जोसेफ मॅझिनी मॅझिनी, जोसेफ : (२२ जून १८०५–१० मार्च १८७२). एक इटालियन देशभक्त, लेखक आणि लोकशाही राष्ट्रवादाचा व मानवी मूलभूत मूल्यांचा प्रवक्ता. राष्ट्रवादाकरिता जीवनभर लढणारा व एकोणिसाव्या शतकातील यूरोपला क्रांतिकारक प्रेरणा देणारा महान क्रांतिकारक म्हणून यूरोपच्या इतिहासात त्याला अविस्मरणीय स्थान प्राप्त झाले आहे.

जन्म इटलीतील जेनोआ (पीडमाँट) येथे. जोसेफचे वडील वैद्यकी व अध्यापनाचा व्यवसायही करीत. बालवयात जोसेफला वाचनाचा छंद लागला. प्रकृतीची साथ नसतानाही त्याने जेनोआ विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली (१८२७) आणि वकिली व्यावसायात पदार्पण केले. विद्यार्थिदशेत वृत्तपत्रांतून तो निबंध व पुस्तकपरीक्षणे लिहीत असे. इटलीला ऑस्ट्रियन साम्राज्यशाहीतून मुक्त करण्याकरिता १८३० च्या सुमारास कार्बोनारी या गुप्तसंघटनेत तो सामील झाला. राजद्रोही म्हणून त्यास साव्होना तुरुंगात काही महिने डांबण्यात आले तथापि पुराव्याअभावी त्याची सशर्त सुटका करण्यात आली (१८३१). मॅझिनीचे उर्वरित बहुतेक आयुष्य हद्दपारीत फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड आदी देशांत गेले आणि तेथूनच त्याने इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यास सर्वतोपरी साहाय्य केले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लाँबर्डी, व्हिनीशिया हे इटालियन प्रदेश ऑस्ट्रियाच्या ताब्यात होते. त्याखेरीज पार्मा, तस्कनी वगैरे प्रदेशांवर ऑस्ट्रियन राजघराण्यातील लोकांचेच राज्य होते. फक्त पीडमाँट हाच प्रदेश इटालियन राजघराण्याकडे होता. देश वेगवेगळ्या राज्यांच्या नियंत्रणाखाली आणि राजेशाहीच्या अंमलाखाली असल्यामुळे देशात राजकीय जागृती फारशी झाली नव्हती. अशा परिस्थितीत त्याने साव्होनाच्या तुरुंगात असतानाच आपल्या जीवनाचे ध्येय-धोरण निश्चित केले व देशाबाहेर मार्से (फ्रान्स) येथे हद्दपारीत राहण्याचे ठरविले.

मार्सेला गेल्यानंतर त्याने नुकत्याच गादीवर आलेल्या पीडमाँटच्या चार्ल्स अल्बर्ट (कार. १८३१–४८) राजाला जाहीर पत्राद्वारे अशी विनंती केली की, पीडमाँटला संवैधानिक शासन द्यावे आणि इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यात पुढाकार घेऊन लाँबर्डी-व्हिनीशियातील ऑस्ट्रियनांना हाकलून द्यावे परंतु त्यावर अल्बर्टची प्रतिक्रिया मॅझिनीला अटक करावी अशी झाली. दरम्यान मार्सेच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात परकीय सत्तेपासून तसेच अंतर्गत जुलूमांपासून स्वतंत्र व लोकशाही राष्ट्र म्हणून संयुक्त इटलीच्या स्थापनेसाठी त्याने सरहद्दीतील बहुतेक इटालियन नागारिकांना संघटित करून ‘यंग इटली’ ही कार्बोनारीपेक्षा जहाल क्रांतिकारक संघटना स्थापन केली. यंग इटलीच्या शाखोपशाखा जेनोआ व इतर शहरांतून कार्यरत झाल्या. तरुणांवर या संस्थेने तत्काळ छाप पाडली. १८३३ च्या सुमारास या संस्थेचे सु. ६०,००० अनुयायी होते. जनमानसावर यंग इटलीचा फार परिणाम झाला. पीडमाँटच्या लष्करात बंड उभारण्याची अयशस्वी प्रयत्न झाला (१८३३). त्यात त्याचा सहभाग होता. असाच प्रयत्न जेनोआ व इतरत्र झाला पण तोही फसला. याच काळात मोदीना प्रांतातील ज्यूदीता सिदोली या हद्दपारीतील देखण्या विधवा स्त्रीवर त्याचे प्रेम जडले. अल्बर्टच्या विनंतीनुसार फ्रेंच सरकारने त्याला मार्से सोडण्यास सांगितले, तेव्हा स्वित्झर्लंडला त्यांने तिच्यासह प्रयाण केले, पुढे या संबंधांबाबत फार चर्चा झाली आणि मॅझिनीला मनस्तापही झाला. १८३७ मध्ये ज्यूदीता इटलीत मुलांकडे परत गेली. अखेरपर्यंत तो अविवाहित राहिला.

त्याने जर्मनी, पोलंड व इटली यांतील हद्दपारीत असणाऱ्‍या सर्वांचे १८३४ मध्ये एक लढऊ पथक बनवून इटलीवरील परकीय सत्तेवर हल्ला केला पण अंतःकलहामुळे तो अयशस्वी झाला. या कृत्याबद्दल त्याच्या पाठीमागे त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याने यंग इटलीच्या धर्तीवर यंग यूरोप, यंग स्वित्झर्लंड, यंग जर्मनी, यंग पोलंड अशा गुप्तसंघटना संघटित केल्या. जगातील सर्व राष्ट्रांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याचा ईश्वरदत्त हक्क आहे, या तत्त्वाच्या प्रस्थापनेकरिता या क्रांतिकारी गुप्तसंघटना त्याने उभारल्या. तो काही इटालियन मित्रांना घेऊन (१८३७) लंडनमध्ये राहू लागला. त्याने इंग्रजी भाषा शिकून ब्रिटिश वस्तुसंग्रहालयातील वस्तूंचा अभ्यास केला आणि चरितार्थासाठी तो नियतकालिकांतून लिहू लागला. त्याने बायरन, गटे, कार्लाइल, दान्ते इत्यादींच्या साहित्यावर निबंध लिहिले. लंडनमध्ये त्याने इटालियन मुलांसाठी शाळा काढली. तसेच इटालियन मुलांवर होणारा जुलूम थांबविला. याच सुमारास त्याने Apostolato Popolare हे वर्तमानपत्र लंडनमध्ये सुरू केले. त्यातून ‘मानवी हक्क’ हा निबंध क्रमशः प्रसिद्ध केला (१८४०). या काळात अविश्रांत पत्रव्यवहार करून त्याने अनेक राजकीय व साहित्यिक मित्र मिळविले. अशूर्स्ट या उदारमतवादी कुटुंबाशी त्याचे घनिष्ठ संबंध आले. पुढे त्याने पीपल्स इंटरनॅशनल लीग ही संस्था स्थापन केली (१८४७).

चार्ल्स ॲल्बर्टने ऑस्ट्रियाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू केले. तेव्हा तो लंडनहून इटालीत दाखल झाला (१८४८). या स्वातंत्र्य लढ्यात गॅरिबाल्डीच्या नेतृत्वाखाली त्याने युद्धात भाग घेतला. तस्कनीमध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली व गॅरिबाल्डी मुख्यमंत्री झाला. मॅझिनीची त्रिसदस्य समितीत नियुक्ती झाली. नंतर रोममध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर तेथे त्याची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. अल्पजीवी प्रशासकीय कारकीर्दीत त्याने शेतकऱ्‍यांवरील करभार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि काही सुधारणा केल्या तसेच सुव्यवस्था आणि शांतता शहरात राखली परंतु फ्रेंचांनी रोम पादाक्रांत करताच त्याने पुन्हा लंडनचा आश्रय घेतला. मध्यंतरी मिलान व मेसीना येथील अयशस्वी बंडांत त्याने बंडवाल्यांना मार्गदर्शन केले. १८५७ मध्ये पुन्हा तो जेनोआ व नेपल्स येथील उठावांना मदत करण्यासाठी इटलीत आला पण अयशस्वी झाला. या बंडांच्या कटात त्याचा हात आहे, म्हणून सरकारने त्याला फाशीची शिक्षा फर्माविली. तेव्हा तो इंग्लंडला पळून गेला. या सुमारास फ्रँको-पीडमाँट यांच्या संयुक्त फौजांनी ऑस्ट्रियाविरुद्ध काव्हूरच्या मदतीने युद्ध सुरू केले (१८५९). त्यात मॅझिनी नव्हता. नंतर तो इटलीत गेला. इटलीच्या संसदेवर त्याची प्रतिनिधी म्हणून निवड झाली परंतु राजेशाहीला एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यास त्याने नकार दिला.


मॅझिनीचे उर्वरित आयुष्य निराशेत आणि मानवतावादाचा प्रसार व प्रचारकार्यात व्यतीत झाले. त्याच्या उत्तरायुष्यात इटलीचे एकत्रीकरण होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. व्हेनिस (१८६६) आणि रोम ही शहरे इटलीत समाविष्ट झाली तथापि मॅझिनीला अभिप्रेत असलेल्या प्रजासत्ताकाऐवजी तेथे राजेशाही आली. म्हणून तो म्हणत असे, की ‘मला वाटले, मी इटलीचा आत्मा जागृत करीत होतो आणि समोर दिसते ते केवळ केलवरच!’ मार्क्स व बकून्यिन यांच्याशी त्याचा संबंध आला परंतु इटलीतल्या कामगारांचे संघटन करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अराजकतावादाची कल्पना त्याला मान्य नव्हती. पीसा येथे तो प्ल्युरसीच्या रोगाने मरण पावला.

मॅझिनीच्या कर्तृत्वाविषयी उलटसुलट मते आहेत. ऐन तारुण्यात त्याला विलक्षण लोकप्रियता लाभली परंतु त्याचेच एके काळचे सहकारी पुढे त्याला इटलीचा शत्रू मानू लागले. विसाव्या शतकातील काही इतिहासकार त्याचे सक्रिय जीवन १८४९ मध्येच संपले असे मानतात. त्यानंतर त्याने सशस्त्र क्रांतीतून अंग काढून घ्यावयास पाहिजे होते, अशी टीका करतात तथापि इटलीचे स्वातंत्र्य आणि एकीकरण यांत त्याचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक इटलीच्या स्वातंत्र्याचा उद्‌गाता म्हणून इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे.

मॅझिनीने विपुल स्फुटलेखन व पत्रलेखन केले. जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ध्येयांचा प्रचार करण्यासाठी त्याने अनेक वृत्तपत्रे चालविली. ‘यंग इटली’ च्या काळात त्याने जिओव्हिने इटालिया हे वृत्तपत्र सुरू केले होते. १८३७ ते १८४८ ह्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या पहिल्या काळात त्याने Apostolato Popolare हे वृत्तपत्र तेथून चालविले. १८५८ मध्ये त्याने Pensiero ed Azione हे नियतकालिक सुरू केले होते. अखेरच्या दिवसात त्याने रोम देल पोपोलो हे वर्तमानपत्र रोममधून चालविले. त्याचे बहुतेक लेख वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून प्रसिद्ध झाले. ग्रंथ रूपाने मानवी हक्क (१८५८) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याचे समग्र लेखन शंभर खंडांत (१९०६–४३) नंतर प्रसिद्ध झाले. मॅझिनीच्या विचारांमध्ये राष्ट्रवादाबरोबरच उदारमतवादी लोकशाहीचा आग्रह दिसून येतो. परंतु त्याचे आकर्षण पुढील काळातील राष्ट्रवाद्यांना वाटले ते मुख्यतः त्याच्या गुप्त, क्रांतिकारक मार्गामुळे. स्वातंत्र्य आणि ऐक्य यांच्यासाठी सशस्त्र क्रांती करणाऱ्या, गुप्तसंघटना असाव्यात, ह्या बाबतीत भारतातील सशस्त्र क्रांतिकारक त्याला आदर्श मानीत. मुख्यतः सावरकरसंप्रदायाच्या जहाल राष्ट्रवाद्यांवर मॅझिनीच्या राष्ट्रवादी विचारसरणीचा आणि मार्गाचा प्रभाव पडलेला दिसतो.

संदर्भ : 1. Griffith, G. O. Mazzini: Prophet of Modern Europe, New York, 1970.

            2. Hinkley, Edyth, Mazzini: A Story of a Great Italian, New York, 1970.

            3. Salvemini, Gaetano, Mazzini, Stanford, 1957.

            ४. सावरकर, वि. दा. भाषां. मॅझिनीचे आत्मचरित्र, पुणे, १९४६

देशपांडे, सु. र.