अयुबखान

अयुबखान, महंमद : (१४ मे १९०७–२० एप्रिल १९७३). पाकिस्तानचे  १९५८–६९ पर्यंतचे अध्यक्ष. रावळपिंडीजवळील रेहाना गावी जन्म. मुस्लिम विद्यापीठ व नंतर इंग्‍लंडमधील सँढर्स्ट लष्करी अकादमीत शिक्षण घेतल्यावर १९२६ मध्ये ते ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील लष्करात दाखल झाले. दुसऱ्‍या महायुद्धात त्यांनी ब्रह्मदेश-आघाडीवर प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर ते पाकिस्तानी लष्करात गेले व १९५१ मध्ये पहिले पाकिस्तानी सरसेनापती झाले. १९५४–५६ या काळात ते पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही होते. अध्यक्ष झाल्यावर फील्ड मार्शल हा सर्वोच्च लष्करी किताब त्यांनी धारण केला.

लष्करी राज्यक्रांतीनंतर ते २७ ऑक्टोबर १९५८ ला पाकिस्तानचे अध्यक्ष झाले. त्यावेळचे संविधान रद्द करून त्यांनी पाकिस्तानात लष्करी अंमल जारी केला. पाकिस्तानात माजलेल्या भ्रष्टाचारास आळा घालण्याचा प्रयत्‍न व जमीनधारणेचे नवीन धोरण यांमुळे ते पाकिस्तानात काही काळ फार लोकप्रिय झाले. १९६० साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने अध्यक्ष निवडले गेले.

पाकिस्तानसाठी नवे संविधान १९६२ मध्ये कार्यवाहीत आणून त्यांनी लष्करी अंमल उठविला. बलवान मध्यवर्ती सरकार व मूलभूत लोकशाही ही त्या संविधानाची वैशिष्ट्ये होती. १९६५ मध्ये फातिमा जिना ह्यांचा पराभव करून ते पुन्हा पाकिस्तानचे अध्यक्ष झाले.

सीटो, सेंटो अशा साम्यवादविरोधी लष्करी संघटनांमध्ये असूनही अयुबखानांनी चीन व रशिया ह्यांच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्यात यश मिळविले. परंतु १९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारताविरुद्ध केलेल्या अयशस्वी आक्रमणानंतर त्यांच्या लोकप्रियतेस ओहोटी लागली. शेवटी पाकिस्तानातील, विशेषतः पूर्व पाकिस्तानातील, तीव्र असंतोषामुळे २५ मार्च १९६९ रोजी राज्याची सूत्रे जनरल याह्याखान ह्यांच्या हाती देऊन त्यांना निवृत्त होणे भाग पडले.

नरवणे, द. ना.