ॲतनची सहकुटूंब आराधना करणाऱ्या आक्नाननची शिल्पाकृती

आक्नातन : (सु. १३९२ ? — १३६२ इ.स.पू.). प्राचीन ईजिप्तच्या १८ व्या वंशातील दहावा फेअरो. तो आकेनातन, इक्नातन, आमेनहोतेप (चौथा), ॲमिनोफिस इ. नावांनी इतिहासात प्रसिद्ध आहे. तिसरा आमेनहोतेप व त्याची राणी ती ह्यांचा हा मुलगा. १३७९—१३६२ इ.स.पू. ह्या काळात त्याने ईजिप्तवर राज्य केले. गादीवर येण्यापूर्वी त्याचे नाव ‘आमेनहोतेप (चौथा)’ असे होते परंतु सूर्यदेवतेवरील (ॲतॉन) आपल्या अपरिमित भक्तीमुळे ‘आक्नातन’ म्हणजे ‘ॲताॅनला संतुष्ट करणारा ’ हे नाव त्याने धारण केले. त्याच्या कारकीर्दीत राज्यविस्तार न होता राज्यसंकोच झाला तथापि त्याच्या धार्मिक धोरणामुळे ईजिप्तच्या इतिहासात त्यास वैशिष्ट‌्यपूर्ण स्थान प्राप्त झाले. गादीवर अाल्यानंतर काही दिवसांतच त्याने पूर्वापार चालत आलेल्या ॲमन, रा व इतर देवदेवता यांची पूजाअर्चा बंद करून ‘ॲताॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूर्यदेवतेचा एकमेव ईश्वर म्हणून पुरस्कार व प्रचार केला आणि प्राचीन विविध देवदेवतांची मंदिरे वा स्मारके उद्‌ध्वस्त केली. अनेकदेवतावाद नष्ट करून एकेश्वरवादाचा पुरस्कार करण्यात, त्याच्या धार्मिक तत्त्वनिष्ठेचा वा श्रद्धेचा भाग जेवढा होता, तेवढाच राजकीय विचारसरणीचाही असावा. आतापर्यंत राजा हा ॲमन देवतेचा अग्रगण्य भक्त समजण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात तो परंपरागत पुरोहितवर्गाच्या हातातील बाहुलेच झाला होता. ही स्थिती नष्ट करून सम्राटाचे स्वातंत्र्य व स्थान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याने ह्या नव्या पंथाचा पुरस्कार केला. याच उद्देशाने त्याने पुरोहितवर्गाचा जोर व वर्चस्व असणाऱ्या थीब्झमधून आपली राजधानी आकेनातन, म्हणजेच हल्लीचे तेल-एल्-अमार्ना या नव्या वसविलेल्या शहरी हलविली. राजधानीतील सुंदर राजवाड्यांबरोबरच ॲताॅनचे खुले भव्य मंदिरही त्याने बांधले आणि त्यात प्रकाशझोत परावर्तित करणाऱ्या सूर्यदेवतेची भव्य प्रतिमा प्रतिष्ठित केली. तेल-एल्-अमार्ना येथील उत्खननात याचे अवशेष उपलब्ध झाले आहेत. आक्नातन ॲताॅनचे थोरपण पुढील शब्दांत सांगे : “ॲताॅनचे किरण सर्व पृथ्वी व्यापतात आणि पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांना जीवन देतात ॲताॅन हा सर्वश्रेष्ठ देव आहे. सर्वांनी त्याची पूजा करावी.” त्याच्या ह्या एकेश्वरवादामुळे समाजातील पुरोहितवर्गाचे वर्चस्व नष्ट झाले तसेच समाजातील इतर लहानसहान देवांचे अस्तित्व संपुष्टात आले आणि त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, चालीरीती व रूढी कमी  होऊ लागल्या. त्यामुळे साहजिकच समाजाच्या सर्व थरांतून त्यास गुप्तपणे विरोध होऊ लागला. मृत्यूसमयी त्याच्या साम्राज्यात फारच थोडे प्रदेश उरलेले होते.

खाजगी जीवनात तो अत्यंत असंतुष्ट होता. त्यास सहा मुलीच होत्या, त्यामुळे तो नाराज असे. त्याच्या नेफरतीती ह्या देखण्या पत्नीसंबंधीही अनेक मते प्रचलित आहेत. काही तज्ज्ञ तिला आक्नातनची बहीण मानतात, तर काही तज्ज्ञांच्या मते ती मितानियन या परकीय जमातीतील असावी. तथापि उपलब्ध शिल्पाकृतींत नेफरतीती व आक्नातन ह्या दोघांच्या चेहऱ्यांत विलक्षण साम्य आढळते. नेफरती पासून आपणास मुलगा होत नाही, म्हणून आक्नातनने तिला वेगळे होते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आक्नातन वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी मरण पावला आणि त्यानंतर त्याचा जावई तूतांखामेन ईजिप्तच्या गादीवर आला. त्याने लोकापवादास भिऊन पूर्वीचा धर्म स्वीकारला. त्यामुळे आक्नातनचा एकेश्वरवाद फार दिवस टिकला नाही.

पहा : ईजिप्त संस्कृति.

संदर्भ : Aldred, Cyril, Akhenaten, Pharaoh of Egypt: A New study, New York, 1969.

देशपांडे, सु. र.