सालाझार, अँतॉन्यू द : (२८ एप्रिल १८८९–२७ जुलै १९७०).पोर्तुगालचा दीर्घकाळ पंतप्रधान (१९३२–६८) आणि नवनिर्मित राज्यसंस्थेचा शिल्पकार. त्याचा जन्म सधन घराण्यात अँतॉन्यू द ऑलिव्हिरा व मारिआ दो रेस्गेट सालाझार या दांपत्यापोटी लिस्बन जिल्ह्यातील व्हीमरू या खेड्यात झाला. त्याचे प्रारंभीचे शिक्षण व्हिझेऊच्या रोमन कॅथलिक पाठशाळेत झाले. नंतर त्याने कोईंब्रा विद्यापीठातून कायदा या विषयात पदवी अँतॉन्यू द सालाझारमिळवली (१९१४) व तेथेच अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. अध्यापन करीत असतानाच त्याने कॅथलिक पक्षाच्या स्थापनेत (१९२१) मदत केली. त्याच वर्षी तो संसदेवर (कॉर्टेझ) निवडून आला परंतु एका अधिवेशनानंतर तो पुन्हा विद्यापीठात अध्यापनाच्या व्यवसायात रुजू झाला. लष्कराने १९२६ मध्ये क्रांती करून जनरल अँतॉन्यू कर्मोना राष्ट्राध्यक्ष झाला व त्याने लष्करी हुकूमशाही जारी केली, तेव्हा सालाझारला अर्थमंत्र्याचे पद देऊ केले पण त्याच्या अटी अमान्य झाल्यामुळे तो पुन्हा शिक्षकी पेशातच रमला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जनरल अँतॉन्यू ऑस्कर द फ्रॅगोसो कर्मोना याने त्याच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्व बाबी सुपूर्त केल्या (१९२८). त्याने परंपरागत अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल करून शासकीय तिजोरीत लक्षणीय अर्थसंचय केला. या पैशाचा अनेक विकासकामांसाठी उपयोग झाला. कर्मोनाने त्याची ५ जुलै १९३२ रोजी पंतप्रधानपदी नियुक्ती केली. दीर्घकाळ तो या पदावर होता. पोर्तुगालमधील एक लोहपुरुष म्हणून त्याची प्रसिद्घी झाली. लवकरच तो पोर्तुगालचा सर्वाधिकारी झाला.

सालाझारने पोर्तुगालसाठी नवीन संविधान बनविले (१९३३). त्यानुसार राष्ट्रीय संसदेचे सभासद ब्लॉक यादीतून निवडण्यात येऊ लागले. तो स्वतःच आपल्या मंत्र्यांची निवड करीत असे. या नव्या संविधानानुसार पोर्तुगाल हे श्रेणीसत्ताक राज्य (कॉर्पोरेटिव्ह स्टेट) झाले. या संविधानात पोर्तुगीज वसाहती या पोर्तुगालच्या साम्राज्याच्या अविभाज्य घटक आहेत, अशी धारणा होती. त्यामुळे सालाझारने त्यांना स्वातंत्र्य देण्याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळे अंगोला, मोझँबीक, गिनी, गोवा (भारत) आदी पोर्तुगीज वसाहतींत सालाझारविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध झाले. देशांतर्गत त्याने भाषण, मुद्रण यांवर नियंत्रणे आणली आणि आर्थिक बाबींवर कडक निर्बंध लादले. पुढे सालाझारकडे परराष्ट्रमंत्रिपदही आले.

स्पेनच्या यादवी युद्घकाळात सालाझारने जनरल फ्रँकोच्या पक्षाला मदत केली. त्यामुळे स्पेनशी पोर्तुगालचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले . दुसऱ्या महायुद्घात प्रारंभी पोर्तुगाल तटस्थ होता परंतु दोस्त राष्ट्रांची सरशी झाल्यानंतर सालाझारने इंग्लंड-अमेरिका यांना सांता मारिआ आदी बेटांवर हवाई व नाविक तळ बांधण्यास अनुमती दिली. युद्घोत्तर काळात सालाझारने नाटो संघटनेत स्थान मिळविले (१९४९) तसेच यूरोपीय खुल्या व्यापार संघटनेत पोर्तुगालला स्थान मिळवून दिले (१९६०) मात्र १९५५ पर्यंत संयुक्त राष्ट्रे या संघटनेत रशियाच्या विरोधामुळे पोर्तुगालला स्थान मिळाले नव्हते. या काळात त्याने रेल्वे, रस्ते, व्यापारी जहाजे आदींची निर्मिती करून राष्ट्रीय हवाई वाहतुकीस चालना दिली. सर्व देशांत खेडोपाडी विद्युतीकरण केले आणि ग्रामीण भागात विद्यालये काढली तथापि तो आपल्या कॉर्पोरेटिव्ह स्टेट या घटनेला चिकटून राहिल्यामुळे त्याच्या हुकूमशाही वसाहतीकरणाच्या धोरणास सोव्हिएट रशिया, अमेरिकादी राष्ट्रांनी नापसंती दर्शविली.

त्याला १९६८ मध्ये मेंदूत रक्तस्राव झाला.यातून तो सावरला नाही. अखेर त्यातच त्याचे लिस्बन येथे निधन झाले. त्याचे खासगी जीवन काटकसरीचे होते. तो जाहीर सभा-समारंभांना जात नसे. त्याने देश सोडून बाहेरचा एकही दौरा केला नाही.

संदर्भ : 1. Clarence-Smith, Gervase, The Third Portuguese Empire : 1825–1975, Longwood, 1986.

2. Derrick, Michael, The Portugal of Salazar, Ayer, 1972.

3. Fryer, Peter Pinheiro, P. M. Oldest Ally : A Portrait of Salazar’s Portugal, Greenwood, 1981.

4. Gallagher, Tom, Portugal : A Twentieth Century Interpretation, Longwood, 1982.

देशपांडे, सु. र.