कोरीव काम केलेले ग्रीक योद्याचे हस्तिदंती शिरस्त्राण, इ. स. १३ वे शतक, मायसीनी.

 मायसीनी संस्कृति : उत्तर ब्रॉन्झ संस्कृतीची (इजिअन) ग्रीसमधील एक प्राचीन प्रौगैतिहासिक नगरी. या नगरीच्या नावामुळे या संस्कृतीला मायसीनी संस्कृती असे नामाभिधान रूढ झाले आहे. आर्गोलिस भागात आर्गॉस आखाताच्या उत्तरेस सु. १५ किमी. वर ते वसले आहे. पेलोपनिसस ते कॉरिंथ या मार्गावरील मायसीनी हा टेहळणीचा संरक्षक बालेकिल्ला होता. या संस्कृतीचा काळ पुरातत्त्वीय अवशेषांवरून सर्वसाधारणतः इ. स पू. १४५० ते ११०० असा मानण्यात येतो. होमरच्या इलियड या काव्यात मायसीनी या नगराचा अगमेग्‍नॉन याची राजधानी म्हणून उल्लेख आहे. पॉसेनिअस या दुसऱ्या शतकातील ग्रीक भूगोलज्ञाने डिस्क्रिप्शन ऑफ ग्रीस या ग्रंथात या शहराचे वर्णन दिले आहे. यांचा आधार घेऊन ⇨ हाइन्‍रिखश्लीमान ह्या पुरातत्त्वज्ञ-संशोधकाने १८७६–७८ दरम्यान येथे उत्खनन करून पाच थडग्यांचे अवशेष शोधून काढले. त्याच्या पाठोपाठ स्टामाटेकज हा ग्रीक संशोधक आला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश संशोधक अलन जे. बी. वेस याने या संशोधनास परिपूर्णता आणून प्राचीन मायसीनीचा इतिहास प्रसिद्ध केला. अकियन ग्रीकांचे हे मुख्य केंद्र असले, तरी या ठिकाणी इ. स. पू २९०० च्या आसपास ग्रीकेतर लोकांनी येथे प्रथम वसाहत केली. त्यांचे काही अश्मयुगीन व नवाश्मयुगीन अवशेष मिळाले परंतु या नगरीच्या प्रगतीला खरा आरंभ इ. स. पू. १८०० ते १७०० च्या सुमारास झाला. इ. स. पू १४०० मध्ये क्रीटमधल्या नॉससचा व पर्यायाने मिनोअन राजसत्तेचा विध्वंस झाला व त्यानंतर मायसीनी शहर भरभराटीस आले. यानंतर तीनशे वर्षांनी म्हणजे इ. स. पू.११०० च्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ व लुटालुट झाली. याला मुख्यत्वे ‘इजिअन स्थलांतरे’ नावाने ओळखली जाणारी जमातीची स्थित्यंतरे आणि नंतर आलेल्या डोरियन लोकांचे आक्रमण कारणीभूत झाले. या नगरात पुन्हा काहीशी वस्ती झाली परंतु त्यास गतवैभव प्राप्त झाले नाही. इ. स पू. ४७० मध्ये शेजारच्या अर्गीव्हीज सत्तेने मायसीनीची राखरांगोळी केली तथापि पुन्हा एकदा मायसीनीने डोके वर काढण्याचा प्रयत्न इ. स. पू. तिसऱ्या शतकात केला पण अखेर इ. स. दुसऱ्या शतकात तिचा पूर्ण नाश झाला.

शिकारीचे दृश्य, हस्तिदंती मंजूषेवरील कोरीव काम, इ. स. पू. १३ वे शतक, सायप्रस.

मायसीनी टेकडीच्या सगळ्यात उंच भागी दगडी तटबंदीने वेढलेला किल्ला आहे. त्याच्या पडझड झालेल्या भिंती, सिंहद्वार आणि दरवाजा इत्यादी वास्तू अद्यापि अवशिष्ट असून काही जडावाचे काम केलेली ब्राँझची हत्यारे आणि मृत्स्‍नाशिल्पे आढळली आहेत. किल्ल्याभोवती दाट लोकवस्तीचे शहर व किल्ल्यात राजाचा विस्तीर्ण प्रासाद असावा, असे इतर अवशेषांवरून दिसून येते. प्रासादातून हरतऱ्हेची दालने, राजसभा (मेगारा), अंतःपूर इत्यादींचे भाग दिसतात. त्यांच्या भिंतीवर चित्रकाम आढळते. वास्तूंच्या आणि इतर अवशेषांवरून होमरने या भूमीला दिलेले ‘सुवर्णभूमी’ हे नाव सार्थ ठरते. येथील थडग्यांचा वा समाध्यांचा समूह शॅफ्ट ग्रेव्हज या नावाने प्रसिद्ध असून थडग्यांची बांधणी मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे सर्वत्र आढळते. थडग्यांत सापडलेले बहुविध अवशेष तत्कालीन समाजाच्या समृद्धतेची साक्ष देतात. या अवशेषांपैकी एट्रीअसचे कोषगारसदृश थडगे )ट्रेझरी ऑफ एट्रीअस) आणि अगमेग्‍मॉनची पत्नी क्‍लायटम्‍नेस्ट्राची समाधी (टूम ऑफ क्‍लायटम्‍नेस्ट्रा) यांच्या वास्तू विशेष उल्लेखनीय असून भव्य आणि कलात्मक आहेत.या समाध्या इ. स. पू. १६०० च्या जमिनीत विहिरीसारखे खोल खड्‌डे खणून त्यात बांधण्यात आल्या आणि त्यांतील सहा समाध्या अगदी अविच्छिन्न स्थितीत संशोधकांना उपलब्ध झाल्या. त्यांत एकोणीस सांगाडे होते. त्यांच्यावर हरतऱ्हेचे सोन्याचे दागदागिने घालण्यात आलेले होते इतकेच नव्हे तर त्यांपैकी काहीवर सोन्याचे मुखवटेही चढविलेले होते. हे मुखवटे कलात्मक नसले, तरी या लोकांचे वैभव त्यांतून स्पष्ट दिसते. मायसीनियन नागरिक दाढी वाढवीत आणि युद्धामध्ये चिलखत वापरीत. त्यांची लिखित भाषा प्राचीन सायप्रिअट भाषेशी संलग्न असून त्या भाषेतील अनेक मृण्मुद्रा उत्खननांत उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय हरतऱ्हेची भांडीकुंडी तसेच रोजच्या वापरातील काही वस्तू त्यात मिळाल्या आहेत. या काळानंतर (इ. स. पू. १६००) मायसीनीच्या संस्कृतीवर एका परकीय संस्कृतीची छाप पडलेली दिसू लागते. ही संस्कृती म्हणजे क्रीटची मिनोअन संस्कृती होय. आरंभी क्रोटन वस्तू दिसू सापडतात. अगदी शेवटपर्यंत मिनोअन आणि मायसीनियन संस्कृतीत काही स्पष्ट भेद असले, तरी सामान्यपणे मायसीनीने मिनोअन संस्कृती मोठ्या प्रमाणावर स्वीकारली असावी, यात शंका राहत नाही. टायरिन्झ, थीव्झ, आर्कोमेनॉस, पिलॉस ही काही मायसीनियन संस्कृतीची अन्य महत्त्वाची नगरे होत. 

संदर्भ : Durand, Will, The Life of Greece, New York, 1939.

       2. Macdonald, W. A. Progress into the Past, London, 1967.

       3. Parmar, L. R. Mycenaeans and Minoans, New York, 1965.

       4. Samuel, A. E. The Mycenaeans in History, Chicago, 1966.

       5. Taylour, Williams, The Mycenaeans, London, 1964.

माटे, म. श्री.

मायसीनीच्या बालेकिल्याचे सिंहद्वार, मायलीनी. क्लायटमूनेस्ट्राचे थडगे, मायसीनी.