटनेने भारताच्या स्वातंत्र्य  युद्धात मोलाची कामगिरी बजावली आहे. जिनांचा द्विराष्ट्रवाद मान्य नसल्याने खुदाई खिदमतगारांचा भारताच्या फाळणीस विरोध होता, तसेच फाळणी अटळ झाल्यास भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचे दोनच पर्याय पठणांना न ठेवता पठाण स्वायत्ततेचा म्हणजे पख्तुनिस्तानचा तिसरा  पर्याय त्यांच्यापुठे ठेवावा, अशी त्यांची मागणी होती. ती मान्य न झाल्याने खुदाई खिदमतगारांनी वायव्य सरहद्द प्रांतातील सार्वमतावर बहिष्कार घातला. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडविताना पठाणांच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष होणार नाही, या व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या आश्वासनानुसार पख्तुन प्रश्नाचा विचार व्हावा, असे अफगाणिस्तानचेही मत होते म्हणून अफगाण शासनाने पख्तुन चळवळीस पाठिंबा दिला व त्यामुळे पुढे पाकिस्तान–अफगाणिस्तान संबंध सलोख्याचे राहिले नाहीत.

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तेथील शासकांनी सामदामदंडभेदादी उपायांनी पठाणी टोळ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला व गफारखानांसह कित्येक पख्तुन पुढाऱ्यांना दीर्घकाल तुरुंगात डांबून ठेवले. १९५५ मध्ये पाकिस्तानची घटना बदलून सिंध, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत ही घटकराज्ये पश्चिम पाकिस्तानात विलीन करण्यातही इस्लामी एकतेच्या नावाखाली पठाणांच्या स्वयंनिर्णयाच्या मागणीस शह देण्याचाच पाकिस्तानचा डाव होता, असे पख्तुन नेत्यांचे मत आहे. एकंदरीत गेल्या २०–२५ वर्षांत पख्तुनिस्तानच्या चळवळीने मूळ घरल्याने मध्य आशियातील राजकारणात पख्तुनिस्तानची समस्या हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे.

ओक, द. ह.