होरेशो नेल्सन

नेल्सन, होरेशो : (२९ सप्टेंबर १७५८–२१ ऑक्टोबर १८०५). इंग्लंडच्या नौदलातील एक प्रमुख सेनानी आणि ट्रफॅल्गरच्या लढाईतील यशस्वी सूत्रधार. त्याचा जन्म सधन कुटुंबात बर्नाम थॉर्प (नॉरफॉक) या ठिकाणी झाला. त्याचे वडील एडमंड नेल्सन हे चर्चचे कुलमंत्री (रेक्टर) होते, तर आई कॅथरिन पंतप्रधान वॉलपोलच्या घराण्यातील होती. अशक्त प्रकृतीमुळे त्याचे फारसे शिक्षण झाले नाही परंतु त्याचा मामा कॅप्टन मॉरिस सकलिंग याच्यामुळे त्यास दर्यावर्दी जीवनाची गोडी निर्माण झाली. सकलिंगने त्यास विविध लढाऊ नौकांतून आपल्याबरोबर हिंडविले. वयाच्या बाराव्या वर्षी तो रॉयल नाविकदलात दाखल झाला व विसाव्या वर्षी कॅप्टन हा हुद्दा मिळवून बाहेर पडला. त्याने आरमारात लवकरच नाव मिळविले. अडचणींतून मार्ग काढला पाहिजे, या त्याच्या धोरणामुळे त्यास स्वतंत्र युद्धनौकेचे नेतृत्व मिळाले. नपोलियन बरोबरच्या युद्धांमध्ये त्याला आपले नौदलातील कौशल्य प्रकट करण्याची संधी लाभली. तत्पूर्वी त्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी भाग घेतला होताच. या सुमारास वेस्ट इंडीजमधील फ्रान्सिस निझबेट या तरुण विधवेशी त्याचा परिचय झाला व त्याची परिणती पुढे विवाहात झाली (१७८७). यानंतर त्यास जवळजवळ सहा वर्ष बेकारीत काढावी लागली आणि इंग्लंडची फ्रेंचांबरोबर युद्धे सुरू होताच तो पुन्हा नौदलात दाखल झाला.

त्याच्या दर्यावर्दी जीवनास खरी सुरुवात १७९३ मध्ये झाली व ॲगमेम्‌नॉन या युद्धनौकेवर त्याची नियुक्ती झाली आणि तो कार्सिकन समुद्रात लढण्यासाठी दाखल झाला. काल्व्ही येथील युद्धात त्याचा उजवा डोळा निकामी झाला (१७९३). पुढे १७९६ मध्ये फ्रेंच आरमारास हैराण करण्यासाठी कॅप्टन या नौकेवर त्याची सर जॉन जारव्हिस याच्या हाताखाली नेमणूक झाली. सेंट व्हिन्सेंट येथील नाविक लढाईत त्याने धाडस व पराक्रम दाखविला आणि स्पॅनिश आरामाचा पूर्ण धुव्वा उडविला. या त्याच्या कामगिरीबद्दल त्यास‘नाइटहुड’– सरदारकी देण्यात आली (१७९७).यानंतर पुढील वर्षी त्याने १ ऑगस्ट १७९८ रोजी नाईल नदीच्या मुखाजवळ फ्रेंच आरमारावर हल्ला करून विजय मिळविला. या विजयामुळे त्यास बॅरन ऑफ नाईल हा किताब मिळाला पण तत्पूर्वी कानेरी बेटांतील सांताक्रूझ द तेनेरीफ येथे त्याचा पराभव झाला होता आणि त्यात त्याचा उजवा हात निकामी झाला. त्याच्या जीवनातील हा एकमेव पराभव होता.

बाल्टिक समुद्रात इंग्रजी आरामाराच्या हालचालींमुळे आपल्या व्यापारात अडथळे निर्माण होतात, म्हणून डेन्मार्क, स्वीडन व रशिया यांनी इंग्लंडविरुद्ध एक संघ निर्माण केला (१८००). त्याचा मोड करण्यासाठी सर हाइड पार्कर याच्या नेतृत्वाखाली इंग्रजी नौदलाने कोपनहेगनवर स्वारी केली (१८०१). युद्ध आटोक्यात येत नाही असे पाहून त्याने आपल्या सैन्यास मागे परतण्याचा इशारा दिला पण नेल्सनने उजवा डोळा अंध असल्यामुळे इशारा समजूनही न समजल्याचे दाखवून लढाई चालू ठेवली व डेन्मार्कच्या आरमाराचा धुव्वा उडविला. या युद्धापूर्वी त्यास व्हाइल ॲडमिरल हे पद देण्यात आले होते. इंग्लंडवर स्वारी करण्याकरिता नेपोलियन तूलाँ बंदरात अनेक युद्धनौकांची जुळवाजुळव केली. नेपोलियनची ही आरमार तयारी पूर्ण होऊ नये, म्हणून इंग्लंडने योग्यवेळी दखल घेतली आणि नेल्सनच्या नेतृत्वाखाली आरमार धाडले (१८०३). इंग्लंडने पूर्वीचा १८०२ चा आम्येंचा तह बाजूला ठेऊन युद्ध पुकारले. नेल्सनने शत्रूच्या बंदरांपाशी नौका ठेवल्यामुळे फ्रेंच आरमाराची नाकेबंदी झाली तरी फ्रेंच दर्यासारंग व्हिलनव्ह इंग्रजांना चकवून वेस्ट इंडीजपर्यंत गेला. लढण्याची संधी हुकली म्हणून नेल्सन निराश झाला. त्याने व्हिक्टरी या नौकेचे नेतृत्व आपणाकडे घेऊन रॉयल सॉव्हरिन या नौकेचे नेतृत्व कॅथबर्ट कॉलिंगवुड याचेकडे दिले. २१ ऑक्टोबर १८०५ रोजी नेल्सनने ट्रफॅल्गरजवळ त्याच्याशी लढत दिली व फ्रेंचांचा पूर्ण पराभव केला. फ्रेंचांची वीस जहाजे इंग्रजांना मिळाली, त्यांपैकी एक निकामी झाले होते. लढताना नेल्सनला गोळी लागली पण विजयाची वार्ता ऐकून नंतर त्याचे प्राणोत्क्रमण झाले.या युद्धामुळे नेपोलियनच्या सागरी कारवायांस कायमची तिलांजली मिळाली व इंग्लंडचे सागरी वर्चस्व प्रस्थापित झाले.

नेल्सनचे बहुतेक आयुष्य समुद्रावर नौकांतून विहार करण्यात गेले. यामुळे तो कौटुंबिक जीवनापासून काहीसा अलिप्त राहिला. तशातच त्याची मैत्री नेपल्स येथील ब्रिटिश राजदूत सर विल्यम हॅमिल्टन व त्याची देखणी पत्नी एमा हॅमिल्टन यांच्याशी झाली. या मैत्रीतून पुढे एमा हॅमिल्टन व नेल्सन यांचे प्रेमप्रकरण उद्‌भवले. एमा हॅमिल्टनविषयी अनेक मनोरंजक कथा प्रचलित आहेत आणि त्या वेळी हे प्रेमप्रकरण इंग्लंडमध्ये फार गाजले होते. नेल्सनने फ्रान्सिस निझबेट या आपल्या पत्नीला घटस्फोट दिला (१८०१). विल्यम हॅमिल्टनच्या मृत्यूनंतर एमा नेल्सनकडेच राही. तिला नेल्सनपासून होरेशिया नावाची मुलगी झाली. मृत्यूसमयी नेल्सनने एमाची काळजी घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.

इंग्लंडच्या नौदलाच्या इतिहासात तसेच जनमानसात नेल्सनला फार मानाचे स्थान आहे. त्याच्या नौदलातील कामगिरीच्या स्मरणार्थ लंडनच्या ट्रफॅल्गर चौकात त्याचा पुतळा उभारण्यात आला.

पहा : ट्रफॅल्गरची लढाई.

संदर्भ : 1. Bennet, G. M. Nelson the Commander, New York, 1972.

           2. Mahan, A. T., Ed. The Life on Nelson : the Embodiment of the Sea Power of Great Britain, London, 1968.

           3. Marcus, G. J. The Age of Nelson : the Royal Navy, London, 1972.

 

देशपांडे, सु. र.