कॉसूथ, लॉयोश : (१९ सप्टेंबर १८०२ — २० मार्च १८९४). हंगेरीतील एक राष्ट्रीय क्रांतिकारक पुढारी. एका खालावलेल्या उमराव घराण्यात मॉनॉक (उत्तर हंगेरी) येथे जन्मला. 

लॉयोश कॉसूथ

कायद्याची पदवी घेऊनही त्यास नोकरी मिळाली नाही, म्हणून त्याने आपल्या परगण्यातच एका श्रीमंत विधवेच्या एजंटचे काम पत्करले. परंतु त्यात त्यास रस वाटेना. तो १८३२ मध्ये पेस्टच्या डायेटमध्ये निवडून आला. ह्या सुमारास वृत्तपत्रांतून तो ऑस्ट्रियन सरकारवर प्रखर टीका करू लागला त्यामुळे त्यास कैद करण्यात आले (१८३७ – ४०), पण सर्वक्षमा जाहीर होताच त्यास सोडण्यात आले. १८४१ मध्ये त्याने पेस्टी हिर्लाप हे वृत्तपत्र सुरू केले व त्याचा तो संपादक झाला. त्यातून नागरिक स्वातंत्र्य व राष्ट्रीय स्वातंत्र्य यांचा त्याने १८४३ अखेर पुरस्कार केला. पुढे १८४४ मध्ये त्याने नॅशनल लीग पक्षाची स्थापना केली. त्या पक्षातर्फे तो हंगेरीच्या डायेटवर १८४७ मध्ये निवडून आला व लवकरच १८४८ च्या फ्रेंच क्रांतीनंतर जबाबदार सरकारच्या अर्थमंत्र्यांचे स्थान त्यास मिळाले. त्यावेळी हंगेरीत ऑस्ट्रियाविरुद्ध उठाव झाला. त्याचा फायदा घेऊन कॉसूथने ऑस्ट्रियन सत्तेस जोरदार विरोध सुरू केला व संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. ऑस्ट्रियाने रशियाच्या मदतीने कॉसूथची सशस्त्र क्रांती मोडून काढली. कॉसूथ ११ ऑगस्ट १८४९ मध्ये तुर्कस्तानात पळून गेला. तिथे त्याला राहण्याची सक्ती करण्यात आली, पण इंग्लंड–अमेरिकेच्या मध्यस्थीने त्याची दोन वर्षांनंतर सुटका झाली. पुढे त्याने अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, इटली इ. देशांचे आपल्या मागणीस पाठिंबा मिळावा म्हणून दौरे काढले, तथापि त्यांत त्यास फारसे यश आले नाही. अमेरिकेच्या जनतेने तर ‘हंगेरीचा जॉर्ज वॉशिंग्टन’ ह्या शब्दात त्याचे स्वागत केले. त्याने हंगेरीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व अखेर हताश होऊन तो निवृत्तावस्थेत इटलीत गेला व तूरिन येथे मरण पावला. त्याने आपल्या आठवणी लिहिल्या असून त्या मेम्वार्स ऑफ माय एक्साइल ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या व त्याचे १८८० मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले.

देशपांडे, सु. र.