क्रांति – २ : ‘क्रांति’ या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो. व्यापक सामाजिक संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्था, संस्कृती, वैज्ञानिक वा इतर सामाजिक संस्था किंवा परिस्थिती यांमध्ये मौलिक परिवर्तन घडून होणारा विकास, असा या शब्दाचा अर्थ होतो. मानवी प्रयत्नाच्या कोणत्याही क्षेत्रातील विकासाभिमुख परिवर्तन यात अभिप्रेत असते. अमेरिकन आणि फ्रेंच या राजक्रांत्यांच्या घडामोडींनंतर ‘जुने मोडणे व नवे घडविणे’, हा अर्थ त्यात अधिक स्पष्ट झाला. जुने हक्क वा जुन्या चांगल्या परंपरा पुनरुज्जीवित करण्याचीही कल्पना अमेरिकन व फ्रेंच राज्याक्रांतीच्या नेत्यांच्या मनात होती. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील नागरिक अनुभवत असलेले स्वतंत्र व राजकीय हक्क आपणास पूर्णपणे प्राप्त व्हावे, आपणास कायदेमंडळावर वा संसदेवर प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळावा, अशी आकांक्षा उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींत आलेल्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आणि त्याकरिता ब्रिटिश वसाहतवाल्यांनी ब्रिटनशी युद्धास प्रारंभ केला. परंतु अखेर अपेक्षेपेक्षा निराळेच घडले, अमेरिकन राष्ट्र स्वतंत्र झाले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या नेत्यांनासुद्धा रोमन साम्राज्यातील नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य हे ध्येयही आकर्षक वाटत होते परंतु या दोन्ही क्रांत्यांमध्ये प्रत्यक्ष मागणी व घोषणा, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मानवी हक्कांचीच होती.

आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक किंवा सामाजिक क्रांतीमध्ये सशस्त्र बंडाची किंवा उठावाची म्हणजे हिसेंची बहुधा आवश्यकताच नसते राजकीय क्रांतीच्या घडामोडीतच हिंसा आवश्यक म्हणून निर्माण होते. क्रांतीची पूर्वतयारी म्हणजे प्रगती, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय यांची नेत्यांच्या व जनतेच्या मनात उत्पन्न झालेली तीव्र जाणीव आणि त्याचप्रमाणे जुलूम, भ्रष्टाचार, जीर्ण झालेली सामाजिक व राजकीय चौकट यांच्याविरुद्ध प्रखर असंतोष होय. या पूर्वतयारीनंतरच नेते क्रांतीचा उठाव करू लागतात.

क्रांती व प्रतिक्रांती अशा दोन सापेक्ष संज्ञा राजकीय इतिहासात रूढ झाल्या आहेत. त्यांचा पहिला साधा अर्थ असा की, विशेष राजकीय परिवर्तन झाल्यानंतर नवी राजवट अस्तित्वात येते व नवे सत्ताधारी सत्तारूढ होतात. पुन्हा काही सामाजिक शक्ती उठाव करून ती राजवट त्या सत्ताधाऱ्यांसह उलथून टाकतात आणि त्या शक्तींचे प्रतिनिधी आपली राजवट स्थापन करतात ह्यास प्रतिक्रांती म्हणतात. परंतु केवळ नवी राजवट स्थापन करणे व जुनी उलथून टाकणे म्हणजे क्रांती नव्हे, किंवा नवी राजवट स्थिरावल्यानंतर किंवा स्थिरावत असताना पुन्हा तिला जबरदस्त धक्का देऊन निराळी राजवट स्थापन करणे, म्हणजे प्रतिक्रांती नव्हे. क्रांतीच्या मुळाशी प्रेरक असलेल्या ध्येयवादात सर्व नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य हे अंतिम मूल्य म्हणून गृहीत धरलेले असते आणि त्या मूल्यानुसारे नवे राज्यसंविधान तयार होऊन ते संविधान, अर्थात राज्याचा मूलभूत कायदा कार्यवाहीत आणणारी राज्यसंस्था स्थापित होते आणि त्यानंतर जे वारंवार कायदे होतात ते मूलभूत स्वातंत्र्याला व इतर नागरिक हक्कांना जीवनात मूर्त स्वरूप देण्याकरिता तयार होत असतात. परंतु नंतर मूलभूत स्वातंत्र्य व नागरिक हक्क किंवा अन्य पुरोगामी जीवनमूल्ये अमान्य असलेल्या प्रतिगामी सामाजिक शक्तींचे प्रतिनिधी वरील प्रकारचे राज्यसंविधान व त्याच्यावर आधारलेली राज्यसंस्था व शासन उलथून पाडून त्यात अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य व अन्य मूलभूत हक्क यांची गळचेपी करणारी राज्यसंस्था व शासन पुन्हा निर्माण करतात त्याला प्रतिक्रांती म्हणतात.

जुनी सामाजिक व राजकीय व्यवस्था संपूर्णपणे किंवा अंशतः मोडकळीस येते तेव्हा क्रांतीची परिस्थिती तयार होते. सत्ताधारी वर्गाची अकार्यक्षमता व दुर्बलता, आर्थिक पेचप्रसंग, युद्ध, जनतेचा कंगालपणा इ. गोष्टी सामाजिक व राजकीय दुरवस्थेस कारण होतात. जेव्हा दीर्घ काळ लाभलेल्या शांततेत सुस्त बनलेला सत्ताधारी वर्ग व समाजातील प्रतिष्ठित लोक आळशी, भ्रष्टाचारी आणि बदलत्या परिस्थितीचे आकलन न करता मूढ व आत्मसंतुष्ट बनतात, अंधश्रद्धेने परंपरेला चिकटून बसतात राज्याबाहेरच्या जगातील नव्या घटनांकडे दुर्लक्ष करतात जनतेच्या दुस्थितीकडे कानाडोळा करतात आणि न्याय्य तक्रारी करणाऱ्या बहुजनांना दडपून टाकतात तेव्हा सामाजिक व राजकीय स्थिती मोडकळीस आली, असे समजावे. मात्र ही मोडकळीस आलेली परिस्थितीच केवळ क्रांतीस कारण होऊ शकत नाही तीत अधिक कारणांची भर पडणे जरूर असते.

दुसरे असे की, सामाजिक दुरवस्थेची जाणीव असलेला आणि त्या जाणिवेमुळे वारंवार आर्थिक, सामाजिक सुधारणांची मागणी करणारा असा असंतुष्ट मोठा वर्ग, जनतेचा मोठा विभाग, अस्तित्वात यावा लागतो आणि असंतोषाचे निदर्शक असे उद्रेकही व्हावे लागतात.

तिसरेकारण म्हणजे चालू सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या विरुद्ध जनतेची कृतीवारंवार घडून यावी लागते. त्याकरिता जनतेला वैचारिक शिक्षण देणारा वकृतीकरिता कार्यक्रम देऊन मार्गदर्शन करणारा, लहानमोठ्या नेत्यांचा वर्ग वापक्ष तयार व्हावा लागतो. नेत्यांच्या वा पक्ष्याच्या नेतृत्वाखालीकायद्याच्या मर्यादेचे वा कायद्याच्या मर्यादेबाहेरचे आंदोलन सुरू व्हावेलागते. हा नेत्यांचा वर्ग सुशिक्षितांचा वर्ग असतो. कित्येक वेळात्यांच्यामध्ये प्रस्थापित राज्यसत्तेच्या व्यवस्थेत भागीदार असलेले काहीलोकही असू शकतात. क्रांतीच्या ध्येयाने भारलेले काही सामान्य सैनिकअधिकारीही त्यात सामील होऊ लागतात. उदा., एकोणिसाव्या आणि विसाव्याशतकांतल्या क्रांतिकारकांत मध्यमवर्गीय किंवा गरीब मध्यमवर्गीय शिक्षितलोक, विद्यार्थी, तरुण वर्ग, खालचे सैनिक अधिकारी यांचा भरणा दिसून येतो.अनुयायी वर्गातही यांचा मोठा भरणा झालेला असतो. स्वास्थ्यात वाढलेले, अनेकपिढ्यांपर्यंत दौलतीचे मालक असलेले व आपल्या वर्गाचे सवलतीचे हितसंबंध राखूइच्छिणारे उच्चवर्गीय लोक सहसा क्रांतिकारक गटात नेते म्हणून किंवा अनुयायी म्हणून सामील होत नसतात. आर्थिक दृष्टीने ज्यांचे जीवन अस्थिर असते व ज्यांना सतत अस्वास्थ्यात दिवस काढावे लागतात, त्या वर्गातीलच लोक मौलिक समाज परिवर्तनाला आवश्यक असलेल्या राजकीय आंदोलनात सामील होतात परंतु केवल आर्थिक अस्वास्थ्य किंवा दुस्थिती एवढेच कारण पुरेसे होत नाही. आंदोलनात सामील होण्याकरिता ध्येयवादी प्रेरणांची गरज असते. पिढ्यानपिढ्या दैन्यावस्थेत राहिलेले वर्ग अज्ञानग्रस्त असल्यामुळे त्यांना पद्धतशीरपणे सामाजिक परिवर्तानाची वा मूलभूत हक्कांची आवश्यकताच ध्यानात येऊ शकत नाही. अजाणपणाच्या दीर्घ अंधःकारातच ते वर्ग बुडलेले असतात. त्या अंधःकारातून आशेचा किरण सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रचारकांकडूनच किंवा राजकीय संघटना वा पक्ष यांच्याकडूनच त्यांना लाभावा लागतो. उच्च शिक्षण मिळालेले विचारवंतच त्या त्या परिस्थितीस अनुरूप असे कार्यक्रम आखून आंदोलनाचे शिक्षण सामान्य जनतेस जेव्हा देतात, तेव्हाच क्रांतीची पूर्वतयारी होऊ शकते.


राजकीय क्रांती ही बहुधा सशस्त्र उठाव वा युद्ध यांच्या ओघातच घडून येते. सशस्त्र उठावावाचून म्हणजे हिंसेवाचून राजकीय व तज्जन्य सामाजिक क्रांति घडू शकते, असा विचार क्रांतीचा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८८३) याला त्याच्या आयुष्याच्या शेवटी सुचला होता. तो लिहितो की, इंग्लंडमध्ये सशस्त्र उठावावाचून शांततामय उपायांनीच समाजवादाची स्थापना होऊ शकेल. निःशस्त्र क्रांतीचा पुरस्कार भारतीय स्वातंत्र्याचे नेते राष्ट्रपिता ⇨ महात्मा गांधी यांनी प्रामुख्याने मांडला आणि भारताचे स्वातंत्र्य वा लोकशाही संघराज्य हे एका अर्थी सत्याग्रहाच्या आंदोलनाने सशस्त्र युद्धावाचून निर्माण झाले. हे जरी खरे असले, तरी जगातील आजपर्यंतच्या राजकीय क्रांत्यांचा इतिहास हा मुख्यतः युद्ध आणि हिंसा यांनी भरलेला दिसतो. पुष्कळ वेळा प्रस्थापित राज्यसंस्थेतील सत्ताधारी हे क्रांतिकारक आंदोलनाला आळा घालण्याकरिता पोलीस व सैन्य यांचा वापर करतातच. त्यामुळे क्रांतिकारक आंदोलनाचे युद्धात रूपांतर होते. अमेरिकन क्रांति सफल होऊन शांतता प्रस्थापित होईपर्यंत ब्रिटनशी त्यांचा काही वर्षे संग्राम चालू होता. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रारंभ १४ जुलै १७८९ मध्ये सुरू झाला आणि तीत क्रांती व प्रतिक्रांती यांची मालिका, ही तिसरे गणराज्य स्थापन होईपर्यंत चालू होती. तिसरी जगातील मोठी राज्यक्रांती रशियन राज्यक्रांति होय. ही बोल्शेव्हिक ऑक्टोबर क्रांती होय. ती रशियन कालगणनेप्रमाणे २५ ऑक्टोबर १९१७ मध्ये झाली. प्रस्थापित सत्ताधार्‍यांच्या हातातून सत्ता काबीज करणे, ही क्रांतीच्या यशाची पहिली पायरी होय आणि सत्ता काबीज करणाऱ्‍या वर्गाने वा पक्षाने संविधान निर्माण करून अथवा निर्माण न करता संविधान तयार करून राज्यसंस्था निर्माण करणे, ही क्रांतीच्या यशाची दुसरी पायरी होय. रशियन राज्यक्रांती ही सशस्त्र उठावाने झाली परंतु त्यात सत्ता काबीज करण्याच्या कालबिंदूपर्यंत रक्तपात फार थोडा करावा लागला.

लाल चीनची १९४९ साली झालेली चौथी मोठी राज्यक्रांती होय. या राज्यक्रांतीचा इतिहास, हा दुहेरी युद्धाचा म्हणजे प्रथम कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय पक्ष यांच्यातील यादवीचा व नंतर जपानी साम्राज्यशाही व चिनी राजकीय शक्ती यांच्यातील युद्धाचा इतिहास होय. हे दुहेरी युद्ध १९२७ ते १९४९ पर्यंत तीव्रपणे चालू होते. यात तीन बाजू युद्धमान दिसतात : एक, ⇨ चँग-कै-शेकची (१८८७—१९७५) राष्ट्रीय आघाडी, दुसरी जपानची आक्रमक आघाडी आणि तिसरी ⇨माओ त्से तुंगची कम्युनिस्ट पक्षाची आघाडी. राष्ट्रीय आघाडी आणि कम्युनिस्ट आघाडी यांच्यात अनेक तीव्र युद्धे झाली, त्याबरोबरच वारंवार शांततेचे तात्पुरते तहही झाले. हे शांततेचे तह जपानच्या साम्राज्यशाही आक्रमणाला एकजुटीने तोंड देण्याकरिता झाले. जगाच्या इतिहासात क्रांतीकरिता इतका दीर्घ काळ चाललेला सशस्त्र लढा दुसरा दिसत नाही.

भूतपूर्व पूर्व पाकिस्तानात म्हणजे सध्याच्या बांगला देशात क्रांतीपासून स्वातंत्र्ययुद्धास प्रारंभ झाला. नंतर सशस्त्र क्रांती झाली त्यानंतर प्रतिक्रांती व क्रांती यांची मालिका लागलेली बांगला देशच्या स्वातंत्र्य आंदोलनात दिसते. म्हणून असे निश्चित म्हणता येते की, भारतातील शांततामय लोकशाही क्रांती हा जगाच्या इतिहासात एक अपवादच ठरतो व हा अपवाद एकाअर्थी ब्रिटनच्या जागतिक राजकीय धोरणाचाच परिणाम होय. एकीकडे अहिंसावादी गांधीप्रणीत तत्त्वज्ञान व आंदोलन आणि दुसर्‍या बाजूला ब्रिटिश उदारमतवादी राजनीतीचे तडजोडीचे धोरण, हे होय.

क्रांतियुद्ध हे यादवी युद्ध असते. एका बाजूला, प्रस्थापित सत्तेचे स्वसंरक्षक तथाकथित सनदशीर किंवा कायदेशीर हिंसातंत्र आणि दुसऱ्‍या बाजूला, राजकीय परिवर्तन घडवून आणण्याकरिता असनदशीर व बेकायदा असे मानलेले हिंसातंत्र होय. हे अंतर्गत यादवी युद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध बनण्याचा धोका असतो. उदा., व्हिएटनाममध्ये सतरा वर्षांपेक्षा अधिक वर्षे चाललेले साम्यवादी क्रांतीचे युद्ध होय. या युद्धात एका बाजूने अमेरिका ही दक्षिण व्हिएटनाममधील प्रतिगामी सत्तेला पाठिंबा देण्याकरिता प्रथम अप्रत्यक्षपणे आणि कालांतराने प्रत्यक्षपणे युद्धात उतरली. उत्तरव्हिएटनामच्या साम्यवादी सत्तेला लाल चीन व सोव्हिएट युनियन अप्रत्यक्षपणे परंतु उघड रीतीने युद्धसाहाय्य करीत होते.

क्रांतीच्या यशाच्या मुख्यतः तीन पायऱ्‍या असतात एक, यादवी युद्धाचा उठाव क्रांतिकारक गट करतो आणि तो गट दळणवळणाची, संदेशवहनाची मुख्य स्थाने व साधने ताब्यात घेऊन प्रस्थापित सत्तेचे केंद्रस्थान किंवा राजधानी काबीज करून गोंधळ निर्माण करतो. दोन, शत्रूच्या सैन्याची नाकेबंदी करून त्याची परिणामकारकता घालवितो आणि विरोध मोडून टाकण्याकरिता त्या विरोधी सेनेस व पोलीसदलास हतबल करतो. तीन, देशभर शांतता प्रस्थापित करून नव्या सत्तेचा अंमल स्थापित झालेला जाहीर करतो आणि नवे संविधान निर्माण करतो. या तीन पायर्‍या म्हणजे क्रांतीचे प्रथम पर्व होय. दुसरे पर्व म्हणजे सत्ता व संविधान यांच्या द्वारे क्रांतिकारक गट सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा कार्यक्रम अंमलात आणू लागतो आणि क्रांतीच्या क्षेत्रात राष्ट्रराज्य उभारतो.

आधुनिक क्रांतीचे युग अठराव्या शतकात अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती यांपासून सुरू झाले. या क्रांत्यांचा ध्येयवाद हा विश्वक्रांतीचा ध्येयवाद आहे. या ध्येयवादाने माणसात अदम्य आत्मविश्वास उत्पन्न केला. या ध्येयवादाची तीन तत्त्वज्ञाने उदयास आली ही विश्वमानवाची तत्त्वज्ञाने किंवा मानवतेची तत्त्वज्ञाने होत. मूलभूत मानवी हक्कांचे व लोकशाहीचे तत्त्वज्ञान ⇨ जॉन लॉक (१६३२—१७०४) आणिðझां झाक रूसो (१७१२—७८) या इंग्लिश व फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी प्रतिपादिले. दुसरे समाजवाद व साम्यवादाचे तत्त्वज्ञान अत्यंत प्रभावीपणे कार्ल मार्क्स याने आणि तात्विक ⇨अराज्यवादाचे तत्त्वज्ञान गॉडविन, ⇨प्येअर प्रूदाँ (१८०९-६५) व ⇨प्यॉटर क्रपॉटक्यिन (१८४२—१९२१) यांनी मांडले. प्रूदाँनेच प्रथम सतत क्रांतीचा सिद्धांत मांडला. या तिन्ही तत्त्वज्ञाज्ञांनी आधुनिक जग कमीजास्त प्रमाणात प्रभावित झाले आहे. ही तीनही तत्त्वज्ञाने समाज आणि मानव यांचा संबंध उलगडून सांगतात. सामाजिक घटनांचे कर्तृत्व हे मानवी कर्तृत्व आहे मनुष्य इतिहासाचा कर्ता आणि मानवी स्वातंत्र्य, हे मानवी कर्तृत्वाचे व विकासाचे प्रेरक मुख्य तत्त्व व अंतिम उद्दिष्ट आहे, असे ही तत्त्वज्ञाने सांगतात.

लॉक आणि रूसो यांनी समाज व राज्यसंस्था यांचे कारण वा कर्ता मनुष्य आहे, असे सामाजिक कराराचा सिद्धांत सांगून प्रतिपादिले आहे. या सिद्धांताच्या योगाने राजसत्तेला धक्का दिला म्हणजे असे की, राजाला कायदे करण्याचा आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा व जनतेवर सत्ता चालविण्याचा नैसर्गिक वा दैवी हक्क आहे, या श्रद्धेला उखडून टाकले. राजाच्या विरुद्ध जाणे वा राजसत्तेला नष्ट करणे म्हणजे निसर्गाच्या वा ईश्वरेच्छेच्या विरुद्ध जाणे व पाप करणे होय, अशी सामान्य जनांची भावना होती, ती सामाजिक कराराच्या सिद्धांताने नष्ट झाली.

राज्यसंस्था ईश्वराच्या संकेताने निर्माण झाली आहे, अशी श्रद्धा राजसत्तेच्या मुळाशी हजारो वर्षे होती. परमेश्वर काही निवडक माणसांना राजकीय सत्तेचे वरदान देतो आणि ती माणसे त्या वरदानाच्या आधारे सनदशीर शासनाची स्थापना करून वंशपरंपरागत राज्ये चालवितात. राजद्रोह, बंड, कायदेभंग इ. कृती यामुळे अपवित्र ठरतात. सरदारवर्गातील काही गट राजसत्तेची बाजू या श्रद्धेने बळकट करतात, कारण त्यांच्या वंश परंपरागत अधिकारास त्यामुळे आधार सापडतो. नवीन उदयास येणारा व्यापारी वर्ग आणि सुस्थितीतील मध्यम वर्ग वरचढ होऊ पाहतात, तेव्हा त्यांना सरदारवर्ग राजाश्रयाच्या द्वारे कह्यात ठेवतो. काही महत्त्वाकांक्षी सरदार मात्र वंशपरंपरागत राजसत्तेचा हेवा करीत राहतात, कारण त्यांनाही राज्य बळकावण्याची किंवा स्वसत्ता वाढविण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे राजाच्या दैवी अधिकाराची कल्पना ज्या वर्गांच्या उत्कर्षाला अडचण उत्पन्न करू लागली, त्या वर्गांच्या जाणिवांचे तात्विक बुद्धिवादी आविष्करण सामाजिक कराराच्या सिद्धांताच्या योगाने सतराव्या शतकाच्या मध्यात होऊ लागले.


प्रथम मानवजात अस्तित्वात येऊन जगू लागली, तेव्हा राज्यसंस्था नव्हतीकेवळ ‘निसर्गाचे राज्य’ (स्टेट ऑफ नेचर) होते. माणसांना आपले जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याकरिता स्वतःचीच शक्ती पणास लावावी लागली. माणूस मुळात स्वतंत्र होता, त्याला आपले स्वातंत्र्य सुरक्षित राखण्याकरिता स्वतःचीच ताकद वापरावी लागे. माणसे वाढली. गोंधळ वाढला. या गोंधळाच्या अवस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांना एकत्र येऊन सर्वांच्या रक्षणार्थ व सर्वांच्या हक्कांच्या रक्षणार्थ सामुदायिक संकल्प करणे भाग पडले व त्यांनी आपल्यांतलाच एक माणूस प्रमुख म्हणून निवडला. सर्वांचे रक्षण करण्याचा करार होत असताना निवडलेला माणूसही इतर सर्वांबरोबर कराराने बांधला गेला. सर्वांचे समान हित साधणे, हे या कराराचे उद्दिष्ट होते परंतु या उद्दिष्टाला धरून करार पाळण्याचे कर्तव्य पार न पाडता सत्ता निरंकुश रीतीने राजा वापरू लागला. परंतु करारानुसार असा राजा अवैध ठरतो. ⇨टॉमस हॉब्जच्या (१५८८ – १६७९) मते राजा हा कराराने बांधला जात नाही, त्याला करारात न गोवता माणसांनीच आपापसांत करार करून त्याच्याकडे सत्ता सोपवली. म्हणून राजा हा अवैध रीतीने सत्ता वापरतो, असे केव्हाही म्हणता येत नाही. हॉब्जच्या मते ‘निसर्गाचे राज्य’ म्हणजे नैसर्गिक बेबंदशाही होय. प्रत्येक जण दुसऱ्याच्या विरुद्ध लढत असतो, अशी ही मुळातली परिस्थिती होती त्यामुळे या परिस्थितीच्या अडचणीतून बाहेर पडण्याकरिता व सुव्यवस्थेकरिता कोणातरी एका वरिष्ठावर माणसांनी सत्ता सोपविली, असे तो म्हणतो.

रूसोने सामाजिक कराराचा सिद्धांत लॉक व हॉब्ज यांचे विचार तपासून पुन्हा मांडला. रूसोचा ‘सामाजिक करार’ हा ग्रंथ फ्रेंच राज्यक्रांतीचे बायबल ठरला. रूसोच्या मते माणूस जन्मला तो स्वतंत्र आणि आता तो सगळीकडे शृंखलांनी बांधला गेला आहे. रूसो म्हणतो की, सामाजिक संस्था व राज्य निर्माण करीत असता माणसांनी सर्वांच्या कल्याणाच्या इच्छेने समाज वा राज्य चालावे, म्हणून समाजाला वा राज्याला आपले मूळचे स्वातंत्र्य बहाल करून माणसे सामाजिक बंधनात अडकली. समाजात विषमता वाढली. मूळचे सुखी जीवन माणूस गमावून बसला. मोठा मानववर्ग दैन्य व विपत्ती यांनी कायम ग्रासला गेला. अलीकडे आधिभौतिक विज्ञानाची व उपभोग्य संपत्तीची वाढ होत असली, तरी अगणित माणसे विषमतेत, दारिद्र्यात आणि अन्य विपत्तीत खितपत आहेत. विषमतेच्या प्रखर जुलमाखाली सामाजिक अन्याय फोफावत आहे. राजे व वरिष्ठ वर्ग मानवी दुःखांकडे आणि हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचे कारण राजकीय सत्तेच्या मूळ उद्दिष्टाशी विसंगत व विरोधी असे राज्यतंत्र व कायदा यांचे शासन चालले आहे. सामाजिक कराराच्या पाठीशी सर्वांचे समान हित हे उद्दिष्ट आहे, त्याकरिता सर्वांच्या समान हिताची समान एषणा (जनरल विल), ही प्रभावी व्हायला पाहिजे. ही समान हिताची समान एषणा, ही एकरूप झालेल्या जनतेत वास करते. त्यामुळेच एकात्मक जनता किंवा लोक हेच सार्वभौम सत्तेचे अधिष्ठान होय, असे ठरते. एकाने किंवा काही जणांनी जनतेवर राज्य करणे हा अन्याय होय. एकेका व्यक्तीची इच्छा किंवा एषणा, ही समान हिताच्या समान एषणेशी विरुद्धच असण्याचा फार संभव असतो. सर्वांचे मतदान होऊन जे ऐक्यमत निर्माण होते, त्याच्यापेक्षाही समान हिताची समान एषणा ही निराळी आहे. ह्या समान एषणेची सत्ता सुरू झाली, म्हणजे खरीखुरी समानता स्थापन होऊ शकते.

दयावा करुणा ही नैसर्गिक भावना आहे. दुसऱ्याचे दैन्य व दुःख पाहून ती निर्माणहोते व तिच्यातच समान हिताची एषणा प्रतिबिंबित होते. बुद्धी वभावना या दोन मानसिक प्रवृत्ती वा शक्ती आहेत दुसऱ्‍या शब्दांत, डोके व ह्रदय यांच्या प्रवृत्ती होत. नुसती बुद्धी ही करुणा, सहानुभूती किंवा दयेवाचून स्वार्थी बनविते. त्यामुळे विषमता आणि सामाजिक अन्याय निर्माण होतो. बुद्धीपेक्षा म्हणजे डोक्यापेक्षा ह्रदयाला व व्यापक सद्‍भावनांना अधिक मूल्य आहे. भावना मुख्य व बुद्धी ही दुय्यम होय. भावनांच्या योगानेच म्हणजे उदा., करुणेने अथवा ह्रदयाच्या आर्द्रतेने समानतेची स्थापना करणारी समान एषणा प्रभावी ठरते.

ब्रिटनमधील लोकशाही आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यातील मानवी हक्कांच्या कल्पनेच्या मुळाशी जॉन लॉक इत्यादिकांचे उदारमतवादी तत्त्वज्ञान आहे. यात बुद्धिवादी नीतिशास्त्र आहे. ‘पुष्कळांचे पुष्कळ हित’ हीच नीतीची कसोटी मानणारे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र उदारमतवादात अंतर्भूत आहे. रूसोचा परिणाम इंग्रजी भाषिक विचारवंतांवर विशेषसा झाला नाही परंतु फ्रेंच राज्यक्रांतीच्या नेत्यांवर खूप झाला. त्यांच्यावर उदारमतवाद व रूसोचे समतावादी राजकीय तत्त्वज्ञान या दोन्ही प्रणालींचा संमिश्र परिणाम झालेला दिसतो. रूसोच्या समुदायप्रधान लोकशाहीच्या विचारातूनच विद्यमान डाव्या हुकूमशाह्यांचा जन्म झाला, असेंही काही राज्यमीमांसक म्हणतात. व्हॉल्तेअर (१६९४ – १७७८) या फ्रेंच विचारवंतावर मात्र रूसोचा प्रभाव पडला नाही. त्याच्यावर इंग्लिश उदारमतवादाचाच खोल परिणाम झालेला दिसतो.

फ्रेंच राज्यक्रांतीतून लोकशाहीचे राज्यसंविधान निर्माण होऊ शकले नाही ती क्रांती फसली. हुकूमशाही आणि एकतंत्री राज्यसत्ता एकापाठीमागून एक अशा निर्माण झाल्या. याची मीमांसा अनेक शतके इतिहासज्ञांनी व राज्यशास्त्रज्ञांनी आतापर्यंत चालविलेली आहे. यशस्वी झालेली अमेरिकन राज्यक्रांती इतिहासज्ञांच्या आणि राज्यशास्त्रज्ञांच्या मीमांसेचा विशेषपणे विषयच झाली नाही. याचे एक कारण असे की, हजारो वर्षे प्रगतिपथावर प्रथम हळूहळू व नंतर सोळाव्या शतकापासून वेगाने मार्गक्रमण करीत असलेल्या यूरोपीय समाजांना त्यांच्या सांस्कृतिक केंद्रस्थानी म्हणजे फ्रान्समध्ये अनेक दशके चाललेल्या या क्रांतीच्या क्रिया आणि प्रतिक्रिया तीव्रतेने जाणवत होत्या. अमेरिकन क्रांती ही त्या वेळच्या वाहतुकीच्या मंदगामी साधनांच्या दृष्टीने फार दूरच्या प्रदेशात घडून आली होती त्यामुळे तिचे धक्के फारसे जाणवले नाहीत. अमेरिकन क्रांती यशस्वी झाली, याचे पहिले कारण असे की, त्या क्रांतीचे अधिष्ठान असलेला गौरकाय सामान्य समाज दैन्यग्रस्त नव्हता. म्हणून दैन्यावस्थेच्या पीडेने क्षुब्ध होऊन तो क्रांतीस उद्युक्त झाला, असे म्हणता येत नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि व्यवसाय यांची समाधानकारक तरतूद असलेला तो गौरकाय समाज नव्या भूमीत नांदत होता. दुसरे कारण असे की, ग्रामे, नगरे, जिल्हा व प्रांत या पातळींवर लोकशाही संस्था दृढमूल झाल्या होत्या. त्यामुळे विवेकबुद्धीने आणि बुद्धिवादाने निश्चित झालेली अशी मानवी मूलभूत हक्कांची ध्येये त्यांच्यात दृढमूल झाली होती. भूक व दैन्य यांच्यातून घडणारी कृती, ही विवेकबुद्धी व सारासार विचार यांच्यापासून अलगपणे घडत असते. फ्रेंच राज्यक्रांतीचा उठाव करणारा जनसमुदाय हा विषमता आणि दैन्य यांनी पिडलेला होता त्यात भुकेची हाक होती. गरिबांचा क्षोभ आणि नेत्यांची करुणा या दोन भावनांचे मीलन त्यात घडलेले होते. त्यामुळे भावनांचे आणि सह्रदयतेचे समर्थन आणि समानतेचे विवेचन करणारे रूसोचे तत्त्वज्ञानच फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रेरक ठरले. भुकेने उत्पन्न झालेला क्षोभ हा अनिवार्य असतो. इतिहासातील स्थित्यंतरे व क्रांत्या अनिवार्यपणे घडतात हा मार्क्सवादातील ऐतिहासिक अनिवार्यतेचा किंवा अपरिहार्यतेचा सिद्धांत ⇨ हेगेलला (१७७० – १८३१) व मार्क्सला सुचण्याचे एक कारण फ्रेंच राज्यक्रांती होय.


व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्कावर आधारलेली राजकीय लोकशाही क्रांती आणि आर्थिक समताप्रधान समाजवादी क्रांती या दोन क्रांत्यांची प्रेरणा एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील मुख्य राजकीय घटनांच्या मुळाशी दिसते. सामाजिक व आर्थिक समतेच्या स्थापनेकरिता नवी समाजरचना कशी असावी, या संबंधाचा विचार ⇨टॉमस मोर (१४७८ १५३५) याने प्रथम केला. यूटोपिया या ग्रंथात समताप्रधान समाजव्यवस्थेचे कल्पनारम्य चित्र त्याने रेखाटले. लोकशाही किंवा समाजवाद या ध्येयांचे प्रेरक मुख्य तत्त्वज्ञान मानवतावाद होय. कार्ल मार्क्सपर्यंत जे मानवतावादी विचारवंत झाले, त्यांच्या समाजवादाला मार्क्सने ‘यूटोपियन समाजवाद’ असे म्हणून बाजूला सारले व स्वतः तथाकथित वैज्ञानिक पद्धतीने समाजवादाचे ‘साम्यवाद’ नामक अंतिम परिणतीचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. मार्क्स म्हणतो की, नैतिक दृष्ट्या आर्थिक समतेकडे नेणारा समाजवाद हा आदर्श, ऐतिहासिक दृष्टीने एका विशिष्ट सामाजिक परिवर्तनानंतरच मूर्त रूपास येऊ शकतो ध्येयवादी माणसाने ऐतिहासिक भौतिकवादाच्या संदर्भातच हा आदर्श अस्तित्वात आणण्याचा कार्यक्रम स्वीकारला पाहिजे. मानवी इतिहासाचा गाभा आर्थिक इतिहास होय. राज्य, कायदा, कला, धर्म, साहित्य, विज्ञान, संस्कृती यांचा पाया अर्थोत्पादनाची पद्धती आणि त्याकरिता निर्माण झालेले सामाजिक संबंध वा वर्गविभाग होत. इतिहासाच्या परिणतिक्रमामध्ये जो कालखंड अथवा युग समाजवादाच्या स्थापनेस अनुकूल असेल, त्याच कालखंडात वा युगात समाजवादी समाजरचना अस्तित्वात येऊ शकेल अन्यथा हा ध्येयवाद केवळ यूटोपियन म्हणजे कल्पनारम्य ठरून कल्पनेतच राहणार वास्तवात येणार नाही. माणसांच्या ध्येयवादी प्रयत्नांतून आर्थिक समाजरचना विशिष्ट अवस्थेस म्हणजे भांडवलशाहीप्रधान अवस्थेस पोहोचल्याशिवाय समाजवादी क्रांती होऊच शकत नाही. ऐतिहासिक क्रम हा अपरिहार्य असतो. हा कार्यकारणभावाचा क्रम असतो. कार्यकारणभावाचा नियम हा अपरिहार्य रीतीने विश्वात प्रभाव गाजवीत असतो.

एकोणिसावे शतक इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचे शतक होय. या तत्त्वज्ञानाप्रमाणे मानवी इतिहास हा प्रगतीचा इतिहास आहे आणि ही प्रगती अनिवार्यपणे किंवा अपरिहार्यपणे घडते, अशी श्रद्धा एकोणिसाव्या शतकात उत्पन्न झाली. प्रगती हा इतिहासाचा अपरिहार्य परिणाम आहे, हा विचार जर्मन तत्त्वज्ञ हेगेलने प्रथम प्रभावीपणे मांडला. कार्ल मार्क्स हा हेगेलचाच अनुयायी होय. ऐतिहासिक प्रगतीची शक्ती विश्वाचे अद्वैत तत्त्व चैतन्य शक्ती होय. त्या चैतन्य शक्तीचा अपरिहार्यपणे विकास होत जात असतो, हाच इतिहास होय असे हेगेल मानत होता. मार्क्सने त्या चैतन्य शक्तीच्या ठिकाणी गतिशील जडद्रव्य (मॅटर) गृहीत धरले. त्याच्या मते मानवी इतिहासातील गतिशील जडद्रव्य म्हणजे अर्थोत्पादनपद्धती होय. ज्याप्रमाणे विश्वात त्याप्रमाणे मानवी समाजातही सतत बदल होत असतो समाजव्यवस्थेतील गुणात्मक बदल म्हणजे क्रांती होय. अर्थोत्पादनपद्धतीत मौलिक गुणात्मक बदल मानवी प्रयत्नांनी जेव्हा होतो, तेव्हा सामाजिक संबंध परिवर्तन पावून नवी समाजरचना उत्पन्न होते. ही नवी समाजरचना उत्पन्न होणे म्हणजे सामाजिक क्रांती होय. या क्रांतीची वा समाज परिवर्तनाची प्रेरक शक्ती वर्गविग्रह होय. खालच्या वर्गाचे आर्थिक शोषण हे त्याचे मूळ कारण होय. सर्व मानवी इतिहास हा वर्गविग्रहाचाच इतिहास होय. प्रत्येक सामाजिक क्रांतीचे युग नव्या प्रगतिशील विशिष्ट वर्गाच्या यशस्वी उठावाचेच फल होय.

यूरोपात औद्योगिक क्रांती विज्ञानाच्या आधारावर अठराव्या शतकात सुरू होऊन एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रौढावस्थेस आली, ती प्रथम ब्रिटनमध्ये. तिचे अध्ययन व पृथक्करण मार्क्सने करून असा सिद्धांत मांडला की, औद्योगिक क्रांतीमध्ये जो वर्ग पुढाकार घेऊन राजकीय सत्ताधारी झाला, तो भांडवलशाही वर्ग होय. प्राथमिक साम्यवादी समाजरचना नष्ट झाल्यानंतर ज्या ज्या समाजरचना पहिली जाऊन दुसरी अशा क्रमाने अस्तित्वात आल्या, त्यांच्यामध्ये वरिष्ठ वर्ग व कनिष्ठ वर्ग असे भाग नियमाने पडत गेले. त्याप्रमाणे वर्तमान भांडवलशाही समाजरचनेमध्येही मुख्यतः दोन वर्गांचा संघर्ष सुरू आहे ते वर्ग म्हणजे भांडवलशाही वर्ग व कामगारवर्ग होय. भांडवलशाही समाजरचना वा वर्गविषयक सामाजिक संबंध हे नफ्याच्या उद्देशाने उत्पादन वाढीला पायबंद घालू लागले, म्हणजे वर्गविग्रह तीव्र होतो. सतत चालणारी आर्थिक उत्पादनवाढ सामाजिक स्वास्थ्याला आवश्यक असते. कामगारवर्ग हा प्रचंड प्रमाणात वाढत जातो, त्याची हलाखी वाढली म्हणजे भांडवलशाही समाजव्यवस्थेस तो वर्ग मारक होतो. एका बाजूला श्रीमंतांची श्रीमंती वाढत जाते व दुसऱ्या बाजूला कामगारांसह बहुजन समाज पिळला जातो व हलाखीत सापडतो अशा स्थितीत भांडवलशाही अर्थव्यवस्था नफेबाजीच्या बंधनात सापडते, त्यामुळे तिचा विकास एका विशिष्ट कालखंडात थांबतोतेव्हा कामगारवर्ग हा भांडवलशाही समाजरचना उलथून टाकून राज्यसत्ता काबीज करतो. हीच शेवटची क्रांती बहुजन समाजाची पहिली क्रांती होय.

राज्यसत्ता ही नेहमी वरिष्ठ वर्गाच्या हातातील दडपशाहीचे साधन असते. वर्गीय समाजरचनेस राज्यसत्तेची गरज असते. वरिष्ठ वर्गीय हितसंबंधाचे रक्षण आणि त्याबरोबर सामाजिक शांतता सांभाळणे, हे राज्यसंस्थेचे मुख्य कार्य असते. आर्थिक विषमता व वर्ग विषमता नष्ट करण्याकरिता कामगारवर्ग नवीनच काबीज केलेल्या राजकीय सत्तेचा उपयोग करतो व वर्गविहीन समाजरचना उभारून समाजवादाची स्थापना करतो. समाजवाद म्हणजे मुख्यतः आर्थिक उत्पादनाच्या साधनांवरील खाजगी वैयक्तिक मालकी नष्ट करून ती साधने समाजाच्या हिताकरिता समाजाच्या मालकीची करणे होय. समाजवादाची अशी अपरिहार्यपणे स्थापना झाल्यावर व्यक्तिस्वातंत्र्याच्या युगाचा उदय होतो. दडपशाही करणारी राज्यसत्ता कार्य संपल्यामुळे आपोआप विराम पावते त्यानंतर साम्यवादाचे अंतिम युग स्थापित होते. हीच मार्क्सच्या मते अखेरची ऐतिहासिक क्रांती होय.

मार्क्सवादाच्या प्रभावाखाली पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस ⇨लेनिनच्या (१८७० १९२४) नेतृत्वाखाली रशियात समाजवादी क्रांती घडून आली परंतु ही क्रांती रशियातील भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या आधारावर नीटपणे उभारली जाण्यापूर्वीच घडून आली. मार्क्सच्या समाजवादी क्रांतीचे अधिष्ठान म्हणजे पूर्णतेस पावलेली भांडवलशाही निष्ठ औद्योगिक क्रांती होय. उलट, रशियन क्रांतीत हे अधिष्ठान तयार नव्हते, तेव्हा सरंजामशाहीचे व भांडवलशाहीचे अर्धवट संमिश्रण असलेल्या अतएव मागासलेल्या रशियन समाजात ती घडून आली. झारच्या राजवटीत शासकीय भांडवलशाहीचा पाया घातला तेव्हा खाजगी भांडवलशाहीला प्रगल्भ रूप आले नव्हते. औद्योगिक क्रांतीचा कार्यक्रम राजकीय क्रांतीनंतरच अनेक पंचवार्षिक योजनांच्या स्वरूपात शासनातर्फेच अंमलात आला.

ही क्रांती मार्क्सने वर्तविलेल्या अपरिहार्य परिणतीच्या सिद्धांताच्या कसोटीस उतरत नाही. तिच्यात (व्हॉलंटरिझम) नेत्याच्या स्वतंत्र ऐच्छिकतेचा भाग मोठा आहे. लेनिनने एक प्रकारची रणनीती अवलंबिली म्हणूनच ती क्रांती घडून आली. वैज्ञानिक समाजवादाचा दृष्टिकोण तीत आढळत नाही. लेनिनने आपला क्रांतीचा कार्यक्रम मार्क्सवादी ध्येयाच्या प्रेरणेने आखला, तरी तो उक्त मार्क्सवादाशी न जुळणारा असा होता. ही क्रांती बोल्शेव्हिक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली झाली व त्याच पक्षाच्या हाती सत्ता कायम केंद्रित झाली. कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली ही क्रांती झाली नाही. मागास कामगारवर्ग व पीडित शेतकरीवर्ग यांचा पाठिंबा मात्र तीस होता. लेनिनचे समाजवादी क्रांतीच्या ध्येयाने प्रेरित असे शिक्षित क्रांतिकारकांचे संघटित दल म्हणजे पक्ष, या क्रांतीचे मुख्य साधन बनला. ऐतिहासिक अपरिहार्यतेचा नियम या रशियन क्रांतीला जसा लागू पडत नाही, तसाच त्यानंतरच्या मार्क्सवादी चिनी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या लाल चीनच्या क्रांतीलाही लागू पडत नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिष्ठित किंवा व्यक्तिस्वातंत्र्याचा संपूर्ण आविष्कार असणारी, मार्क्सने कल्पिलेली समाजवादी क्रांती अजून कोठेच अस्तित्वात आलेली नाही. रशियन राज्यक्रांतीपासून आतापर्यंत घडून आलेल्या समाजवादी क्रांतीच्या जगात एकपक्षीय राज्यसत्ताच सर्व सामर्थ्यानिशी नांदत आहेत.

मार्क्सवादामध्ये जागतिक समाजवादी क्रांतीचे ध्येय हे मुख्य ध्येय मानले आहे, ते सर्व मार्क्सवादी पक्षांचे ध्येय असावयास पाहिजे परंतु आता मार्क्सवादाच्या प्रभावाखाली समाजवादी क्रांती झालेली सगळी राष्ट्रे, ही राष्ट्रवादी बनून संकुचित आंतरराष्ट्रीय राजकारणात गुरफटल्यामुळे त्यांच्यात आपापसांत फूट पडून प्रखर विरोध उत्पन्न झाला आहे. हल्ली सुरू असलेला रशिया व चीन यांच्यातील बेबनाव हे त्याचे मुख्य उदाहरण होय. मार्क्सचे जागतिक समाजवादी क्रांतीचे ध्येय अत्यंत दुरावले आहे. जागतिक क्रांती हे निरंतर विश्वशांतीचे युग निर्माण करील, हा आशावादही त्याबरोबर आता फार दुरावला आहे परंतु आजच्या अणुबाँबच्या युगात ते सर्वांत आवश्यक असलेले असे, पृथ्वीवरील मानव जातीच्या अस्तित्वास अत्यंत आवश्यक असलेले असे, ध्येय होय.

पहा : अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध ट्रॉट्स्की, लीअन फ्रेंच राज्यक्रांति बकून्यिन, म्यिकईल बोल्शेव्हिझम मार्क्सवाद मूलभूत अधिकार यूटोपियावाद रशियन राज्यक्रांति लोकशाही समाजवाद साम्यवाद स्टालिन, जोसेफ.

संदर्भ : 1. Arendt, Hannah, On Revolution, New York, 1963.

2. Black, C. E. Thornotn, T. P. Ed. Communism and Revolution, Princeton, 1971.

3. Brinton, C. C. The Anatomy of Revolution, Englewood Cliffs, 1952.

4. Burke, Edmund, Reflection on the Revolution in France, and on the Proceedings in Certain Societies in 

                 London Relative to That Event, New York, 1960.

5. Friedrich, C. J. Ed. Revolution, New York, 1966.

6. Marx, Karl Engels, Friedrich Trans. Moore, Samuel, The communist Manifesto, Baltimore, 1967.

7. Paine, Thomas, The Rights of Man, New York, 1951.

जोशी, लक्ष्मणशास्त्री