बार्लो, सर हिलॅरो जॉर्ज : (? १७६२-? फेब्रुवारी १८४७). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील बंगालचा एक गव्हर्नर-जनरल (कार. ५ ऑक्टोबर १८०५-जुलै १८०७). त्याचा जन्म इंग्लंडमधील एका सधन घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव रॉबर्ट. ते नाविक दलात अधिकारी होते.

भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक सनदी नोकर म्हणून तो प्रथम कलकत्ता (बंगाल) येथे १७७९मध्ये आला. सुरुवातीची काही वर्षे त्याने गयाच्या जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली काम केले. महसूल खात्यात उपसचिव म्हणून काही वर्षे काम करून (१७८८-९६) व्यापारासंबंधी एक अहवाल तयार केला. नंतर तो त्याच खात्यात मुख्य सचिव झाला(१७९६). लवकरच कंपनीच्या सर्वोच्च मंडळाचे (सुप्रीम कौन्सिल) सभासदत्व त्यास देण्यात आले (१८०१). १८०३ मध्ये त्याला बॅरोनिट ही पदवी देण्यात आली.

गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली (कार. १७९८-जुलै १८०५) याच्यावेळी तो गव्हर्नर जनरलच्या मंडळात होता. पुढे त्याला या मंडळाच्या अध्यक्षपदाचा मानही मिळाला. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आकस्मिक मृत्यूमुळे बार्लोची हंगामी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली (५ ऑक्टोबर १८०५). बार्लोने राजकीय तटस्थतेचे कॉर्नवॉलिसचेच धोरण पुढे चालू ठेवले. त्यामुळे राजपुतान्यात मराठ्यांना म्हणजे शिंदे-होळकर यांना लूटालूट करण्याची आपोआपच संधी मिळाली. साहजिकच कंपनीची बदनामी होऊन इंग्लंडमध्ये यासंबंधीची तीव्र प्रतिक्रिया उमटली. याच्या कारकीर्दीत शिपायांच्या गणवेषात फेरफार करण्यात आले. कपाळावरील गंधास चाट देण्यात आली. तसेच डोक्यावरील पागोट्याचा आकार इंग्लिश टोपीसारखा झाला. आपल्याला ख्रिस्ती करणार, अशी शिपायांची समजूत झाली. वेल्लोरच्या किल्ल्यात टिपूची मुले होती. त्यांनीही बंडखोरांना दुजोरा दिला आणि हिंदी शिपायांचे बंड उद् भवले (१० जूलै १८०६). बरेचसे गोरे अधिकारी मारले गेले. शेवटी जनरल आर्. आर्. गिलेस्पीने बंड मोडून काढले.

यामुळे बार्लोची हंगामी गव्हर्नर जनरल म्हणून असलेली नेमणूक कंपनीने कायम न करता त्याऐवजी लॉर्ड मिंटो याची गव्हर्नर जनरलच्या जागी नेमणूक केली (१८०७). बार्लोच्या धोरणामुळे कंपनीच्या खर्चात बचत झाली, हे खरे परंतु त्यासाठी कंपनीच्या प्रतिष्ठेची किंमत द्यावी लागली. पुढे त्याची मद्रासचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८०७). त्याने मच्छलीपटम, मद्रास, श्रीरंगपटण, जालना इ. ठिकाणच्या वरिष्ठ अधिकारऱ्यांचे भत्ते बंद करून खर्चात कपात करण्याचा यत्न केला. त्यामुळे कंपनीच्या सैन्यात बेदिली उत्पन्न झाली आणि गव्हर्नर-जनरल मिंटोसह उच्च आधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. परिणामतः कंपनीने त्याला १८१२ मध्ये इंग्लंडला परत बोलाविले तथापि त्याच्या सेवेबद्दल त्यास वार्षिक १,२०० पौंडाचे निवृत्तिवेतन दिले. उर्वरित आयुष्य त्याने फारनम येथे ऐशआरामात घालविले. तेथेच तो मरण पावला.

संदर्भ : Stephen, Leslie Lee, Sidney, Ed. Dictionary of National Biography, Vol. 3,Oxford, 1970

शेख, रुक्साना